माहूर (पंडित धुप्पे) : माहूर तालुक्यातील पाचुंदा येथील दोन महिलांचे दागिने लुटून गळा दाबून खून केल्याची घटना गुरुवारी (ता. 20.11. 2025) दुपारी दोन ते तीन वाजे दरम्यान घडली होती. नांदेड पोलिसांनी घटनेच्या बारा तासाच्या आत आरोपींना पकडण्याची यशस्वी कामगिरी केली असल्याने पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
माहूर तालुक्यातील पाचोंदा येथील शेतात कापूस वेचणीसाठी गेलेल्या अंतकलाबाई अशोक अडागळे (55) व अनुसयाबाई साहेबराव अडागळे (50) या दोन्ही महिलांचा अज्ञात व्यक्तींनी २० नोव्हेंबर रोजी गळा दाबून खून केला होता. त्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे व चांदीचे दागिने लुटून आरोपी फरार झाले होते.
या घटनेची माहिती माहूर पोलीस स्टेशनला कळताच पोलिस निरीक्षक देविदास चोपडे यांनी सदर घटना जिल्हा पोलिस अधीक्षक यांना कळवून घटनास्थळी विविध पथके बोलावून पंचनामे, पुरावे, जमा केले होते.
त्यासुगाव्यावरून संशयित आरोपींचे स्केच पुण्यातील तज्ञांमार्फत व्हिडिओ कॉलिंगद्वारे तयार करण्यात आले. त्यानंतर तपासाची चक्रे फिरवून बारा तासात आरोपी सुरेश दत्ता लिंगनवार (वय 38 वर्षे) राहणार सदोबा सावळी ता. आर्णी जि. यवतमाळ व त्याचा मित्र गजानन गंगाराम येरजवार ( वय 41 वर्षे) या दोघांनी पाचुंदा येथील दोन्ही महिलांचे दागिने लुटून त्यांची हत्या केल्याची कबूली दिली आहे.
सुरेश लिंगरवार हा गंगाजी नगर सेलू करंजी तालुका माहूर येथील नातेवाईकांच्या शेतातील आखाड्यावर लपून बसला असल्याची माहिती गोपनीय खबऱ्या मार्फत कळताच तेथे जाऊन नांदेड पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्या सांगण्यावरून त्याचा मित्र गजानन येरजवार याला सुद्धा गंगाजी नगर सेलू येथून ताब्यात घेतले. या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून या गुन्ह्यातील एक मोटरसायकल दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहे. यांचेवर गु.र. नंबर 191/2025 कलम 103(1),311, 309(6), भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे व पुढील तपास माहूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे हे करीत असल्याचे कळविण्यात आले आहे.
या आरोपीला पकडण्यासाठी पोलीस अधीक्षक नांदेड अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक भोकर अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड सुरज गुरव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा नांदेडचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वागळे, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, पोलीस उपनिरीक्षक गुंडेराव करले, पोलीस हेडकॉन्स्टेबल दारासिंग राठोड, मोहन हाके, ज्ञानोबा कवठेकर, देविदास चव्हाण, मोतीराम पवार, सिद्धार्थ सोनसळे, रितेश कुलथे,धम्मा जाधव, मारुती मुंडे,पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक कोठवणे या पथकाने आरोपीला घटनेच्या बारा तासाच्या आत पकडण्यात यशस्वी कामगिरी केली असल्याने पोलीस प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहे.





No comments:
Post a Comment