किनवट ( नांदेड ) : मंगळवारी ( दिनांक 9 जून 2020 रोजी ) आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा शहीद दिनानिमित्त आमदार भीमराव केराम यांनी महाराष्ट्रातील सर्व आदिवासी जमातीतील सर्व कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. आदिवासी, अतिदूर्गम, डोंगरी क्षेत्रात असलो म्हणून काय झाले. आता नव्या तंत्रज्ञानाचा आम्ही स्विकार केला असून त्याचा वापर करीत आहोत ... यातून... आता आम्हीही कात टाकली !... असा संदेश पाड्या - गुड्याती बांधवांसह सर्वांनाच दिला आहे.
अचानक ओढावलेल्या राष्ट्रीय आपत्ती करोना (कोविड- 19 ) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यकर्ता म्हणून आपापल्या भागात कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. लॉकडाऊन संपून अनलॉक सुरू झाले तरी हा विषाणू काही नष्ट झालेला नाही. पुढे या आजारावर मात करण्यासाठी काय काय उपायोजना आखता येईल ? किंवा काय काळजी घेता येईल? अशी माहिती कार्यकर्त्यांकडून जाणून घेतली. त्यांना घ्यावयाच्या काळजी बद्दल विस्तृत माहिती देऊन मार्गदर्शन केले. कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये, शासनाच्या, प्रशासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळा, स्वतःची काळजी स्वतः घ्या, हा संदेश आपण अंगिकारावा तसेच सर्वसामान्यांपर्यंत पोहचवावा असे आवाहनही या प्रसंगी त्यांनी केले.
या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचेसह महाराष्ट्रातील बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. वनवासी कल्याण आश्रमचे गोवर्धन मुंडे, अनिरूद्र केंद्रे व संतोष मऱ्हसकोल्हे यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.





No comments:
Post a Comment