किनवट : येथील जवाहेरुल उलूम उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील आदिना मरयम मोहम्मद अतीक या विद्यार्थिनीस केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे यांचे हस्ते "'वन नेशन, वन स्टुडन्ट कार्ड'", या भारत सरकारच्या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत तालुक्यातील पहिल्या "अपार आयडी" कार्डचे वाटप करण्यात आले.
भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती आणि यशाचा मागोवा घेणे या उद्देशाने ' एक राष्ट्र , एक विद्यार्थी कार्ड , ' या प्रणाली अंतर्गत "अपार आयडी " ( ऑटोमॅटिक परमनंट अकॅडमी अकाउंट रजिस्ट्री ) हा बारा अंकी कायमस्वरूपी ओळख क्रमांक देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला दिल्या जात आहे. विद्यार्थ्यांचे व पालकांचे आधार कार्ड घेऊन युडायस पोर्टलवरून हे कार्ड जनरेट करण्यात येत आहे.
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, योजना शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे यांच्या नेतृत्वा व गट शिक्षणाधिकारी गंगाधर राठोड यांच्या संयोजनात तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक "अपार आयडी" जनरेट करण्याचे काम मिशन मोडवर करीत आहेत.
या अनुषंगाने परिक्षेत्र : किनवट-एकचे शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी मोकळे व नयाकॅम्प, किनवट केंद्राचे केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे यांनी सर्व व्यवस्थापनाच्या , सर्व प्रकारच्या व सर्व माध्यमाच्या शाळांचे मुख्याध्यापक व प्राचार्य यांची सहविचार सभा महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा येथे घेऊन "आपार आयडी" जनरेट करण्याविषयी पीपीटी प्रेझेंटेशन द्वारे सविस्तर मार्गदर्शन केले. त्यामुळेच सर्वच मुख्याध्यापक प्राधान्याने हे कार्य करीत आहेत.
26 नोव्हेंबर रोजी जवाहेरूल उलूम उर्दू शाळेतील एकूण 873 विद्यार्थ्यांपैकी फक्त 17 विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात आली होती. केंद्र प्रमुखांनी त्यांना योग्य मार्गदर्शन केल्याने तसेच डाटा एन्ट्री ऑपरेटर शेख युनूस यांचेकडून सर्व त्रुटींची पूर्तता करून घेतल्याने आज रोजी 80 टक्के पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे "अपार आयडी" जनरेट झाले आहेत. त्यातीलच आदिना मरयम मोहम्मद अतीक या विद्यार्थिनीस तालुक्यातील पहिलं "अपार आयडी कार्ड" केंद्रप्रमुख उत्तम कानिंदे यांचे हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका अस्मा खातून अब्दूल गफार, इशरत देशमुख व मोहम्मद अतीक यांचेसह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
" हे कार्ड म्हणजे शिक्षण माहिती पत्रच आहे.
- डॉ. सविता बिरगे , शिक्षणाधिकारी (प्रा ) , जि.प. नांदेड
" नवीन शैक्षणिक धोरणातील हे कार्ड डिजी लॉकर सारखे एडूलॉकर असेल .
-माधव सलगर , शिक्षणाधिकारी (प्रा ) , जि.प. नांदेड
" विद्यार्थ्याला कोणती शिष्यवृत्ती मिळते, कोणत्या शैक्षणिक योजनांचा लाभ मिळतो , याचा लेखाजोखाच हे कार्ड असेल .
-दिलीपकुमार बनसोडे, शिक्षणाधिकारी (यो ) , जि.प. नांदेड
"विद्यार्थ्याने कोणत्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेतले त्याला कोणती बक्षीसं , प्रमाणपत्र मिळाले , हे कार्डवर असेल .
- गंगाधर राठोड , गट शिक्षणाधिकारी , पं.स . , किनवट
" विद्यार्थ्यांचा 12 अंकी कायमस्वरूपी ओळख क्रमांक असेल , शाळा बदलली तरीही माहिती जतन असेल .
-बालाजी मोकळे , शिक्षण विस्तार अधिकारी , परिक्षेत्र : किनवट -1
"विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि क्रीडा निपुणता याचा आलेखच हे कार्ड असेल .
-उत्तम कानिंदे , केंद्र प्रमुख , नयाकॅम्प , किनवट
No comments:
Post a Comment