नांदेड :
पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीला दुय्यम स्थान दिले गेले असून तिची ओळख म्हणजे शरीर हेच बहुतांश प्रमाण मानलं गेलं आहे. सामाजिक प्रश्न म्हणून स्त्रियांचे कुठलेच प्रश्न स्वीकारले गेले नाहीत. असे मत भारतीय स्त्री शक्ती नांदेडच्या अध्यक्षा सुरेखा किनगावकर यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले जयंतीच्या औचित्याने समग्र शिक्षा अभियान व भारतीय स्त्रीशक्ती शाखा नांदेडच्या वतीने कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ व स्त्री आरोग्य या विषयावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई जवळगावकर या होत्या.
मंचावर जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती माधवराव मिसाळे गुरुजी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, स्त्री शक्तीच्या क्षमा करजगावकर ,अर्चना झाडबुके, शिक्षण विस्तार अधिकारी शिरीष आळंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी बोलताना किनगावकर पुढे म्हणाल्या की ,स्त्रियांचे बेसिक प्रश्न खूप वेगळे आहेत .महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्त्रियांसाठी स्वतंत्र शौचालय असणे गरजेचे आहे. नांदेडमध्ये अशी तीन स्वच्छतागृहे स्त्री शक्तीच्या प्रयत्नातून स्थापन करण्यात आली असून आणखी सर्व ठिकाणी शौचालयाची गरज आहे. श्रमिक महिला ,बाजारात माळवं विकणाऱ्या महिलांसाठी स्वच्छतागृहांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगीतले.
कुटुंब संवाद अभ्यास मंडळ गतवर्षीची मी टू चळवळ आदींबाबत त्यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांनी याबाबत लक्षवेधी मत मांडले .स्त्रियांचा छळ होताना दिसत आहे . तरीही पुरुष गप्प राहतात . त्यासाठी महिलांनीच जागरूक राहणे गरजेचे आहे. विविध कार्यालयांमध्ये तक्रार निवारण समिती असणे आवश्यक असताना अनेक ठिकाणी तक्रार निवारण समित्या नाहीत , काम केले जात नाही याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. स्त्रियांनी सक्षमपणे उभे राहणे महत्त्वाचे असून आपले आरोग्य जपणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांनी केले. स्त्रियांचे प्रश्न व कायद्याच्या अमलबजावणीकडे त्यांनी लक्ष वेधले.
शिक्षण व आरोग्य सभापती माधवराव मिसाळे गुरुजी यांनी महिलांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी कायदा करण्यात आला आहे. स्त्रीही कमकुवत आहे असं समजून कुटुंबात, घरात तिच्यावर संस्कार केले जातात. नियम लावले जातात ,असे सांगून स्त्रियांना कमी लेखण्याची प्रवृत्ती कमी झाली पाहिजे .कोणी अपमान केला तर तात्काळ विरोध करायला हवा. सहन करतो म्हणून तिचा सतत अपमान होत राहतो. असे होऊ नये असे त्यांनी सांगितले .
उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी मुलींच्या शिक्षणाबद्दल सर्वत्र असलेल्या उदासीनताकडे लक्ष वेधले .इयत्ता सातवी ,आठवी नंतर मुली पुढे शिकत नाहीत. त्यांची गळती होऊन जाते ,ही बाब निराशाजनक असल्याचे सांगून लहानपणी मुलगी खेळकर असते परंतु जसजशी ती मोठी होत जाते तशी ती अबोल होत जाते. वयाच्या पंधरा सोळा वर्षांपर्यंत आपण तिच्या मनाची हत्या केलेली असते. यावर समाज म्हणून सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
दुपारच्या सत्रात स्त्री आरोग्य या विषयावर डॉ.सुचेता पेकमवार ,डॉ.रचिता बिडवई यांनी मार्गदर्शन केले .आरोग्य व त्याचा मनावर होणारा परिणाम याविषयी त्यांनी सविस्तर भाष्य केले.
उद्घाटकीय सत्राचे सूत्रसंचालन समग्र शिक्षाच्या लिंगसमभाव समन्वयक सविता अवातिरक यांनी तर दुसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन मीना घुमे यांनी केले.आभार क्षमा करजगावकर यांनी मानले.
शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी कपाळे, प्रविणा मांदळे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अर्चना बागवाले, शशिकला दावगरवार, डॉ.विलास ढवळे आदींची प्रमुख उपस्थिती होती .
या कार्यक्रमास जिल्ह्यातील २५० शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
No comments:
Post a Comment