पुराच्या विळख्यात अडकलेल्या विविध ठिकाणच्या 10 व्यक्तींना प्रशासनाच्या (एसडीआरएफ) टीमने सुखरूप बाहेर काढले ; अनेकांना सुरक्षितस्थळी हलविले - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, August 30, 2025

पुराच्या विळख्यात अडकलेल्या विविध ठिकाणच्या 10 व्यक्तींना प्रशासनाच्या (एसडीआरएफ) टीमने सुखरूप बाहेर काढले ; अनेकांना सुरक्षितस्थळी हलविले




नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या अनेक गावात पुराचे पाणी आले आहे. अनेक नागरिकाना स्थानिक प्रशासनाच्या वतीने बचाव कार्य करुन सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. आज सकाळी टाकळी येथे झाडावर अडकलेल्या व्यक्तीला बिलोली येथील स्थानिक प्रशासनाच्या टीमने सुखरूप बाहेर काढले.


       आज दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता तलाठी अटकळी यांनी  उपविभागीय अधिकारी बिलोली क्रांती डोंबे यांना कळविले की, मौजे टाकळी खुर्द येथे मन्याड नदीच्या पुरामध्ये एक इसम वाहून गेला असून त्याने झाडावर आश्रय घेतला आहे. त्या अनुषंगाने उप विभागीय अधिकारी बिलोली यांनी   नायब तहसीलदार बिलोली बालाजी मिठेवाड यांच्यासह  सहाय्यक महसूल अधिकारी राजेश्वर आलमवाड ,  महसूल सहाय्यक शेख युनूस व  बोट ऑपरेटर आशिष जनार्दन आंबोडे यांच्या पथकासह टाकळी खुर्द येथे पोहचून संबंधित व्यक्तीला पुरातून बाहेर काढण्याचे निर्देश दिले. सदरील पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी  बोट नदीमध्ये टाकून संबंधित व्यक्तीला  बोटीच्या सहाय्याने बाहेर काढले. त्याचे नाव मारोती हनमंत कोकणे राहणार वझरगा असे आहे.  सदरील व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी मंडळ अधिकारी कल्पना मुंडकर , ग्राम महसूल अधिकारी प्रणिता काळे ,शिवाजी  घोंगडे, चव्हाण, ललित पाटील ,मिलिंद सुपेकर, बीट जमादार काळे , पोलीस प्रशासन व टाकळी गावचे सरपंच व गावकरी तसेच अटकळी गावच्या लोकांनी सहकार्य केले आहे.


बेटमोगरा शिवारामध्ये दोन दिवसापासुन अडकलेले मौला शेख यांना सुरक्षितपणे बाहेर काढले



मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथे मन्याड नदीला आलेल्या पुराचे वेढ्यात बेटमोगरा शिवारामध्ये दोन दिवसापासुन अडकलेले मौला शेख यांना जिल्हाधिकारी  राहुल करडीले यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी देगलूर अनुप तहसीलदार मुखेड राजेश जाधव  यानी  एसडीआरएफ पथकाचे मदतीने राञी सुरक्षितपणे बाहेर काढले. जिल्हा प्रशासन दक्ष असून जिल्ह्यात जिथे नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत तिथे एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन यांच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे.


प्रशासन नेहमी दक्ष असून नागरिकांच्या मदतीसाठी तत्परतेने कार्यवाही सुरू



दिनांक 28.8.2025 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच कोट्या येथील तलाव फुटल्याने मुखेड शहरातील फुलेनगर वस्तीमध्ये पाणी येऊन अंदाजे 150 घरात पाणी गेले. या घरातील 250 लोकाना नगर परिषद प्रशासन, तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन व शहरातील नागरीकाचे मदतीने तात्काळ मुखेड येथील जि.प.शाळा व सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव यांनी दिली आहे.



बेटमोगरा शिवार मध्ये अडकलेल्या व्यक्तीला रात्री 11 वाजता काढले सुखरूप बाहेर 



नांदेड, दि. ३० ऑगस्ट:- दिनांक 28 ऑगस्ट रोजी माऊली तालुका मुखेड येथील व्यक्ती मौला नबीसाब शेख हे मौजे बेटमोगरा या शिवारामध्ये अडकलेले होते. संबंधित व्यक्ती बेटमोगरा येथे किराणा खरेदी करण्यासाठी आले होते. सायंकाळी माऊली कडे जात असताना उच्या पुलाजवळ पाणी आल्यामुळे पुलाला लागून असलेल्या शेडमध्ये त्यानी आश्रय घेतला. परंतु पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे बाहेर पडता आले नाही. त्यानी संपूर्ण रात्रभर शेडमध्येच आश्रय घेतला व मोठ्या हिमतीने तिथेच थांबले. ही गोष्ट स्थानिक प्रशासनाला समजली तेव्हा उपविभागीय अधिकारी देगलूर यांनी तहसीलदार मुखेड यांच्याशी संपर्क साधला. तहसीलदार मुखेड यांनी स्थानिक नगरपालिका बचाव टीम आणि पोलीस निरीक्षक मुखेड त्या ठिकाणी पोहोचले परंतु पाण्याचा प्रवास जास्त असल्याने संबंधित व्यक्तीला बाहेर काढता आले नाही. त्यामुळे  जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित व्यक्तीला एस डी आर एफ मार्फत तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने एसडीआरएफ टीमने देगलूर तालुक्यामधील मेदनकाल्लूर गावामधील पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित हलवल्यानंतर तात्काळ बेटमोगराकडे रवाना झाले. उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांनी SDRF टीम सोबत रात्री साडेनऊ वाजता त्या ठिकाणी पोचले. रात्रीची वेळ असल्याने आणि पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने संबंधित व्यक्तीशी संपर्क होत नव्हते. संबंधित परिस्थिती लक्षात घेता स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने एसडीआरएफ टीम संबंधित व्यक्ती पर्यंत पोहोचून त्याला सुरक्षित रित्या रात्री अकरा वाजता बाहेर काढले. एसडीआरएफ टीमचे नेतृत्व श्री. राठोड आणि संकपाळ साहेबांनी मोठ्या धाडसाने संबंधित रेस्क्यू ऑपरेशन केले. 


या बचाव कार्याचा जिल्हाधिकारी राहुल कर्डीले ही वेळोवेळी आढावा घेत होते. यावेळी प्रशासनामार्फत देगलूर उपविभागीय अधिकारी अनुप पाटील तहसीलदार मुखेड राजेश जाधव पोलीस निरीक्षक मुखेड केंद्रे संबंधित ग्रामस्थ आणि स्थानिक प्रशासन उपस्थित होते.


मेदनकल्लूर गावातील ८ नागरिकांना पुराच्या पाण्यातून एसडीआरएफ टीमच्या मदतीने काढले सुखरुप बाहेर


नांदेड दि. ३० ऑगस्ट :- देगलूर तालुक्यामधील मेदनकाल्लूर या गावांमध्ये आठ लोक पुराच्या पाण्यामुळे अडकलेले होते. दिनांक 27 ऑगस्टपासून निजामसागर धरणाचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळे त्याचा फटका देगलूर तालुक्यामधील तमलूर, मेदनकल्लूर, उमर सांगवी या गावांना बसला. त्या अनुषंगाने प्रशासनामार्फत 27 ऑगस्ट रोजी प्रत्येक गावी भेट देऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याचे आवाहन करण्यात आले होते. 


मेदनकाल्लूर गावांमधील आठ व्यक्तींना प्रशासनामार्फत वेळोवेळी संपर्क साधून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी आवाहन केले होते. तरी देखील संबंधित व्यक्ती  गावामधून बाहेर पडले नाहीत. 28 ऑगस्ट रोजी प्रशासनामार्फत संबंधित व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी गेले असता संबंधित व्यक्ती पळून जाऊन गावामध्ये लपून बसले. परंतु पाण्याचा प्रवाह वाढतच राहिल्याने प्रशासनाने काल 29 ऑगस्ट 2025 रोजी एसडीआरएफ टीमच्या मदतीने संबंधित  1)सिद्धी आनवर देसाई.2)सिद्धी आसलम देसाई3) सिद्धी मुक्रम देसाई4)सिद्धी शाकीर सिद्धी मूनतान  देसाई 5)पाशा देसाई      

6)सिद्धी शरीफ देसाई 7)बागवानिन अमीन खान 8)मुमताज अमुजामी यांना सायंकाळी सहाच्या सुमारास सुरक्षित रित्या बाहेर काढले. यावेळी प्रशासनामार्फत उपविभागीय अधिकारी देगलूर अनुप पाटील तहसीलदार देगलूर भरत सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक मारुती मुंडे स्थानिक प्रशासन आणि संबंधित ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.


प्रशासनाची तत्परता!



काल २९ ऑगस्ट रोजी बिलोली तालुक्यातील मौजे नागनी येथील मांजरा नदी पात्राचे पाणी गावात शिरून काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे  व तहसीलदार शिंदे  यांच्या मार्गदर्शनाखाली नागनी गावातील महिला व नागरिक यांना कुंडलवाडी येथे के रामलू मंगल कार्यालय येथे सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. येथे प्रशासनाच्यावतीने त्याच्या निवासाची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News