अहो_खरंच, हे रिसॉर्ट नसून जिल्हा परिषदेची शाळा आहे -दत्ता वारे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, February 6, 2020

अहो_खरंच, हे रिसॉर्ट नसून जिल्हा परिषदेची शाळा आहे -दत्ता वारे



          जिल्हा परिषदेच्या या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून यंदा 4,000 विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये होते...जगातली तिसरी आणि भारतातील पहिली ‘झिरो एनर्जी स्कूल’ म्हणून वाबळेवाडीच्या शाळेचा उल्लेख केला जातो. या शाळेला बँक ऑफ न्यूयॉर्कचे प्रतिनिधी देणगी देण्यासाठी येऊन गेले. ही शाळा जिल्हा परिषदेची शाळा. पण या शाळेत प्रवेशासाठी वेटिंग लिस्ट लागते. सध्या शाळेत सहाशे विद्यार्थी आहेत.
कधीकाळी दोन पडक्या खोल्यांमध्ये भरवण्यात येणारी ही शाळा आज जिल्हा परिषद शाळांसाठी सर्वांत मोठी रोल मॉडेल ठरली आहे.....आणि यासाठी कारणीभूत ठरलेत ते वारे गुरुजी. ही गोष्ट जितकी शाळेच्या विकासाची आहे तितकीच शिक्षणक्षेत्रात आपण काय करू शकतो, हे दाखवण्यासाठी डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी देखील आहे. वाबळेवाडी हे शिरूर तालुक्यातील शिक्रापूरपासून अडीच किलोमीटरवरचे गाव. वाबळेवाडी म्हणजे पन्नास ते साठ घरांचे छोटेसे गाव. गावाची लोकसंख्या साडेतीनशे. सहा वर्षांपूर्वी गावची जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे फक्त दोन गळक्या खोल्या, पडक्या भिंती. याच खोल्यांमध्ये मुले शिकायची.

साल होते जुलै 2012. या वर्षी जानेगाव येथून बदली होऊन नवीन शिक्षक आले. पडक्या खोल्या पाहून एखाद्या शिक्षकानं काय केलं असतं? तर आपले सगळे कॉन्टॅक्ट वापरून बदलीसाठी प्रयत्न केले असते. पण वारे गुरुजी वेगळे होते. ते नवीन आव्हाने घेण्यासाठी ओळखले जायचे. वारे गुरुजींनी विद्यार्थांना शिकवण्यास सुरुवात केली. दोन छोट्या खोल्या. त्यामध्ये दोन शिक्षक आणि सर्व इयत्तेची मुले एकत्र, असं एकंदरीत चित्र. हे चित्र बदलण्यासाठी वारे गुरुजींनी 15 ऑगस्ट 2012 मध्ये वाबळेवाडीच्या ग्रामसभेत शाळा जागतिक पातळीवर घेऊन जाण्यासाठी काय करता येईल, हे सांगणारा एक आराखडा मांडला.

संपूर्ण गावाने एकत्र येऊन झटायचं, असा तो ठराव होता. 2012 साली गावात एकूण 19 महिला बचत गट होते. या बचत गटांनी एक गोष्ट ठरवली. ती म्हणजे पुढची तीन वर्षे आपणाला जो काही नफा होईल तो शाळेला द्यायचा. पैसे गोळा करून संसार उभा करणाऱ्या महिलांच्या दृष्टीने पाहिलं तर ही गोष्ट खूप क्रांतिकारी वाटेल. बचत गटांसोबत गावातले तरुण धावून आले. नवरात्र आणि गणेशोत्सवांसारख्या सणांचा खर्च कमी करून तो पैसा शाळेसाठी उभा करण्याचं ठरवण्यात आलं. वाबळेवाडीची ही शाळा का उभी राहू शकली ? याचं मुख्य कारण म्हणजे गाव आणि शाळा एकत्र आली. शिक्षक प्रयोग करत आहेत म्हटल्यानंतर शाळेची विद्यार्थी संख्या देखील वाढू लागली.

गावाची मदत कशी होत गेली, याबद्दल सांगायचं झालं तर गावात यात्रेनिमित्त तमाशा आयोजित करण्यात आला होता. सुमारे सव्वा लाख रुपये यात्रा कमिटीमार्फत तमाशासाठी गोळा करण्यात आले होते. वारे गुरुजींनी यात्रा कमिटीची भेट घेतली, तेव्हा यात्रा कमिटीने तत्काळ 1 लाख 20 हजार रुपयांची रक्कम वारे सरांना देण्याचे मंजूर केले. त्या रकमेतून वारे सरांनी विद्यार्थांसाटी टॅब घेतले. महाराष्ट्रातील पहिले ‘टॅब स्कूल’ म्हणून या शाळेचा उल्लेख करावा लागेल. हे पैसै तमाशासाठी गोळा करण्यात आले होते. ते खऱ्या अर्थाने सत्कारणी लागले. आज शाळेची जी इमारत आहे ती गावकर्यांनी दिलेल्या जागेवर आहे. नवीन खोल्या बांधाव्यात म्हणून वारे सरांनी गावकऱ्यांपुढे आपले म्हणणे मांडले. गावकऱ्यांनीदेखील सुमारे दीड एकर शेती बक्षीसपत्र करून शाळेच्या नावावर केली.

शाळेमध्ये सुमारे दोनशे विद्यार्थी झाले. तरीही खैरे सर आणि वारे सर असे दोनच शिक्षक विद्यार्थांना शिकवण्याचे काम करत होते. सर्व इयत्तांच्या विद्यार्थांना शिकवण्यासाठी दोघांनी मिळून अभिनव अशा संकल्पना सुरू केल्या. दहा-दहा विद्यार्थांचे गट तयार करून त्यांना वरच्या वर्गातील एक विद्यार्थी विषय-मित्र म्हणून देण्यात आला. छोटे प्रयोग करून विज्ञानाच्या संकल्पना विद्यार्थांमध्ये रुजवण्यात आल्या. शाळेची कीर्ती सर्वदूर पोहोचू लागल्यानंतर एक दिवस बँक ऑफ न्यूयॉर्कचे काही अधिकारी शाळेला भेट देण्यासाठी आले. त्यांनी शाळेला देणगी देण्याची भावना बोलून दाखवली. नक्की कोणत्या प्रकारची शाळा हवी, असे विचारल्यानंतर वारे सरांनी त्यांना शाळेचे डिझाइन दाखवले. नव्याने शाळेची रचना करण्यात आली. आंतरराष्ट्रीय दर्जाशी मिळत्या -जुळत्या अशा ‘झिरो एनर्जी स्कूल’ची निर्मिती करण्यात आली.

जपान आणि आयर्लंडनंतर जगातली ही तिसरी शाळा ठरली. अनुभवातून शिक्षण देण्याचे सूत्र शाळेने स्वीकारले. दिवाळीच्या सुट्टीत मुलांना पोहायला शिकवण्याची जबाबदारी देखील शाळेने घेतली. संगीत, नाटक, अशा प्रत्येक गोष्टीत विद्यार्थांची रुची वाढवण्यात आली. मुलांनी श्रमसंस्कार मिळावेत म्हणून पंचक्रोशीत झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. त्यातूनच परिसरात सुमारे एक लाख वृक्षांची लागवड करण्यात आली. शाळेची यशस्वी घौडदौड पाहून राज्य सरकारकडून दहा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. आज शाळेत बारा शिक्षक आहेत व नववीपर्यंतचे वर्ग आहेत. भविष्यात 12 वी पर्यंतचे शिक्षण देण्यात येणार आहे. 12 वी पर्यंतचे शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा असण्याचा सन्मान वाबळेवाडीच्या शाळेला मिळणार आहे. आज शाळेची विद्यार्थिसंख्या सुमारे सहाशे असून चार हजार विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहेत आणि विशेष म्हणजे ही शाळा आजही मराठी माध्यमाचीच आहे.

 -दत्ता वारे

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News