कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज शैक्षणिक क्षेत्रात" न भूतो न भविष्यती" असा मोठा भूकंप झालाय असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
इयत्ता पहिली ते नववी ,अकरावीच्या द्वितीय सत्राच्या परीक्षा रद्द तर दहावीचा एक पेपरच रद्द असा प्रकार घडलाय ! पदवीच्या परीक्षा सुध्दा घेण्याबाबत आता कुठे चर्चा सुरू झाली आहे.
शैक्षणिक क्षेत्रात झालेल्या या प्रचंड ,खळबळजनक वावटळीत मात्र अध्ययन- अध्यापनाचा विषय विविध रुपात मांडण्याचा हर एक जण आपापल्या परीने डोके लढवीत आहे.यात" लर्न फ्रॉम होम",शाळा नाही पण अभ्यास चालू,विविध यु ट्यूब चॅनेल, विविध लिंक,प्रश्नपत्रिका, ऑनलाइन टेस्ट,सामान्य ज्ञान चाचण्या असे नानाविध प्रकार मोबाईल धारकांना पाहण्यास मिळत आहेत.
"ऑनलाईन अध्यापन" हा प्रकार रुजू पाहत आहे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात केलेले काही हरहुन्नरी अध्यापक यात अग्रेसर असल्याचे दिसून येते.
वर उल्लेख केलेल्या विविध प्रकारच्या अध्यापन पूरक प्रकारांचा वारेमाप भडिमार सुरू आहे.एवढेच नाही तर किती विद्यार्थी व शिक्षक याचा लाभ घेत आहेत,याबाबत ऑनलाईन सर्व्हेक्षणही सुरू झाले आहे! हे तर खूपच अति झाले .
लॉक डाऊनचा काळ आणि याच काळात ऑनलाइन अध्यापन सारेच काल्पनिक वाटावे असे आहे.
आज इतर देशातील मोबाईल सेवा 4जी च्याही पुढे 7 जी पर्यंत गेल्याचे कळते.पण भारतात मात्र आजही घराच्या छतावर जाऊन "हॅलो हॅलो"म्हणण्याची पाळी आहे.कित्येकदा मोबाईल "कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर "असल्याची मंजुळ वाणी ऐकावयास मिळते.
अशा परिस्थितीत मोबाईलच्या मदतीने "ऑनलाईन अध्यापन"कसे शक्य होईल ? पूर्ण आवश्यक रेंज मिळाल्याशिवाय साधे बोलणेही जिथे दुरापास्त ठरते,तिथे विविध किमान 4जी सेवा खूपच कठीण आहे.
" तंत्रस्नेही शिक्षकांची"अध्यापन विषयक ही तळमळ खूपच मोलाची असली तरीही ती फलदायी ठरेलच याची शाश्वती नाही.
सद्यस्थितीत कोरोनाच्या संकटात सापडलेल्या समाजातील विविध स्तरातील व्यक्ती भयावह अवस्थेत आहे.त्याला आपल्या कुटूंबातील सर्व सदस्यांची चिंता भेडसावत आहे.घरातील संसारोपयोगी साहित्य,अन्नधान्याची गरज यात तो भरडला जातोय.अनेक स्थलांतरित मजूर,कामगार हे बेचैन आहेत.हाताला काम नाही मिळाले तर कसे होणार,कोरोनानंतरचे आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात या विवंचनेत तो आहे.
अशा "विचित्र"अवस्थेत जगणारा कोणता पालक आपल्या पाल्याच्या "ऑनलाईन"शिक्षणासाठी पुढे येईल ?अनेक शेतकरी, मजुरदार,कामगार पालक स्वतः हजार दीड हजारांच्या मोबाईलवर समाधानी आहेत,आपली कामे भागवत आहेत.ते दहा ते पंधरा हजारांचे 4 जी मोबाईल आपल्या पाल्याना विकत घेऊन देतील का ?
आर्थिक कोंडीत सापडलेला कोणताही पालक सद्यस्थितीत हे करण्याची शक्यता धूसर आहे.
मोबाईल चा दुष्परिणामही घातकच
आज खेड्यातील अनेक अर्धवट शिक्षण झालेले,बेकार असणारे (जे आई -वडिलांना शेतातील कामातही मदत न करणारे) तरुण सैरभैर झालेत.मोबाईल कंपन्यांच्या विळख्यात ते अलगद सापडले आहेत.रोजचा दीड जी बी डेटा खर्च करण्यासाठी गावापासून दूर टेकड्यांवर, घराच्या छतावर आपला अमूल्य वेळ अक्षरशः वाया घालवीत आहेत.त्यांना भविष्याची चिंता वाटत नाही.अशा तरुणांचे पालक मात्र अंतकरणातून दुखावलेले आहेत.घरकामातही मदत न करणारे,न कमावणारे मोबाईलच्या व्यसनी गेलेले तरुण ते सध्या अनुभवत आहेत.अशा वातावरणात कोणता पालक आपल्या कोवळ्या मुलांना ऑनलाईन शिक्षणाच्या अपेक्षेने मोबाईलच्या मोहजालात अडकवेल ? होय,मोहजालच !
यातून नक्कीच मोबाईलच्या "नादी"लागलेली कोवळी मुलं अभ्यासापेक्षा इतर गोष्टीत रममाण होणार,आवडेल ते पाहणार,शोधणारही !त्यांचं बालविश्व हरवलं जाईल! "एकलकोंडा "बनून मनोविकृती वाढण्याचा गंभीर धोका पण आहे.आई-वडील, भाऊ- बहीण,मित्र-मैत्रिणी, सगे-सोयरे या सर्वांपासून अलिप्त राहून "मोबाईलच माझे सर्व काही"अशी त्याची धारणा होईल!
यावर एक इलाज विविध टी व्ही चॅनेल्स
मोबाईल एकलकोंडा करू शकतो पण टी व्ही नाही .विषय व इयतावार सरकारी फ्री चॅनेल्स यावर खूप चांगला उपाय ठरेल असा विश्वास वाटतो.आपल्या पाल्याला पालक नक्कीच त्याच्या वर्ग ,चॅनेल व विषय याबाबत मोकळीक देतील असे वाटते.आपल्याला हव्या त्या वर्गाचे विषयाचे चॅनेल मिळाल्यावर किती आनंद होईल त्याला !
मोबाईल वरून ऑनलाईन शिक्षणाचा धडा देणाऱ्या अध्यापक बांधवांना व शासनाला "मोफत टी व्ही चॅनेल"देण्याची कल्पना वृद्धिंगत करण्याची सूचना करावीशी वाटते.
"ऑनलाईन शिक्षण" मृगजळ ठरू नये,यासाठी हा शब्दप्रपंच !
-मधुकर चांदोबा पवार,
- उमरी ( रे. स्टे. )




No comments:
Post a Comment