*योग अभ्यास विश्वालाही देईल शांती !* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, June 19, 2022

*योग अभ्यास विश्वालाही देईल शांती !*

 



*योग अभ्यास विश्वालाही देईल शांती !*

 

         कोणत्याही काळात, कालप्रवाहात शाश्वत स्थैर्य देऊ शकेल अशी अनमोल देणगी भारताने योगशास्त्राच्या माध्यमातून जगाला दिलेली आहे. कोणताही भूभाग असो, प्रत्येक भूभागाशी असलेल्या वातावरणात योगाभ्यास कोणालाही सहज साध्य करता येतो. महर्षी पतंजली ऋषींनी 196 सूत्रात हा अभ्यास 4 चरणात दिलेला आहे. ज्यामध्ये समाधिपाद, साधनपाद, विभुतीपाद, कैवल्यपाद ही ती चार चरण आहेत. योगशास्त्रात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या 8 पायऱ्या दिलेल्या आहेत. ज्यामध्ये पहिल्या 4 पायऱ्या अंतरंग योग, सहा ते आठ बहिरंग योगाच्या असून यांना जोडणारा दुवा म्हणून प्रत्याहार ही पायरी दिली आहे.

 

एखादा कल्पवृक्ष जसा शितल छाया देतो, शांतीचा प्रत्यय देतो ती अद्भूत शक्ती योगाभ्यासात आहे. दिवसेंदिवस मानवाच्या पर्यावरणावरील अतिक्रमणामुळे आपण आपल्या भोवतालचे स्वास्थ्य गमावून बसलो आहोत. काळागणिक निर्माण होणारी आव्हाने आणि यातून होणारे ताण-तणाव हे मानवी जीवनाला स्थैर्यापासून, शांतीपासून दूर घेऊन जाणारे आहेत. काळाच्या या चक्रात प्रत्येक व्यक्ती कळत-नकळत प्रवाहित होत असतो. आपल्या भोवतालचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम आपल्यावर घाला घालत असतो. हा घाला अथवा होणारे नुकसान सहजा-सहजी आपल्या निदर्शनास येत नाही. आपल्या वर्तनातून तो प्रतीत होत राहतो. आपण चिडचिड करतो याचा अर्थ आपण स्वास्थ्य गमवतो व इतरांच्या शांतीलाही बांधा निर्माण करतो, हा त्याचा साधा सरळ अर्थ आहे.      

 

ही चीडचीड आपल्या अंतरंगाचाच एक भाग असतो. यातून होणारे वर्तण हा तसा बाह्य स्वरुपात दिसणारा भाग आहे. अशा स्थितीत सावरण्याचे बळ हे सहज योग अभ्यासातून साध्य करता येते. कोणत्याही समस्या या जीवनशैलीतून निर्माण होतात. त्या निवारण्याची ताकद ही योगशास्त्रात आहे हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. कोणतेही सुख पचविण्यासाठी अथवा त्याचा आनंद घेण्यासाठी आपले आरोग्य उत्तम असणे ही एक अट असते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या भौतिक आणि परमार्थिक सुखासाठी मुळात आरोग्यच उत्तम असणे आवश्यक आहे. “सर सलामत तो पगडी पचास” म्हणतात ते यासाठीच. याचा अर्थ एवढाच की आपले मन व शरीर शुद्ध आणि सक्षम असले पाहिजे.


या पृथ्वीतलावर प्रत्येक मनुष्याच्या गरजा भागविण्याइतपत खूप काही उपलब्ध आहे. पण प्रत्येकाची हाव मात्र यातून भागवू शकणार नाही हे महात्मा गांधींनी सांगून ठेवले आहे. निसर्गपूरक, शाश्वत जीवनशैली असेल तर प्रत्येकाला आपले जगणे सुंदर करता येईल. यासाठी मनाची शुद्धी अर्थात चित्त स्थिर असणे आवश्यक आहे. केवळ भौतिक सुविधेच्या अथवा सुखाच्या मागे आपण लागलो तर विनाश अटळ आहे.

 

तणावमुक्त जगणे याचा मार्ग योग अभ्यासात दडलेला आहे. “युवा वृद्धो अतिवृद्धो व्याधितो दुर्बलोति वा, अभ्यासाद्  सिद्धिमाप्नोति सर्व योगेश्वतन्र्दित:” या सुत्राप्रमाणे युवक-युवती, पुरूष-महिला, व्याधीग्रस्त व अखेरचा श्वास असे पर्यंत योगाचे आचरण केले पाहिजे. एक तास योगाभ्यास व उर्वरीत 23 तास योगानुकूल वातावरणात राहणे म्हणजे तणाव येणार नाहीत. नाव नको व्याधीचे, आचारण करीता योगाचे असे म्हणतात ते यासाठीच. ह्रदयविकार, रक्तदाब, मधुमेह हे रोग विशिष्ट जंतुमुळे होत नाहीत. ती होण्याचे कारणे आहेत अती मानसिक तणाव निर्माण करून घेणे.

हा तणाव नियंत्रणाकरीता सहज साधा-सोपा मार्ग म्हणजे योग अभ्यास आहे. आसने, ध्यान, प्राणायाम, प्रार्थना हे चांगल्या आरोग्याची गुरूकिल्ली असून त्यामुळे शारीरीक, मानसिक, अध्यात्मिक हे योगाभ्यासाचे मार्ग आहेत. यातून तणावमुक्त जीवनासह व्यक्तिगत पातळीवर आध्यात्मिक प्रगतीही साध्य करता येते. यालाच समत्वं योग उच्यते म्हणतात. चित्ताची जी आवड-निवड प्रवृत्ती आहे त्याला नियंत्रीत करून योग आणि ध्यान साधनेने मात करता येते. ध्यान साधना ही अवघ्या विश्वाला चिरंतर शांतीचा मार्ग देणारी शक्ती आहे. व्यक्तीगत पातळीवर आपण शुद्ध असणे म्हणजेच योगाभ्यासाच्या जवळ असणे असा याचा अर्थ आहे. या योग दिनापासून आपण सारे शांतीच्या मार्गासाठी सज्ज होऊ यात.

 

-रमेश केंद्रे,

योग मार्गदर्शक,

उपाध्यक्ष, योग विद्याधाम नांदेड

(शब्दांकन विनोद रापतवार, जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड)


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News