लहान मुलांच्या शाळा सकाळी नऊ नंतर भरवा #महाराष्ट्र राज्यातील शाळांसाठी शासन परिपत्रक जाहीर #विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण निर्णय - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, February 10, 2024

लहान मुलांच्या शाळा सकाळी नऊ नंतर भरवा #महाराष्ट्र राज्यातील शाळांसाठी शासन परिपत्रक जाहीर #विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण निर्णय

 




मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पुर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ नंतर भरवण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक जारी केले आहे. 


       शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत सहा प्रोत्साहनात्मक योजनाचा शुभारंभ करण्यासाठी राजभवनात दिनांक ५ डिसेंबर, २०२३ रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाषणादरम्यान मा. राज्यपाल महोदय यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केली होती.या सुचनेनुसार शाळांतील वेळेत महत्वपूर्ण बदल केला आहे. 


शासन परिपत्रकातील महत्त्वाचे मुद्दे


 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला. सदर अभ्यास करण्यासाठी राज्यातील शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण प्रेमी, पालक, तसेच प्रशासनातील अधिकारी यांचे देखील अभिप्राय नोंदविण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. गुगल लिंक वरील अभिप्राय व विविध शिक्षण तज्ज्ञ व शिक्षण प्रेमी व पालक यांच्याशी चर्चा केली असता, प्राधान्याने खालील महत्वाच्या बाबी समोर आल्याआहेत:


१. राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांपैकी काही शाळा विशेषतः खाजगी शाळा भरण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी ७ नंतर असल्याचे दिसून येते.


२. आधुनिक युगातील बदलेली जीवनशैली, मनोरंजनाची विविध साधने, शहरातील उशिरापर्यंत सुरु असलेल्या ध्वनिप्रदूषण उदा. वाहनांचा आवाज, विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने वाजविले जाणारे कर्कश संगीत इ. अशा अनेकविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे.


३. पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात.


४. सकाळी लवकर शाळा असल्याने विद्यार्थ्यांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसलेले दिसून येतात. त्यामुळे बऱ्याचदा अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी असलेला दिसून येतो. ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अध्ययनावर होतो.


५. मोसमी हवामान, विशेषतः हिवाळा व पावसाळा या ऋतू मध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे. पावसामुळे व थंडी मुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो. ते बहुदा आजारी पडतात.


६. सकाळी पाल्याला लवकर तयार करणे, जेवणाचा डबा तयार करणे आणि पाल्याला वेळेत शाळेत सोडणे यामुळे देखील अनेक पालकांची ओढाताण होते.


७. सकाळी लवकर भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्याना बस व व्हॅन द्वारे नेताना रस्त्यावरील धुके, पाऊस यामुळेही अडचणी निर्माण होतात.


८. यानुसार शाळेच्या वेळेत बदल करताना शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. अन्यथा शहरी भागात वाहतुकीच्या मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.


९. यानुसार शाळांच्या वेळेत बदल करताना दोन सत्रामध्ये भरणाऱ्या शाळांनी नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी दुस-या सत्राचा विचार करावा.


उपरोक्त परिस्थितीचा विचार करता सकाळी ९ पूर्वी भरणाऱ्या राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पुर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग भरविण्याच्या वेळात बदल करणे आवश्यक होते. यासाठी स्थानिक परिस्थितीचा विचार करून सकाळी ९ किंवा ९ नंतर राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या पुर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग भरविण्याबाबत खालील सूचना निर्गमित करण्यात येत आहेत:



अ) राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या ज्या शाळांची पुर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग भरण्याची वेळ सकाळी ९ वा. च्या अगोदरची आहे, त्या शाळांनी पुर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी ९ किंवा ९ नंतर ठेवावी.


ब) शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन अध्यापनाच्या निश्चित केलेल्या कालावधीत कोणतीही बाधा येणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी.


क) ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळांची वेळ बदलणे अगदीच शक्य होत नसेल त्यांच्या अडचणी प्रकरण परत्वे संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी / शिक्षण निरिक्षक (प्राथमिक) यांनी मार्गदर्शन देऊन सोडविण्याची तजवीज करावी. यासाठी संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने आपल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी / शिक्षण निरिक्षक (प्राथमिक) यांच्याशी संपर्क साधून प्रकरण परत्वे मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावी.

      नवीन शैक्षणिक वर्षांत म्हणजे जुन 2024 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. 

विद्यार्थी व पालकांच्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्त्वाचा व योग्य निर्णय आहे अशी प्रतिक्रिया ग्रंथपाल आरती शर्मा यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News