नांदेड :
इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक 16 फेब्रुवारी रोजी होणार असून कोणत्या विषयाची तयारी करून घेतली तर मुले पास होतील ,या दृष्टीने सर्व नियोजन करा, सराव प्रश्नपत्रिका पुन्हा सोडवा .तुम्ही शिक्षक आहात विद्यार्थ्यांना ओळखता. मुलांची बलस्थाने कोणती आहेत त्यावर भर द्या. शिष्यवृत्ती परीक्षेत नांदेडचे नाव झळकले पाहिजे. बोर्डात पहिल्या 100 विद्यार्थ्यांमध्ये किमान नांदेडची 15 मुले समाविष्ट व्हावीत, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी व्यक्त केली.
दिनांक 9 फेब्रुवारी रोजी प्रज्ञा शोध परीक्षा सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा स्तरावर घेण्यात आली .या परीक्षेत इयत्ता पाचवी, इयत्ता आठवीला ज्या शाळेचे विद्यार्थी अधिकाधिक पास झाले आहेत अशा गुणानुक्रमे वर असलेल्या प्रत्येक तालुक्यातील पाचवीच्या 3 व इयत्ता आठवीच्या तीन तसेच कमी गुण प्राप्त झालेल्या शाळांमधील प्रत्येक शाळेतील दोन याप्रमाणे 192 शिक्षक, संबंधित गटशिक्षणाधिकारी ,शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांची बैठक आज नियोजन भवन सभागृहात घेण्यात आली ,त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीत शाळा निहाय आढावा घेण्यात आला . शाळेत किती विद्यार्थी पास झाले . जे नापास झाले त्यांची कारणे कोणती, कोणते प्रश्न त्यांना जमले नाहीत, उत्तर लिहिता आले नाही. दिनांक 16 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या स्कॉलरशीप परीक्षेत विद्यार्थी पास होण्यासाठी तसेच मेरिट लिस्ट मध्ये येण्यासाठी येत्या तीन दिवसात काय करता येईल ,यावर प्रत्येक शिक्षकाने सादरीकरण केले. प्रत्येक घटकातील सोपे काय आहे, कोणत्या प्रश्नात किती भारांश आहे बेरीज-वजाबाकी, चढता-उतरता क्रम, दिनदर्शिका , कालमापन , नाणी-नोटा, सोपे गणित याचा अधिक सराव घेण्याची सूचना शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केली.
गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, सुधीर गुट्टे, दत्तात्र्यय मठपती ,विलास आडे, कृष्णकुमार फटाले ,ससाने, राजेंद्र रोटे सुभाष पवने यांनी यावेळी उत्कृष्ट सादरीकरण केले .
निकाल वाढविणे , अधिकाधिक विद्यार्थी पात्र होतील यासाठी करावयाच्या वेगळ्या नावीन्यपूर्ण प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली .
यावेळी बुद्धिमत्ता चाचणी या संदर्भात के.डी.जोशी यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.
प्रश्नपत्रिका सोडवताना घ्यावयाची काळजी , अचूक उत्तर कसे लिहावे याबाबत त्यांनी भरीव सूचना केल्या. धाराशिव शिराळे व शरद पवार यांनी भाषा व गणित विषय संदर्भाने विश्लेषण केले .
बैठकीच्या समारोप प्रसंगी पाचवी व आठवीला जास्त विद्यार्थी पास झालेल्या शाळांमधील शिक्षकांना शिष्यवृत्तीची पुस्तके मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे , प्रा.के.डी.जोशी, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
अत्यंत कमी कालावधीत प्रज्ञाशोध सराव परीक्षा घेऊन निकाल व विश्लेषण करून पुढे करावयाच्या कार्यवाहीचा वस्तुपाठ मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घालून दिल्याबद्दल प्रशांत दिग्रसकर यांनी त्यांचे आभार मानले व उपस्थित शिक्षकांचे प्रशासनाच्या वतीने अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्माकर कुलकर्णी, व्यंकटेश चौधरी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी कपाळे, नाईकवाडे , विलास ढवळे, प्रकाश गोडणारे, खिल्लारे आदींनी परिश्रम घेतले.
.




No comments:
Post a Comment