किनवट : 'माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणुसकी देई..'तुज विन भीमा हा वाटतो संसार मज सुना...' अशा भावनाप्रधान गीतांच्या " गाणे निळ्या नभाचे " कार्यक्रमाने बाबासाहेबांना वाहिली स्वरांजली. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तालुकाध्यक्ष अभि. प्रशांत ठमके यांच्या संकल्पनेतून " डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनोख्या संगीतमय अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे अधिक्षक अनिल कवडे, गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने , क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले विचार मंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके, वन विकास महामंडळाचे निवृत्त व्यवस्थापक वसंत सर्पे, तालुका सरचिटणीस माजी प्राचार्य राजाराम वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमास प्रारंभ झाला.
नैसर्गिक जादुई आवाजाची देणगी लाभलेल्या पौर्णिमा कांबळे (नांदेड ) यांनी ' ग्यान सूर्य तू इस जगत का ' या मिश्ररागातील कारुण्यमयी स्वरांनी वंदन गीत गाऊन चारुकेशी रागातील ' तुझविन भीमा हा वाटतो संसार मज सुना ' या भावनाप्रधान गीताने अभिवादन करून " भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे ' या संविधान गीताने प्रचंड टाळ्या मिळविल्या.
युवा गायक शिक्षक दिनेश झगडे यांनी जोग रागातील ' कणा कणांनी ज्ञान वेचुनी प्रबुद्ध हो मानवा ' व ' पंचशिल गिरवा चला रे धम्मचक्र फिरवा ' हे पं. सुरेश वाडकर यांचं गीत तयारीनिशी सादर केलं. रुपेश मुनेश्वर यांनी यमन रागातील स्वरचित ' भारताचे संविधान ' व आम्रपाली वाठोरे यांच्या साथीने ' मिझ्या भिमाची पुण्याई आम्हा माणुसकी देई' हे युगल गीत गाऊन रसिकांची थंडी पळविली. प्रज्ञाचक्षू गायक अनिल उमरे यांनी ' चंदनवृक्षा समान होता ' , समाज बांधव माझे रडती अंत तयाचा पाहू नका ' हे भैरवी रागातील व ' वाट किती मी पाहू येशील कधी भिवा ' हे गीत गाऊन आपली गायकी सिद्ध केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पौर्णिमा कांबळे यांनी ' सुमेधबोधीसत्वा बुद्धीची साथ होती , सिद्धार्थ बुद्ध झाले पुणवेची रात होती ' गाऊन , ' तुम ना होते तो हम ना होते ' व पटदीप स्वर लावित ' दलितांच्या दीपा प्रणाम तुझ विश्वाचे ' गाऊन भीम रसिकांवर मोहिनी घातली.
पुणे येथील गायक प्रकाश सोनवणे यांनी ' चकव्यात गुंतलो मी माफ कर भीमा ' ही स्वरचित गझल गायिली. वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे संचालक सुरेश पाटील यांनी वामनदादा रचित जोनपुरी रागातील ' कानात काल माझ्या माझे मरण म्हणाले व तोडी रागातील ' निबीड जंगले तुडवीत आलो फोडूनिया टाहो , रथ समतेचा असा आणिला... या गीताने सांगता केली. ऐतिहासिक दाखले देत या कार्यक्रमाचे निर्माते उत्तम कानिंदे निवेदन केले. सांगावाकार महेंद्र नरवाडे यांनी आभार मानले. रमेश मुनेश्वर हे संयोजक होते. सिंथोसायझर अनिल उमरे, तबला प्रफुल्ल वाघमारे (हिंगणघाट), उस्ताद प्रशांत खाडे (घाटंजी), ढोल सूरज पाटील, ऍक्टोपॅड राहूल तामगाडगे, संवादिनी (कीबोर्ड) प्रकाश सोनवणे यांनी साथ संगत केली.




No comments:
Post a Comment