"भेटी लागे जीवा " -उदय जी. नरे (राजकीय विश्लेषक) - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Saturday, July 30, 2022

"भेटी लागे जीवा " -उदय जी. नरे (राजकीय विश्लेषक)

            महाराष्ट्रातील थोर संत तुकाराम महाराज यांनी भेटी लागे जीवा या अभंगात विठ्ठल भेटीची ओढ व्यक्त केली आहे. आज या अभंगाची आठवण झाली ती विठ्ठलाच्या बडव्यांनी केलेल्या बंडावरून. महाराष्ट्रात सत्तापालट होऊन एक महिन्याचा काळ लोटला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्का तंत्राचा वापर करुन पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदी घोषणा करुन ऑपरेशन लोटस सक्सेस केले. महाराष्ट्रातील शिवसैनिकांना एक शिवसैनिक मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करून वरून आलेला आदेश म्हणून उपमुख्यमंत्री पद आपल्या कडे ठेवले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोघांनी कॅबिनेट मिटिंग घेऊन पाचशेहून अधिक निर्णय घेतले. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाला बाळासाहेब ठाकरे शिवसेना असे नाव दिल्यामुळे शिवसेनेमध्ये खळबळ होणे साहजिकच होते. सत्ता बदल झाला आणि त्या नंतर मात्र एकनाथ शिंदे गट व उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळ सेना या दोघांनी भेटी सत्राचे आयोजन सुरू केले. शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईतून शिवसंवाद यात्रा सुरू केली. या यात्रेत शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आदित्य ठाकरे यांना मिळाला यात शंका नाही. नाशिक मध्ये सुध्दा शिवसंवाद यात्रा यशस्वी झाली.  उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर नेहमी प्रमाणे शिवसैनिकांचे जथ्थे आले होते. भेटी गाठीचा हा अनोखा संगम राज्यातील जनतेने प्रसार माध्यमांनी "आंखों देखा "दाखवला. "भेटी दिल्या" की आपलापणा वाढतो म्हणूनच काय? आज भेटी सत्राचे आयोजन करण्यात आले आहे का? असा प्रश्न पडतो.लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याच्या दौर्‍यावर म्हणजे जनतेच्या भेटीसाठी जाणार आहेत. विरोध पक्षनेते अजित पवार यांनी दुष्काळग्रस्तांसाठी भेटीगाठी घेतल्या (हा राजकीय दौरा नव्हता. दादांचे स्पष्टीकरण) 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहरांना भेटतात. एकनाथ शिंदे गटातील नेते आपल्या मंत्री पदासाठी कार्यकर्त्यांना भेटतात.शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर  पत्रकारांना भेटतात. मुख्यमंत्री खासदार गजानन कीर्तिकर व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या घरी जाऊन भेटतात. संजय राऊत शरद पवार यांना भेटतात सकाळी सकाळी पत्रकारांनाही भेटतात. कधीही फोन न उचलणारे नेते आजकाल फोनवर सुध्दा भेटत आहेत व त्यानंतर त्यांच्या ऑडियो क्लिप व्हायरल होत आहेत. राज्यपाल दिल्लीत जाऊन भेटीगाठी घेत आहेत. व चर्चांना उधान येत आहे. पण या भेटी गाठीतून सर्वसामान्यांना काय भेटणार आहे ? ज्यांनी पक्षात हयात घालवली त्यांना ताडपत्री उचलण्याशिवाय आणि झेंडा हाती घेऊन बेंबी पासून आपल्या नेत्यांचा जयजयकारा शिवाय काहीच भेटले नाही. विजय पांगम या कार्यकर्त्यांनी सांगितले , आम्ही सामान्य कार्यकर्ते काही भेटण्यासाठी काम करतच नसतो तर फक्त आदेश पाळतो. तर राजन पुजारीच्या मते सध्या आयाराम गयारामांना सर्व काही मिळते याची खंत व्यक्त केली. संतोष चव्हाण यांनी सांगितले की, आमचे नेते पक्ष बदलतात पण आम्ही तेथेच असतो पाषाणसारखे. प्रकाश क्षीरसागर सांगतात विश्वासाने आम्ही मत देतो पण आज आम्ही आमचे मत कोणाला दिले हेच आम्हाला कळत नाही. राजेंद्र पुजारी या नेत्यांच्या भेटीने संतापून उठतात. जनाची व मनाचीही लाज नसलेल्यांच्या भेटीगाठीने आम्हा जनतेला काय भेट मिळणार आहे? असा सवाल उपस्थीत करत आहेत.

लोकशाही ही जनतेच्या मतावर नाही तर न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे ही लोकशाहीची क्रूर चेष्टा आहे.


भेटीलागीं जीवा लागिलेसी आस।

पाहे रात्रंदिवस वाट तुझी ।।। 


खरच सर्व आमदारांना आस लागली आहे ती मंत्रीपदाची. आणि नेत्यांना आस आहे ती आपल्याला सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांची.मंत्री मंडळ कधी होणार हे कोर्टाच्या तारखे प्रमाणे तारीख पे तारीख. 


तुका म्हणे मज लागलीस भूक। 

धावूनि श्रीमुख दांवी देवा ।।


प्रत्येकांची भूक मात्र वेगळी आहे. हे विठ्ठला सर्वांची भूक तू पुर्ण कर. मला मात्र तुझ्या भेटीची आस लागली आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News