धर्माबाद ( नांदेड ) : तालुक्यातील चार केंद्रातील शाळांना पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती गटसाधन केंद्रातुन देण्यात आली. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाकडून रविवारी सात जून रोजी इयता पहिली ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तके प्राप्त झाली होती. पाठ्यपुस्तक वितरणाचे नियोजन करून सोमवारी जारीकोट व चिकना, मंगळवारी बाळापूर व रत्नाळी केंद्रातील जिल्हा परिषद शाळा आणि बुधवारी खाजगी अनुदानित शाळांना पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले.
इयत्ता पहिल्या वर्गाची इंग्रजी व सातव्या वर्गातील गणित आणि भूगोल विषय वगळता मराठी व उर्दू माध्यमाची सर्व विषयांची एकूण 55735 पुस्तके उपलब्ध झाली आहेत अशी माहिती गटसाधन केंद्रातून मिळाली. कोरोना प्रादुर्भाव होऊ नये व वाटप करताना गर्दी होऊ नये याची काळजी घेताना प्रत्येक केंद्र आणि शाळा प्रमुखांना दिनांक आणि वेळ देण्यात आले होते. तोंडाला मास्क बांधणे व सोशल डिस्टन्स ठेवून पुस्तके वितरित करण्यात आले. पाठ्यपुस्तक वितरण करण्यासाठी नागनाथ भत्ते यांच्यासह राजेश पटकोटवार, साहेबराव बोणे, किरण रणवीरकर, खाटे, बोपटे, केंद्रप्रमुख एस. डी. आंदेलवाड, अरुण ऐनवाले, संजय कदम, साईनाथ माळगे यांनी परिश्रम घेतले तर गटशिक्षणाधिकारी एल. एन. गोडबोले यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली सर्व शाळांना पाठ्यपुस्तक वितरित करण्यात आले. कोरोना प्रदूर्भावामुळे प्रत्यक्षात शाळा ज्या दिवशी प्रारंभ होतील त्यादिवशी विद्यार्थ्यांना शाळांकडून पुस्तके वितरित करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी मोफत पाठ्यपुस्तक मिळतात किंवा नाही अशी शंका मनात होती मात्र शासनाने नियोजित वेळेत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली. पुढील वर्गाची पुस्तके विद्यार्थ्यांजवळ नसल्याने त्यांना काही करता येत नव्हते. यामुळे विद्यार्थ्यांना निदान स्वयंध्ययन करणे तरी सोयीचे होईल.-नासा येवतीकर,विषय शिक्षक,जिल्हा परिषद प्रा. कन्या शाळा, धर्माबाद




No comments:
Post a Comment