![]() |
(सर्व छाया चित्र : विकास गिमेकर) |
किनवट : दुर्गम व कमी विकसीत भागातील नागरीकांचे जीवनमग्न सुधारणे , विद्यमान योजनांचे एकत्रीकरण करून योग्य परिणाम साधने करिता आखलेल्या " आकांक्षित तालुका कार्यक्रम " अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी तळागाळापर्यंत जाऊन कौतुकास्पद कामगिरी केल्यामुळेच किनवट तालुका हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. भविष्यातही या दुर्गम भागाच्या विकासासाठी सर्वांनी असेच मनलावून झटून काम करावे. असे प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी केले.
येथील एन.के. गार्डनमध्ये नीती आयोग : भारत सरकार अधिनस्त आकांक्षित किनवट तालुका कार्यक्रम , पंचायत समिती , किनवटच्या वतीने आयोजित " संपूर्णता अभियान सन्मान सोहळा व 'आकांक्षा हाट ' शुभारंभ कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते.
यावेळी तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर , गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड , प्र. बालविकास प्रकल्प अधिकारी शिवाजी जामोदे , सामाजिक कार्यकर्ते दयानंद दराडे मंचावर उपस्थित होते. गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले. केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
दीप प्रज्वलन झाल्यानंतर शाल , पुष्पगुच्छ व ग्रंथ भेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत समावेशित ५०० तालुक्यात जुलै ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत संपूर्णता अभियान राबविण्यात आले होते. यात किनवट तालुक्याने ६ पैकी ४ निर्देशक संपृक्त केले आहेत. किनवट तालुक्याने राज्यातील २७ तालुक्यातुन तिसरे स्थान प्राप्त करून यश प्राप्त केले आहे. कौतुकास्पद कामगिरी केलेले तत्कालीन गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव , निवृत्त जिल्हा मृद सर्वेक्षण व चाचणी अधिकारी प्रकाश पल्लेवाड , तत्कालीन कृषी अधिकारी बालाजी मुंडे व त्यांचे 24 कृषी सहायक , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. के.पी. गायकवाड व त्यांचे 8 सीएचओ , 9 एएनएम , 1 बीसीएम , 9 आशावर्कर , तत्कालीन बाल विकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठकरोड व त्यांच्या 15 अंगणवाडी सेविका , विस्तार अधिकारी (पं) निवृत्ती मुकनर , आकांक्षित तालुका फेलो पांडुरंग मामीडवार , पोषण परसबाग निर्मिती टीम लीडर गंगाधर घ्यार यांचा प्रशस्ती पत्र व ग्रंथ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
*आकांक्षा हाट चे उदघाटन...*
व्होकलं फॉर लोकल उपक्रमाअंतर्गत स्थानिक उत्पादनाचे प्रदर्शन आणि प्रचार करण्यासाठी याच कार्यक्रमात आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते 'आकांक्षा हाट' चे उदघाटन करण्यात आले . यात उमेद अभियान अंतर्गत महिला स्वयंसहायता समूह, किनवट स्थित अतिप्रभावित मेगा पाणलोट प्रकल्प टिम, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय यांनी सदर प्रदर्शनात सहभाग नोंदविला. यात स्थानिक स्वादिष्ट पदार्थ, हस्तनिर्मित कपडे, रानभाज्या, वस्तू, जैविक औषधे आणि इतर स्थानिक उत्पादीत वस्तुसह विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात आली.
*आव्हाने असूनही, सरकारी योजनाबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी, स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि एकंदरीत देशाच्या सर्वांगीण विकासात योगदान देण्यासाठी आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत आकांक्षा हाट हे विधायक बदलाचे एक महत्वपूर्ण पाऊल आहे.*
*भीमराव केराम, आमदार, किनवट माहूर विधानसभा मतदार संघ*
*सदर अभियानात समावेशित निर्देशक – (जुलै ते सप्टेंबर २०२४)*
१. गर्भवती महिलांची पहिल्या तिमाहीतील नोंदणी
2. ३० वर्षावरील सर्व नागरिकांची मधुमेह संदर्भात तपासणी
3. ३० वर्षावरील सर्व नागरिकांची उच्च रक्तदाब संदर्भात तपासणी
4. गर्भवती महिलांना पूरक पोषण आहाराचे वितरण
5. मृदा आरोग्य पत्रिकेचे वितरण करणे
6. नोंदणीकृत सर्व SHG ना फिरत्या निधीचे वितरण
*सदर अभियान कालावधीत संपृक्त निर्देशक –*
१. ३० वर्षावरील सर्व नागरिकांची मधुमेह संदर्भात तपासणी
2. ३० वर्षावरील सर्व नागरिकांची उच्च रक्तदाब संदर्भात तपासणी
3. गर्भवती महिलांना पूरक पोषण आहाराचे वितरण
4. मृदा आरोग्य पत्रिकेचे वितरण करणे
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन अधिक्षक अमोल टोम्पे, कृषि अधिकारी सिकंदर पठाण, सहाय्यक लेखा अधिकारी सुनिल नेम्माणीवार, वरिष्ठ सहाय्यक राजेश म्याकलवार, विस्तार अधिकारी कैलास गायकवाड, जीवन कांबळे, श्रीमती एस . एल. चव्हाण, आकांक्षित तालुका समन्वयक पांडुरंग मामीडवार, कनिष्ठ सहाय्यक अंकुश राठोड, इतर कार्यालयीन कर्मचारी, सर्व ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, कृषि सहाय्यक, समुदाय आरोग्य अधिकारी, केंद्र प्रमुख , एएनएम, आशा, अंगणवाडी सेविका, आयसिआरपी यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment