नांदेड : नांदेड आकाशवाणी केंद्राचा शुक्रवारी ( ता.२९ ) मे रोजी २९ वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. दरवर्षी रक्तदान शिबिर, श्रोता मेळावा, कविसंमेलन आदी कार्यक्रम घेतले जातात. परंतु यावर्षी कोरोनामुळे वर्धापन दिन साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे, अशी माहिती नांदेड आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी नंदादीपक बट्टा यांनी दिली आहे.
दिनांक २९ मे १९९१ रोजी नांदेड आकाशवाणी केंद्राची सुरुवात झाली. एफ.एम. बँड 101.1 मेगाहर्टवर आकाशवाणी नांदेड केंद्राचे तीन सत्रात प्रसारण होते. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन श्रोत्यांचे माहिती, शिक्षण व मनोरंजन करण्याचे काम आकाशवाणी नांदेड करत आहे. लहान मुलांसाठी गंमत जंमत, युवकांसाठी युववाणी, शेतकऱ्यांसाठी किसानवाणी, महिलांसाठी घरसंसार, प्रौढांसाठी लोकजागर तसेच लोकसंगीत, आपली आवड, आपकी पसंद, फोन फर्माईश, आरोग्य धन, विचार धन, भक्ती संगीत, शंकासमाधान, थेट बांधावरून, लाईव्ह फोन-इन कार्यक्रमासह विविध कार्यक्रम प्रसारित केले जातात.
विविध घटना व घडामोडीवर आधारित कार्यक्रम 'नांदेड दर्पण' हा कार्यक्रम २००५ ते २०१८ असा तब्बल १३ वर्ष सलग कार्यक्रम प्ररारीत करण्यात आला. नांदेड दर्पण हा सर्वात लोकप्रिय ठरला होता. स्थानिक कार्यक्रमासह दिल्ली, मुंबई व औरंगाबाद केंद्राच्या बातम्या व दुपारच्या सत्रात विविध भारती सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातात. आकाशवाणी केंद्रात सुमारे १८ अधिकारी, कर्मचारी व ४० नेमातिक उद्घोषक व संकलक कार्यरत आहेत. कार्यक्रम प्रमुख म्हणून नंदादीपक बट्टा, कार्यक्रम अधिकारी विश्वास वाघमारे, प्रसारण अधिकारी राहुल अत्राम, वरिष्ठ निवेदक गणेश धोबे, ग्रंथपाल गोविंद मदनवाड, अभियांत्रिकी शाखेत प्रमुख आनंद ठेंगे यांच्यासह सात अभियांत्रिकी सहाय्यक आहेत. याशिवाय आस्थापना व लेखा शाखेतील अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोना जनजागृतीसाठी नांदेड आकाशवाणी केंद्राने 'लढा कोरोनाशी' हा विशेष कार्यक्रम प्रसारित केला जात आहे. यामध्ये लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी- कर्मचारी, पोलिस यंत्रणा, आरोग्य विभाग, शेतकरी, कामगार, सर्वसामान्य नागरिकांच्या मुलाखती व प्रतिक्रियांवर आधारित हा कार्यक्रम असून दररोज सकाळी हा कार्यक्रम प्रसारित केला जात आहे. नांदेड आकाशवाणी केंद्रामुळे स्थानिक कलावंतांना संधी मिळाली आहे. त्यामुळे आकाशवाणीचे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य सार्थ ठरले आहे. नांदेड आकाशवाणी तिसाव्या वर्षात पदार्पण करत असून वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. कोरोनामुळे श्रोत्यांनी आकाशवाणीमध्ये येऊन शुभेच्छा देऊ नयेत. वर्धापन दिनानिमित्त श्रोत्यांच्या प्रतिक्रिया फोनइंन द्वारे ध्वनिमुद्रित करून प्रसारित केल्या जाणार असल्याचे नंदादीपक बट्टा यांनी सांगितले आहे.




No comments:
Post a Comment