किनवट : कोरोना आजाराच्या संकटकालीन परिस्थितीत किनवट व माहूर तालुक्यातील डोंगराळ भागातील खेडेगावातील जनधन खाते धारक महिला यांना प्रति 500 रुपये महिना तर निराधार योजने अंतर्गत लाभ मिळणाऱ्या लाभार्थ्यांना मासिक मानधन सातत्याने मिळण्यासाठी आमदार भीमराव केरामांचे ते पत्र उपयोगी पडले असून केंद्र सरकारने तातडीने पावले उचलत राज्याच्या सचिवांना आदेशित केल्याने वरील योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याची चर्चा सध्या तालुक्यात आहे.
सद्या जगभरात कोरोना सारख्या महाभयंकर अदृश्य शत्रूने हल्ला केलेला आहे.अशा या संकटकालीन परिस्थितीत लॉकडाऊन मुळे मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांना मागील दोन महिन्यापासून हाताला काम नाही. घरातील होते ते सर्व धान्य संपुष्टात आल्याने कित्येक संसाराच्या चुली पेटत नाहीत. कष्ट करणाऱ्या हाताने भिक कशी मागावी या विवंचनेत अनेक स्वाभिमानी कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. याच संकट काळात अजून भर म्हणून किनवट व माहूर तालुक्यातील असंख्य महिलांची झिरो बॅलन्स असलेली जनधन खाती बंद करण्यात आली होती.त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक दृष्टीतून जनधन खात्यांच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांसाठी देण्यात येणारे पाचशे रुपये मासिक मदत मिळणे अशक्यप्राय होते. अशात किनवट व माहूर तालुक्याचे आमदार भीमराव केराम यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे मुख्य सचिव व केंद्रीय मंत्र्यांना पत्रव्यवहार केला होता. त्या पत्राची गंभीर दखल घेत मुख्य सचिवांनी बँकांना आदेशित करून झिरो बॅलन्स मुळे बंद पडलेली खाती पूर्ववत सुरू करून त्यांना पाचशे रुपये इतकी मदत देण्याचे आदेशित केले. सोबतच दोन्ही तालुक्यातील निराश्रित, निराधार,अपंग व विधवा महिलांना मिळणारे मासिक वेतन तांत्रिक कारणामुळे अडकून पडले होते. त्यात ही आता सुधारणा होऊन संपूर्ण लाभार्थ्यांना वेळेवर मासिक वेतनाचा लाभ मिळत आहे. एकंदरीत लॉकडाउनच्या संकटकाळात गोरगरीब महिला कुटुंब प्रमुख यांना शासनाकडून पूर्ववत मासिक वेतन सुरू झाल्याने आमदार भीमराव केराम यांनी केलेल्या पत्रव्यवहाराची फलनिष्पत्ती असल्याचे सांगून त्यांच्या ‘त्या’ पत्रामुळे हे शक्य झाल्याचे बोलले जात आहे.



No comments:
Post a Comment