नांदेड, ता.21 किशोरवयापासूनच आरोग्याची काळजी व जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्य दूत हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. निरोगी, सुदृढ आणि आरोग्य-केंद्रित समाज निर्मितीसाठी हा उपक्रम प्रभावी ठरेल, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, सीएम फेलो भार्गवी मुंढे, जिल्हा कृषी अधिकारी निलकुमार ऐतवडे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रवीणकुमार घुले, माता-मुल संगोपन अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, सहाय्यक संचालक कुष्ठरोग नियंत्रण अधिकारी डॉ. शेख बालन, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतिश कोरपूरवा आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे त्या म्हणाल्या, आरोग्य दूत उपक्रमात इयत्ता सहावी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे. प्रत्येक गावातून एका विद्यार्थ्याची निवड करण्यात आली आहे. आरोग्याची काळजी, प्राथमिक उपचार, आजार होण्याआधी प्रतिबंधात्मक उपाय, वाढता ताणतणाव, संतुलित व सकस आहार आदी विषयांचे प्रशिक्षण या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
या उपक्रमात आरोग्य विभागाबरोबरच कृषी, पशुसंवर्धन तसेच पाणी व स्वच्छता विभागाचाही सहभाग राहणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर हे प्रशिक्षित मुलं-मुली आरोग्यदूत म्हणून आपल्या गावात व समाजात जनजागृती करून निरोगी कुटुंब आणि आरोग्यमय आयुष्य घडविण्यास हातभार लावतील, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी व्यक्त केला. आरोग्य दूत हा उपक्रम नांदेड जिल्ह्याच्या आरोग्यसेवेत दूरगामी व सकारात्मक बदल घडविणारा ठरेल, असेही त्या म्हणाल्या.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी प्रास्ताविक व जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रेणूका दराडे यांनी सूत्रसंचालन केले. वैशाली बेरलीकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





No comments:
Post a Comment