किनवट : तालुक्यातील कमठाला केंद्रातील गणेशपूर येथील माता-पालक गटाच्या मुलाखतीचे थेट प्रसारण नागपूर आकाशवाणी ( 585 KHz / 512.8 मी.) वरून दि. 2, 4 व 7 जून 2022 या तीन दिवसी तीन भागांमध्ये सकाळी 10.30 वा. होणार आहे. या मुलाखतीचे रेकॉर्डिंग नुकतेच करण्यात आले आहे.
दिनांक 2 जून रोजी सरस्वती मोहजे माता पालक गटाच्या लीडर माता आणि रेणुका नांदे व संगीता खटारे माता सदस्य दिनांक 4 जून रोजी कल्पना बावणे माता पालक सदस्य आणि 7 जून रोजी दिव्या मोहिते माता पालक गट स्वयंसेवक यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. नुकतेच 17 मे रोजी कुमारी गौरी या रोहिदास तांडा येथील अंगणवाडीतील व इयत्ता पहिलीला प्रवेश पात्र विद्यार्थिनीची मुलाखत प्रसारित झाली होती. आता सलग तीन भागांमध्ये शाळापूर्व तयारी शाळेतले पहिले पाऊल या कार्यक्रमा अंतर्गत माता-पालक गटाची मुलाखत प्रसारित होत आहे हा किनवट तालुक्याच्या शिरपेचातील एक मानाचा तुरा आहे.
कोविड-19 मुळे मागील दोन वर्षात अंगणवाडी व प्राथमिक शाळा पूर्णपणे बंद होत्या. या स्तरावरील विद्यार्थ्यांना अंगणवाडी व शालेय वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली नाही. ही बाब विचारात घेता महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने प्रथम या अशासकीय संस्थेसोबत सामंजस्य करार करून जून 2022 मध्ये इयत्ता पहिलीला प्रवेश पात्र विद्यार्थ्यांसाठी शाळापूर्व तयारी शाळेतले पहिले पाऊल या महत्वकांक्षी कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यभर सुरू केली.
किनवट तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहाने शाळापूर्व तयारी पहिला मेळावा आयोजित करण्यात आला. शारीरिक, सामाजिक, भावनिक, भाषिक, गणितीय इत्यादी क्षमतांचे निरीक्षण या माध्यमातून करण्यात आले आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या आयडिया कार्ड, कृतीपत्रिका, शाळेतले पहिले पाऊल या साहित्याचे वितरण माता पालक व गटांना करण्यात आले. लीडर माता व गटातील माता सदस्य आयडिया कार्ड वर चर्चा करून स्वयंसेवकांची मदत घेऊन आपापल्या पाल्याकडून आठवडानिहाय कृती पत्रिकेवरील कृती करून घेत आहेत. किनवट तालुक्यातील माता पालकांची ही कामगिरी पंचक्रोशीत पसरली असून नागपूर आकाशवाणी यांनी एका माता-पालक गटाची मुलाखत घेतली आहे. गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, तालुका संपर्क अधिकारी अभयसिंह परिहार, बाल विकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठकरोड, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती, समावेशित विषय तज्ञ, फिरते विशेष शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी ताई, स्वयंसेवक, एकमेकांना सहाय्य करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मेहनत घेत आहेत.
मार्गदर्शक जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर - घुगे, डायटचे प्राचार्य रवींद्र आंबेकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ. सविता बिरगे यांनी या उपक्रमले कौतुक केले आहे. राज्यस्तरीय मार्गदर्शक संचालक एम. डी. सिंह, सहसंचालक रमाकांत काठमोरे, , राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे उपसंचालक तथा राज्यस्तरीय कार्यक्रम अधिकारी डॉ. नेहा बेलसरे यांनी देखील कौतुकाची थाप देऊन अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. प्रथम संस्थेचे राज्य प्रमुख सोमराज गिरडकर, मराठवाडा विभागाचे प्रथमचे प्रमुख शंकर पौळ, नांदेड जिल्ह्याचे प्रमुख महसुद्दीन, सबिहा, नाझीरा हे सर्वजण मदतीला वेळोवेळी धावून येतात. या मुलाखतीसाठी शंकर पौळ यांनी ड्राय रन घेतला तर तालुका संपर्क अधिकारी अभयसिंह परिहार यांनी माता गटाला मुलाखती बाबत मार्गदर्शन केले. कमठाला केंद्राचे केंद्रप्रमुख शरद कुरुंदकर, बाबू इबितदार, ननावरे, गोगटे, गणेशपुर शाळेचे मुख्याध्यापक जाधव, सर्व शिक्षक आणि गावकरी यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.




No comments:
Post a Comment