मग्रारोहयोच्या कामात तांदळा येथे अपहार ! लाभार्थ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, June 23, 2022

मग्रारोहयोच्या कामात तांदळा येथे अपहार ! लाभार्थ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

 


माहूर (जयकुमार अडकीने ) : तालुक्यातील मौजे तांदळा येथील एका शेतकऱ्याच्या शेतात जनावराचा गोठा करून देण्याचे आश्वासन देऊन त्याच्या कडून जॉब कार्ड, मजुरांचे आधार कार्ड व मजुरांचे बँक पासबुक मागवून घेऊन त्यांची नावे मस्टरमध्ये न टाकताच इतरांची नावे टाकून प्रत्यक्ष गोठ्याच्या कामाला किंचितही सुरुवात न करता ता. १ जून २०२२ रोजी ७२००/- रु. मस्टर उचल केल्याची बाब उघडकीस आली असून फसवणूक झालेल्या शेतकऱ्याच्या मुलाने जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे तक्रार सादर करून चौकशी करून दोषी विरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.

        तक्रारीत असे नमूद केले की, अंदाजे एक महिन्यापूर्वी तांदळा येथील रोजगार सेवक प्रवीण रामचंद्र करचे यांनी रविंद्र गणेश तिळेवाड याजकडून त्याच्या आई, वडीलाचे , त्याचे व त्याच्या पत्नीचे आधार कार्ड व बँकेचे पासबुक घेतले. मग्रारोहयो अंतगर्त जनावरांचा गोठा करून देतो असे त्यावेळी त्यांनी सांगितले. त्यानंतर शेतात मग्रारोहयो अंतगर्त जनावाराचा गोठा कधी सुरु करता अशी रोजगार सेवक प्रवीण रामचंद्र करचे यांचेकडे रविंद्र तिळेवाड याने वारंवार विचारणा केली असता लवकरच तुझ्या गोठ्याचे काम सुरु करू असे सांगुन गोठ्याचे कोणतेही काम केले नाही. याउलट ग्रामरोजगार सेवक यांनी घेतलेले जॉब कार्ड व माझ्या कुटुंबीयांचे आधारकार्ड व बँक पास बुक बाजूला ठेऊन दि. ०१/०६/२०२२ रोजी गणेश भवानजी तिळेवाड यांच्या नावाने मौजे तांदळा ता. माहूर जि. नांदेड येथील गट क्र. ११/ओ मध्ये जनावराच्या गोठ्याचे बोगस मस्टर भरून ७२००/- रु. उचल केले असल्याचा आरोप रवींद्र गणेश तीळेवाड यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना सादर केलेल्या तक्रारीत केला आहे.    

        फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने शेतकऱ्याच्या मुलाने त्याच्या कुटुंबाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या ग्रामरोजगार सेवक व माहुर पंचायत समिती मधील मग्रारोहयो विभागातील संबधित कर्मचारी व अधिकारी यांचे विरुद्ध योग्य ती कारवाई करून कुटुंबाला न्याय द्यावा व संबधित दोषी अधिकारी व कर्मचारी यांचे विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी केली आहे. निवेदनाच्या प्रती राज्यमंत्री बच्चू कडू, आ. भीमराव केराम, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभाग कार्यालय किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी, माहूरचे तहसीलदार ,  माहूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना सादर केल्या आहेत.

       गटविकास अधिकारी पंचायत समिती माहूर यांना दि.१७ रोजी तक्रार सादर केली असून अद्याप माझ्या तक्रारीबाबत कोणतीही हालचाल झालेली दिसत नाही त्यामुळे मला न्याय मिळेल की नाही याबाबत खात्री नसल्याची चिंता तक्रारदार रविंद्र तिळेवाड यांनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे व्यक्त केली आहे.

        तर गट विकास अधिकारी सुरेश कांबळे यांचेकडे तक्रारीची चौकशी केली असता अशी कोणतीही तक्रार माझ्या समक्ष आली नसल्याचे सांगितले व तक्रारीची चौकशी करून दोषी व्यक्ती विरुद्ध निश्चितच कारवाई करणार असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News