आनंदाचा वाढेकरी : आनंद वाढे
- मारोती सुंकलवाड
सेवानिवृत शिक्षणाधिकारी यांचा आनंदराव वाढे यांच्या ७५ व्या (अमृतमहोत्सवी) वाढदिवसा निमित्त मारोती सुंकलवाड यांचा अभिष्टचिंतनपर लेख येथे देत आहोत. -संपादक
एखाद्या तत्वनिष्ठ, कार्यप्रवण व्यक्तिमत्त्वाच्या ७५ वर्षांचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा अपुऱ्या जागेत मांडणे तसे कठीणच. तरीही त्यांच्याबद्दल होईल तितके, माझ्या परीने, हे अभिष्टचिंतन करण्याचा प्रयत्न आहे.
७५ वर्षांपूर्वी शिक्षण म्हणजे काय, याची गंधवार्ताही नसणाऱ्या एका गरीब, अशिक्षित जन्मदात्याला “माझा मुलगा शिकून साहेब व्हावा” असे वाटणे किती आश्चर्यकारक! स्वप्न पाहणे आणि ते प्रत्यक्षात साकार करणे निरक्षर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबासाठी त्या काळी किती कठीण होते. परंतु सखाराम वाढे या अंगठाबहाद्दर माणसाने ते करून दाखवले. म्हणूनच मी म्हणतो—कमी जागेत हे सर्व विषद करणे अशक्यच आहे.
किनवट तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासीबहुल भागातील घोटी या खेडेगावात आनंदराव वाढे यांचा जन्म दि. ०६/०२/१९५१ रोजी झाला. आज त्यांना ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. सखाराम वाढे (वडील) व सगुनाबाई (आई) हे अल्पभूधारक गरीब शेतकरी कुटुंब. आर्थिक परिस्थिती बेताची असूनही मुलांनी शिकले पाहिजे ही आई-वडिलांची जिद्द होती.
घोटी गावातच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षणाचे धडे घेतल्यानंतर आनंदराव वाढे यांनी जि.प. हायस्कूल, किनवट येथे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. बी.एस्सी. ही पदवी परीक्षा त्यांनी लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद येथे पूर्ण केली. त्यानंतर बी.एड. ही अध्यापनाची पदवी प्राप्त केली.
सहशिक्षक म्हणून पोहंडूळ (ता. पुसद) या विदर्भातील खेडेगावातील जि.प. शाळेत त्यांनी अध्यापन कार्यास प्रारंभ केला. शिक्षक ते मुख्याध्यापक अशी विविध पदे भूषवत ज्ञानदानाचे पवित्र कार्य त्यांनी इमानेइतबारे पार पाडले. पुढे गट शिक्षणाधिकारी ते शिक्षणाधिकारी म्हणून वाढे साहेबांनी शैक्षणिक प्रशासक म्हणूनही उल्लेखनीय सेवा बजावली.
या प्रदीर्घ सेवाकाळात अनेक बरे-वाईट प्रसंग आले; परंतु सेवानिष्ठा त्यांनी कधीही ढळू दिली नाही. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणून काम करताना अंगावर शहारे आणणारे प्रसंग आल्याचे ते आजही मजेशीर शैलीत सांगतात. नक्षल चळवळीच्या धाकाच्या सावटाखाली जीव मुठीत धरून नोकरीचे दिवस कसे काढावे लागतात, याचा अनुभव त्यांनी घेतला. “जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे” अशीच ती अवस्था होती—हे ऐकताना अंगावर काटा उभा राहतो.
तिकडचे कोण आणि इकडचे कोण, हे ओळखून वावरावे लागत असे. असो. एखाद्या शिक्षण संस्थेला अनुदान मिळण्यासाठी संबंधित जिल्हा शिक्षण विभागाची शिफारस आवश्यक असते. तसे प्रस्ताव शिक्षण संचालनालय स्वीकारून अनुदानास मान्यता देते. वाढे साहेब नांदेड जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी असताना किनवटचा भूमिपुत्र या भावनेने तालुक्यातून प्राप्त झालेल्या निकषपात्र प्रस्तावांची त्यांनी निःस्वार्थपणे व विनाविलंब शिफारस केली. त्यामुळे सुमारे २५ वर्षांपूर्वी अनेक शैक्षणिक संस्थांना त्यांच्या सहकार्याचा लाभ झाला. अनेक संस्था यामुळे उभारी घेऊ शकल्या, असे अनेक संस्थापक आजही आनंदाने सांगतात. “वाढे (करी) आपला आहे” ही भावना यामागे होती.
विशेष म्हणजे शिक्षणाधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतरही फुले–शाहू–आंबेडकरांचा शैक्षणिक, सामाजिक व वैचारिक वारसा जपण्यासाठी त्यांनी ओम शिक्षण संस्था, सुभाषनगर , किनवट स्थापन केली . या संस्थेअंतर्गत फुलाजी बाबा कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, उमरी (बाजार) व सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, बेल्लोरी ( धा.) कार्यान्वित करून किनवट तालुक्यातील दुर्गम भागात शैक्षणिक प्रवाह प्रवाहित केला.
मागील दहा वर्षांपासून वाढे साहेब डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले संयुक्त जयंती सोहळा घोटी फाटा येथे मोठ्या जल्लोषात आयोजित करून सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत.
अत्यंत मितभाषी, साधे राहणीमान, सदैव हसरा चेहरा आणि सर्व वयोगटांतील व सर्व स्तरांतील मित्रमंडळींची मोठी फळी त्यांनी कमावली आहे.
मोठा मुलगा वरुण तसेच मेघा, सौदामिनी व निलंबरी या मुली—योगायोगाने सर्व अपत्यांची नावे आकाशाशी संबंधित आहेत. स्वतःचे नाव आनंद आणि पत्नीचे नाव कृष्णाबाई—अशा या कृष्णानंदाने आपल्या कर्तृत्वाने जणू आभाळालाच गवसणी घातली आहे, असे म्हणावेसे वाटते.
“विद्यार्थ्यांना भूतकाळाची माहिती देऊन वर्तमानाच्या उंबरठ्यावर उभे करून भविष्याची दिशा दाखवतो, तोच खरा शिक्षक” असे साने गुरुजी म्हणतात. हे तत्त्व वाढे साहेबांनी आयुष्यभर जपले.
शिक्षकांचे तीन प्रकार सांगितले जातात—
१) पेशाने शिक्षक
२) हाडाचे शिक्षक
३) वृत्तीने शिक्षक
वाढे साहेबांमध्ये हे तिन्ही प्रकार एकत्र पाहायला मिळतात. खरंतर वृत्तीने शिक्षक असलेले कधीच निवृत्त होत नसतात. शाळेत आणि शाळेबाहेर, शाळेतल्यांना व शाळेबाहेरील लोकांनाही ते सतत शिकवत असतात. आनंद वाढे साहेब याच नियमात बसतात. पेशाने ते वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असले, तरी हाडाचे शिक्षक असल्याने त्यांची शिक्षकी वृत्ती आजही कार्यरत आहे. म्हणजेच सेवानिवृत्त झालेले ते कार्यरत शिक्षकच आहेत.
त्यांच्या पुढील आयुष्याचा प्रवास सुख, समाधान व समृद्धीने जावो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा…!
लेखक :
मारोती सुंकलवाड
ज्येष्ठ शिवसैनिक,
किनवट





No comments:
Post a Comment