क्रांतीकारी विचारांचा वसा घेतलेला निष्ठावंत कार्यकर्ता : प्रो. डॉ.आनंद भालेराव
-उप प्राचार्य डॉ.पंजाब शेरे
बळीराम पाटील महाविद्यालय किनवट येथील रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर आनंद भालेराव हे नियत वयोमानपरत्वे सेवानिवृत्त होत आहेत , त्यानिमित्त उपप्राचार्य डॉ.पंजाब शेरे यांनी घेतलेल्या त्यांच्या सामाजिक , शैक्षणिक व राजकिय कार्याचा लेखाजोखा येथे देत आहोत. -संपादक
महाराष्ट्राच्या सीमेलगत बसलेला आदिवासी,दुर्गम, डोंगराळ भाग म्हणून किनवट तालुक्याची ओळख आहे .
किनवट तालुक्याचे भाग्यविधाते स्मृतीशेष उत्तमरावजी राठोड साहेब यांच्या कल्पक दृष्टिकोनातून शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी किनवट शिक्षण संस्थेचे,बळीराम पाटील कला व वाणिज्य महाविद्यालय इ.स.१९७२ उभारले गेले व विज्ञान शाखा १९८९ सुरू करण्यात आले.'रसायनशास्त्र'या विषया करिता डॉ .आनंद भालेराव यांची निवड करण्यात आली.
विदर्भ प्रांतातील रामपुरी पोस्ट मुरमाडी तालुका लाखनी जिल्हा भंडारा येथे अत्यंत गरीब कुटुंबांमध्ये डॉ. आनंद भालेराव यांचा जन्म झाला.
त्यांचे प्राथमिक शिक्षण रामपुरी येथे तर माध्यमिक शिक्षण मुरमाडी येथे झाले . महाविद्यालयीन शिक्षण मिलिंद विज्ञान महाविद्यालय (नागसेन वन) औरंगाबाद येथे झाले .त्यांनी एम .एससी 'रसायनशास्त्र'या विषयांमध्ये पूर्ण केले.यशवंत महाविद्यालय नांदेड येथे एम.एससी पूर्ण केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड येथे पी.एचडी पूर्ण केले त्यांच्या पीएचडीचा विषय हा समाज उपयोगी होता.
'वॉटर क्वालिटी ऑन लेक्स ऑफ किनवट तालुका नांदेड डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र.' या विषयावर संशोधन केले.
अत्यंत गरिब ,दारिद्र्य व वंचित घटकातील एक होतकरू विद्यार्थी म्हणून त्यांची ओळख आहे.पुढे रोज मजुरी , हॉटेलमध्ये वेटरचे काम,शिक्षणाची तहान भागवण्यासाठी औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर कुलीचे काम,बैल बाजारामध्ये खरेदी विक्री पावती लिहिण्याचे काम केले.
मिलिंद महाविद्यालय ,औरंगाबाद येथे कमवा व शिकवा या योजनेअंतर्गत काम करून शिष्यवृत्ती मिळवली आहे .
आयुष्यामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन जीवन फुलवण्यासाठी संघर्ष हाच जीवनाचा मार्ग समजून अनेक समतावादी विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मार्गदर्शन शिबिरे त्यांनी आयोजित केलेली आहे.सामाजिक प्रबोधनासाठी
नवे ग्रंथ अभ्यासणे, शिष्यवृत्ती आंदोलनाचे नेतृत्व करणे , 'नामांतर'आंदोलनामध्ये सहभागी होऊन बावीस दिवस 'जेल'ही भोगावे लागलेली होते.
सामाजिक उपक्रमांचे आयोजन करणे, सामाजिक समस्या सोडवणे हा त्यांचा पिंड राहिलेला आहे.सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यात ते सतत सहभागी होत आलेले आहेत.
यशवंत वस्तीगृह,नांदेड येथे कम्युनिस्ट विचाराचे सुभाष जाधव यांचा राजकीय प्रचार करण्यासाठी किनवट येथे आले असता त्यांनी सर्वप्रथम बळीराम पाटील महाविद्यालय हे डोळे भरून पाहिले. या परिसराचे भाग्यविधाते स्मृतीशेष उत्तमरावजी राठोड साहेब यांच्या कल्पक शैक्षणिक दृष्टिकोनातून एक अभ्यासू म्हणून आनंद भालेराव यांची १९९१ वर्षांमध्ये 'रसायनशास्त्र' विषयाचे अधिव्याख्याता म्हणून निवड करण्यात आले.
त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, सांस्कृतिक विभाग,परीक्षा विभाग , उपप्राचार्य म्हणून काम करीत असताना त्यांनी अनेक समाज उपयोगी व विद्यार्थ्यांच्या हितासाठी कल्याणकारी योजना राबवलेली आहेत. विद्यार्थ्यांच्या वैचारिक प्रबोधनासाठी सांस्कृतिक विभागाची धुरा सांभाळताना अनेक नामवंत साहित्यिकांचे लेखकांचे विचारवंतांचे व्याख्याने त्यांनी आयोजित केलेली आहेत .
महाविद्यालयातील विविध केलेल्या कार्याची पावती म्हणून संस्थेने त्यांना २००४ते २००६ या कालावधीत महाविद्यालयाचे 'उपप्राचार्य'म्हणून निवड केलेली आहे.
त्यांची ग्रंथसंपदा ही मौल्यवान आहे.
'दि कॉन्स्टिटयूशन ऑफ इंडिया -रोल ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर '
'दि.मेकर ऑफ मॉर्डन इंडिया डॉ. बी. आर. आंबेडकर.'
'ऑरगॅनिक स्पेक्ट्रॉसकॉपी -प्रिंसिपल्स अँड अँप्लिकेशनस'
'बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी का जीवन एवम कार्य'
'भगवान बुद्ध निर्मित चार आर्य सत्य एवम अष्टांगिक मार्ग'
.'मी अण्णाभाऊ साठे बोलतोय'
एक उत्तम कवी,लेखक, साहित्यिक, संशोधनात्मक म्हणून त्यांनी अनेक चर्चासत्र, परिषदेत राष्ट्रीय, राज्यस्तरीय संशोधन पेपर वाचन केले.
इ.स. १९९४ पासून बहूजन समाज पार्टीमध्ये ते सक्रिय झाले.
बहुजन समाज पार्टीच्या वतीने किनवट विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उमेदवारी दाखल करून ताकतीने ती लढवलेली आहे.
पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 'निरीक्षक'म्हणून कार्य केले. बहुजन समाज पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष, जिल्हा महासचिव, जिल्हा प्रभारी, नांदेड झोन प्रभारी, मराठवाडा झोन प्रभारी, स्टार प्रचारक महाराष्ट्र राज्य,'लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रभारी'अशी महत्त्वाची जबाबदारी डॉ.आनंद भालेराव यांनी सांभाळले आहेत.१९९८ते २०२४ पर्यंत त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना, नागरिकांना, तरुणांना ,बहूजन समाज पक्षाची ध्येय आणि धोरणे पटवून दिले.याकरिता 'कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे'त्यांनी आयोजित केलेली आहेत. आर्थिक,सामाजिक मुक्तीसाठी अनेक मार्गदर्शन मेळावे घेतले.
'जि सकी जितनी संख्या भारी, उतनी उनकी भागीदारी'
या घोषणे प्रमाणे कांशीरामांचे राजकीय स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी पायाला भिंगरी बांधून फिरत राहिले. अत्यंत स्पष्ट साधं आणि संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचीओळख आहे.जोरात बोलणे, क्षणांत रागवणे व क्षणातच हसणे ही त्यांची काही व्यक्तीमतवाचे वैशिष्ट्य आहेत.त्यांनी कधीही नाराज ,दुःखी ,खिन्न, उदास राहिलेले नाहीत.उद्भवलेल्या समस्यांना डगमगून न जाता त्या समस्येचे अत्यंत ताकतीने उत्तर ते देत आले आहेत.अत्यंत कर्तव्यनिष्ठ व्यक्ती म्हणून ओळखले जातात. महामानवाच्या क्रांतिकारी विचारातून प्रेरणा घेऊन पुढे धम्माच्या विचाराचा प्रचार प्रसार करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. त्यांचे शिक्षण हे समाजासाठी अत्यंत मोलाचे आहे. बळीराम पाटील महाविद्यालय, किनवट येथे स्थानिक मुक्टा संघटनेचे अध्यक्ष व जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्य केले.ते निष्ठावंत सक्रिय कार्यकर्ते आहेत .प्राध्यापकांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटनेच्या वतीने आयोजित विविध आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग नोंदविलेला आहे. सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्य करतांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले.डॉ. आनंद भालेराव हे तीन वेळेस मृत्यूच्या तोंडातून बाहेर आले.कोराना सारख्या संसर्गजन्य आजारावर मात करून आयुष्य फुलविले आहे.आज दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी ते प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचे जीवन मंगलमय जावे हीच सदिच्छा !
- प्रा. डॉ.पंजाब शेरे ,
उपप्राचार्य,
बळीराम पाटील महाविद्यालय, किनवट
No comments:
Post a Comment