किनवट :
शहर परिसरात व तालुक्यात मागील अनेक महिन्यांपासून सोयाबिन व कापसाची खरेदी व्यापारी करीत आहेत. त्यातील काही व्यापारी हे किती क्विंटल शेतमालाची खरेदी केली याचा निश्चित आकडा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे सादर करीत नाहीत. खरेदिचा जो काही आकडा व्यापारी सांगतात त्यावर अवलंबूनच बाजार समितीचे संबंधीत कर्मचारी बाजार समितीची फी आकारतात.यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे नुकसान होत आहे. या गैरप्रकारात जिल्हा प्रशासनाने व सहकार विभागाने लक्ष घालावे व संबंधित दोषी व्यापा-यांविरुध्द कडक कारवाई करावी, अशी मागणी जागृत शेतकऱ्यांतून होत आहे.
शहर परिसरात जवळपास १८ व्यापारी तर तालुक्यात अनेक व्यापारी हे बाजार समितीचा परवाना असो वा नसो सोयाबीनची व कापसाची खरेदी करत आहेत. खरेदी केलेल्या कापसाच्या व सोयाबीनच्या पावत्या देतांना पक्या पावत्या देण्याऐवजी शेतकऱ्यांना कच्या पावत्या देऊन जी.एस.टी.कर चुकवीत आहेत. अपवादात्मक व्यापारी सोडले तर जवळपास तालुक्यातील सर्वच व्यापारी हा प्रकार करत आहेत. अनेक व्यापा-यांकडे तर प्रमाणीत वजन काटेही नाहीत. यामुळे मापात पाप करुनही व्यापारी हे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. याकडे वजने व मापे कार्यालयाच्या निरिक्षकाने लक्ष देणे गरजेचे आहे.
शेती मालाची खरेदी करणारे व्यापारी हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी व संचालकांना हाताशी धरुन व त्यांच्याशी अर्थपुर्ण व्यवहार करुन प्रत्यक्ष खरेदी केलेला माल कमी खरेदी केल्याचे दाखवून बाजार समितीचे कमी शुल्क भरतात, या मोबदल्यायात ते संचालकांचा खिसा गरम करतात. खरे तर या प्रकारामुळे बाजार समितीचे नुकसानच होत आहे.
याबाबत नाव न सांगण्याच्या अटीवर एका व्यापाऱ्याने माहिती दिली की, शहरातील व्यापारी शेतमाल खरेदीचे शुल्क म्हणून वर्षांला १८ लाख रुपये एकत्र करुन बाजार समितीकडे भरतात. यानंतर त्यांना अमर्याद शेतमालाची खरेदी करुन बाजार समितीचे शुल्क चोरण्याची मुभाच मिळते. या पार्श्र्वभूमीवर कर विभागाने भूसार व्यापा-यांवर धाडी टाकाव्यात व शासनाचे कर चुकविणा-यांत दहशत निर्माण करावी, अशी मागणी शेतक-यांची आहे.
No comments:
Post a Comment