नांदेड :
विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षकांची गरज असते .मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे काम आपण करता ते वंदनीय असून वर्षभर निरंतर मुलांचा अभ्यास घेत राहावा दर महिन्यास त्याचा आढावा घ्यावा म्हणजे गुणवत्ता वाढेल असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी केले. यावेळी त्यांनी शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात सहभाग घेण्याबाबत आवाहनही केले.
नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक, गणित, इंग्रजी व विज्ञान विषयाच्या शिक्षकांची आढावा बैठक व पुढील नियोजन यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यशाळेचे औपचारिक उद्घाटन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे सभापती राम नाईक, संजय बेळगे, महिला व बालकल्याण सभापती सुशिलाबाई हनमंतराव बेटमोगरेकर ,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, समाज कल्याण अधिकारी सत्यम आऊलवार ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, डी.यु.इंगोले , व्ही.आर.कोंडेकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी बी .आर .कुंडगीर, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, निरंतरचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे ,कार्यकारी अभियंता बरगळ, पशुवैद्यकीय अधिकारी शिवाजी पवार ,जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकारी डावरे, उपशिक्षणाधिकारी बंडू अामदूरकर, अधीक्षक बळीराम येरपूलवार, शिरीष आळंदे ,भार्गव राजे आदींची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
सूत्रसंचालन बंडू आमदूरकर व विलास ढवळे यांनी केले.
इंग्रजी, गणित व विज्ञान शिकवणाऱ्या शिक्षकांचा शाळानिहाय आढावा घेण्यात आला. सराव परीक्षेत पास झालेले ,नापास झालेले विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे परीक्षेस बसण्याचे प्रमाण, नापास होणाऱ्या कारणांचे चिंतन करण्यात आले .मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे हे या सभेत दिवसभर बसून होते .त्यांनी शाळांचा सविस्तर आढावा घेतला. शिक्षकांनी केलेले काम समजून घेतले. उत्कृष्ट शिक्षकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धा परीक्षेची पुस्तके देऊन गौरव करण्यात आला. विषयनिहाय परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न ,त्याची तयारी, उत्तरपत्रिकेत करावयाची मांडणी या बाबतीत सूक्ष्म मंथन झाले .कमी गुणवत्ता असलेल्या बॉटममधील शाळांकडून पुढील कृती कार्यक्रम करून घेण्यात आला.महिनाभराचे दैनंदिन अध्यापनाचे नियोजन करून विद्यार्थी भयमुक्त वातावरणात परीक्षा देतील अशा पद्धतीचे वातावरण तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. शिक्षकांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण बाबी टिपून त्यातील कोणत्या पद्धती आत्मसात करता येतील आणि आपल्या शाळांवर त्याची अंमलबजावणी करता येईल याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी लक्ष वेधले.
शिक्षकांनी शाळांमध्ये केलेले नाविन्यपूर्ण कार्यक्रम सर्वांना कळल्यामुळे संवादातून पुढील दिशा निश्चित झाली. तज्ज्ञ शिक्षक प्रमोद शिरपूरकर यांनीही यशाच्या क्लुप्त्या सांगितल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षणाधिकारी दीपक शिरसाट, शिक्षण विस्तार अधिकारी बी. आर. कपाळे ,महेश चिटकुलवार ,खिल्लारे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास सर्व गटशिक्षणाधिकारी ,संबंधित बीटचे शिक्षण विस्ताराधिकारी सर्व जिल्हा परिषद प्रशालांचे मुख्याध्यापक, गणित , इंग्रजी व विज्ञान विषयाचे शिक्षक उपस्थित होते.
शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत असून शिक्षक विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याचे आवाहन काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष शिंदे नागेलीकर यांनी यावेळी केले. सभापती राम नाईक यांनी जिल्ह्यातील दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करा ,कामाच्या ठिकाणी मुले स्थलांतरित झाली असतील त्यांना परत आणून परिक्षेस बसवा, पालकांशी संपर्क करा असे आवाहन केले .
श्रीनिवास औंधकर यांच्याकडून आकाश दर्शन
विभागीय आयुक्तांच्या फ्लॅगशिप कार्यक्रमात खगोल मंडळाची स्थापना शाळांमध्ये करण्यावर भर दिला आहे. टेलिस्कोप द्वारा खगोलीय घटनांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करावयाचा तर टेलिस्कोपचा वापर व अंतराळाची प्राथमिक माहिती असणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून खगोल शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांच्या मार्गदर्शनात आकाश दर्शन केले. श्री औंधकर यांनी खगोलीय घटना, घडामोडी, टेलीस्कोपचा वापर या संदर्भात विस्तृत माहिती दिली. शिक्षकांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे व जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख यांनी रात्री जिल्हा परिषदेच्या छतावरून श्रीनिवास औंधकर यांच्या मार्गदर्शनात आकाश दर्शन केले .चंद्र ,शुक्र, ध्रुवतारा, आकाशगंगेतील अनेक घटना घडामोडी याची माहिती औंधकर यांनी यावेळी दिली. खगोलीय घटना अनुभवण्याचा आणि पाहण्याचा जिल्ह्यातील शिक्षकांसाठीचा हा अभिनव प्रयोग राहिला.
No comments:
Post a Comment