६ डिसेंबर हा भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस. या दिवशी आधुनिक भारताचे शिल्पकार, भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पी, सामाजिक न्यायाचे प्रखर पुरस्कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १९५६ साली निर्वाण झाले. त्यामुळे हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून पाळला जातो. “महापरिनिर्वाण” म्हणजे जन्म–मृत्यूच्या पलीकडील अवस्था, आणि बाबासाहेबांच्या विचारांनी व कार्याने समाजाला दिलेली दिशा यामुळे या दिवशी त्यांना विशेष आदरांजली अर्पण केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधानकार नव्हते; ते अर्थतज्ज्ञ, समाजसुधारक, कायदेतज्ज्ञ, शिक्षणप्रेमी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानवी मूल्यांचे संवर्धक होते. भारतीय संविधानाची निर्मिती करताना त्यांनी बुद्धप्रेरित समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूलभूत तत्वांना राष्ट्राच्या केंद्रस्थानी ठेवले.अस्पृश्यता निर्मूलन, महिलांचे सक्षमीकरण, शैक्षणिक हक्क, कामगार सुधारणा यामध्ये त्यांनी केलेल्या कार्याचे भारतीय समाजावर दीर्घकालीन परिणाम झाले. त्यांच्या विचारांनी व धर्मांतर आंदोलनाने भारतीय बौद्ध धम्माचा नवा प्रवास सुरू झाला. भारतामध्ये भीम युगाचा प्रारंभ झाला. सर्व भारतीयांना स्वाभिमानाने,आत्मविश्वासाने सामाजिक जीवन जगण्याचा हक्क मिळाला. महापरिनिर्वाण दिन हा केवळ स्मृतीदिवस नसून विचारांचे पुनर्परीक्षण आणि सामाजिक बांधिलकीची आठवण करून देणारा दिवस आहे.
या दिवशी लाखो भीमअनुयायी आणि भीमविचारांचे पाईक चैत्यभूमी (दादर, मुंबई) येथे उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन करतात.
याप्रसंगी आपण सर्वांनी त्यांच्या शिकवणीचे पुनरावलोकन,सामाजिक एकतेचे संदेश,संविधानातील मूल्यांचे संवर्धन,वंचित समाजाच्या प्रश्नांवर चर्चा
करून बाबासाहेबांनी दिलेले विचार आचरणात कसे प्रतिबिंबित होतील? याची दक्षता घेऊन वाटचाल केली पाहिजे जेणेकरून बाबासाहेबांनी पाहिलेला स्वप्नातील भारत लवकरात लवकर उदयास यावा. आजही अनेक सामाजिक विषमता, शिक्षणातील अडथळे आणि आर्थिक असमानता पाहता, डॉ. आंबेडकरांचे विचार पूर्वीसारखेच प्रासंगिक आहेत.
त्यांनी दिलेला संदेश – “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” – आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक दीपस्तंभच आहे.
समता, न्याय आणि मानवी हक्क या मूल्यांवर आधारित समाज उभारण्यासाठी त्यांच्या तत्त्वज्ञानाची गरज अधिकच भासते. महापरिनिर्वाण दिन हा महान व्यक्तिमत्त्वाला आदरांजली अर्पण करण्याचा दिवस असला तरी तो एक प्रेरणा घेण्याचा दिवसही आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि कार्य आपल्याला सामाजिक उत्तरदायित्व, संघर्षशीलता आणि मानवतेचा आदर्श दाखवते.
त्यांच्या कार्याचा वारसा जपणे, संविधानातील मूल्यांचे रक्षण करणे आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत न्याय व समतेची अनुभूती पोहोचवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
-विजयकुमार नारायणराव काळे
(९७६७७७३३४९ )




No comments:
Post a Comment