1. रमाई
डॉ . यशवंत मनोहरकरुणेची कविता तू मावत नाहीस कवितेतही शब्दांशिवाय मैफल तू मावत नाहीस संगीतातही
डोळ्यामध्ये व्याकूळ सागर मावत नाही सागरातही
आर्ततेची सदाफुली तू , मावत नाहीस अश्रूतही सूर्यासोबत संसार तुझा चांदणे झालीस आगीतही
सुगंधाचे तारांगण तुझ्या मारून गेले मरणासही
तुझ्या डोळ्यातील पावसाचे पहाड मावत नाहीत नभातही
तू दिलेली महाझुंज आता मावत नाही महायुद्धातही
तुझी कळकळ अशी असीम की मावत नाही कळकळीतही
गळ्यामधली गदगद तुझ्या मावत नाही दिगंतातही
तू थापलेल्या गोवऱ्या आता जळत नाहीत वणव्यातही
तू पेटवलेली चूल आता विझत नाही पावसातही
तू पेरलेल्या ज्वाला आता विझत नाहीत पुरातही
तुझे राणीपण असे अढळ की मावत नाही राजगृहातही
तुझ्या हृदयाचे झाड आता मावत नाही गगनातही
तू लावलेल्या दिव्यांचा मोर्चा विझत नाही वादळातही
2. रमाई
डॉ. प्रकाश मोगलेइच्छा , आकांक्षांचं गाठोडं खुंटीला टांगून ठेचाळलेले पाय झाकून घेत , सडा सारवणांनी सजवावं लागते अंगण !
संसाराचा गाडा चालण्यासाठी घालावं लागते उभ्या आयुष्याचं वंगण !
अंगणात उगवले झालं , वेली की मन भरून जाते
चुलीतल्या लाकडागत धुपणारं मन मग फुलून येते !
साऱ्या घरालाच आनंदाचं भरत येते
त्यासाठी देह आणि मनाचं तुलाच सरपण करावं लागते
असं अवघड बाईपण घेऊन तू रामजी बाबाच्या घरी आलीस ,
कसलं माप आणि कसला उंबरठा ? आमची आई झालीस
तसे यशोधरा , सावित्रीचे भोग तुझ्याही वाट्याला आले
पण साहेबांसोबत अवघ्या आयुष्याचे सोने झाले
महात्मेपणाच्या पाठी लागलेले
सगळेच पुरुष बायकांची खूपच परवड करतात
तुझ्या आठवणीनेही आई माझे डोळे झरतात आगीशी संसार करायचा तर धग लागणारच बाई !
निखारा पदरात बांधून घेतला तर चटका बसणारच माई !
महापुरुषांच्या जयजयकारात तुमच्या वाट्याला तशा उपेक्षाच येतात
तुमच्या बंद पापण्यातील आसवं इतिहासाला तरी कुठे दिसतात ?
पण हेही खरंच की , तुमच्यामुळेच महात्मे होतात
या अफाट आणि अचाट हिमालयाची झालीस तू सावली
अन् आम्हा सर्वांची माउली !
सर्वांनीच त्याला खूप खूप छळले म्हणून तो संतापायचा , चिडायचा , आग आग व्हायचा ! फक्त तूच समजून घ्यायचीस अन् समजावून सांगायचीस ,
आमचा बॅरिस्टर निमूटपणे ऐकून घ्यायचा , अन् तेवढ्यानेच तुझा चेहरा खुलायचा , सुकलेला गुलाब फुलायचा !
चूल बोळक्याचा संसार सगळेच करतात तुलाही खूप खूप आवड होती
पण तू अवघ्यांचा संसार नेटाने केलास
अन् आमचा बाबा सर्व क्षेत्रांच्या शिखरावर नेलास !
तू त्यांची दीपमाळ अन् आमची समई
तूच त्यांची जीवनज्योत अन् आमची आई
'रामू' या मृदू मुलायम शब्दाने तो तुला बोलायचा !
उग्र कठोर अहंकार फक्त तुझ्यापुढेच वितळायचा
तूही त्याला जपलेस , जोपासलेस लेकरागत बाई
वादळाला आवरणं अन् आभाळाला सावरणं तुलाच जमलं आई !
बहिष्कृतांच्या हितासाठी तो प्राणपणाने झटला , खुले झाले चवदार तळे
त्याच्या , तुझ्या त्यागानेच आज डवरलेत अवघे मळे !
तुझ्या बळावरच आई तो अवघ्या जगाशी झुंजला ,
क्रूर कठोर काळाशी अखंड झगडत राहिला , अन् तुला सांगतो जिंकला ही माणुसकीची लढाई !
त्यामुळेच आता वेगवेगळ्या क्षेत्रांवर आम्ही करत आहोत चढाई !
बुद्धांच्या कुशीत विसावताना डोळे भरून येतात आई !
एवढ्या लवकर आवरासावर का केलीस माई ?
भरल्या संसारातून उठून जाण्याची का केलीस घाई ?
तुला सांगतो , कुणाचंही बलिदान कधी वाया जात नसते
अन् बीजाला मातीत गाडून घेतल्याबिगर शिवार का फुलत असते ?
तुला सांगू माते !
तुझ अर्ध्या प्रवासातून निघून जाणं त्याच्या लई जिव्हारी लागलं
अन् तुझ्याशिवाय या जगात त्याचं जवळचं तरी कोण उरलं ?
भोवतीच्या घनघोर अंधाराशी अटीतटीने झंजणारा बाप आमचा
' रामू रामू ' करीत लेकरागत रडला ,
माते ! तुझ्यासाठी आमचा महासागर हेलावला !
3. रमाई
नामदेव लक्ष्मण ढसाळराजमाचीच्या घोड्यावर
सर्वच सवाष्णी बसतात
आपल्या त्यागाची बनारसी लुगडी वाळवीत
त्यानं कधी कुणाला खाऊ घातलंय काय ?
साधं दुःखाचं चिरगुटसुध्दा
वाफेच्या इंजिनाबरोबर चाके फिरतात गोलगोल पुढेपुढे
माणसाचे शापग्रस्त आरसे
होतात पुन्हा आरस्पानी नवे
आज तुझा एक अडगळीतला फोटो
माझ्या आठवणीत आहे
मरणानंतरही मरणे मेल्यावर
ती कोण हिरावून घेईल माझ्याकडुन ?
एक वेळ वाळवीला वाळवी लागेल
एक वेळ कसरीचा कसर
फोटो तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा
चारचौघांच्या खटल्यासारखा
त्यात सर्वच आहेत; तू, तुझ्या नणंदा, जावा, दीर,
लष्करातले मामंजी,
पोरंबाळं आणि साहेब आणि टांबी आणि निख्खळ कंन्टोन्मेट
पाठीमागे झाडझुडपांचं ग्राऊंड
वर्षानुवर्षे पाहात आलोय हे चित्र मी
साहेब तर परमेश्वराच्या छाताडावर बसल्यासारखे आजही वाटतात
सुपारी कातरणाऱ्या टिळकांच्या आतम्याला त्रास देत
रमाबाई, ही सर्व पुण्याई तुझीच आहे
तुझे चरित्र तुझ्या खस्ता
तुझे अश्रु तुझे उसासे तुझे शहाणपण
तुझ्या डोळ्यातले आदि अंताला स्पर्श करणारं कारूण्य
तुझ्या डोळ्यांतील ती निष्ठेची काळीशार पोत
तुझ्या चेहऱ्यावरले ते प्रासादिक औदासिन्य
कुष्णहातांच्या चटक्यांच्या कहाण्या सांगणाऱ्या बांगड्या
किती गं, सहन केलंस हे !
अष्टौप्रहर ती भटीण सरस्वती साहेबांच्या मागे असे !
सवतीमत्सर तुला करताच आला नाही का ग ?
पैसे पाठीवर घेऊन
पोरक्या ज्ञानेश्वराने
अम्रुताशी पैजा जिंकल्या
साहेबांच्या पाठीशी पैस होऊन तू
गुलामाच्या उध्दाराच्या ज्ञानेश्वरीची
पहिली अोळ लिहायला मदत केलीस...
डबक चाळीतल्या राजहंसांना
दगडी कोळशांच्या धुराची
तू लागू दिली नाहीस झळ
भांड्याला लागणारी भांडी
डोक्यानं फुटणारी डोकी
पटकी/ सटवी
तू चंदनाचं मूल्य केलंस कमी
तुझ्या मुक्या मनाची गाणी
कल्कीचा घोडा ह्या कलियुगात घेऊन फिरतो आहे
मराठी भाषेची ऐसी तैसी करत
हे बहीणाबाईच्या बहीणाई,
मरण्यापूर्वी एकदा तरी तुझे
गाणे ऐकवशील काय ?
या रांडाव मराठी भाषेला
पुन्हा सवाष्ण होताना पाहायचंय माला.




No comments:
Post a Comment