किनवट : येथून बारा किमी अंतरावर असलेल्या शनिवारपेठ येथिल साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन लहान मुलांचा पाण्यात बुडुन मृत्यु झाला. ही घटना सोमवारी (ता. एक ) दुपारी एकच्या सुमारास घडली. या बद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या बाबत वृत्त असे की, शनिवारपेठ येथील चार लहान मुले गावालगतच्या साठवण तलावावर पोहण्यासाठी गेले होते. नागनाथ प्रदीप राठोड (वय ९ वर्षे ) व धम्मपाल रंजित सोनकांबळे ( वय ११ वर्षे ) राहणार शनिवारपेठ यांनी पोहण्यासाठी पाण्यात उडी घेतली पण पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. त्यांचे सोबत असलेल्या अन्य दोन मुलांनी ही घटना पाहुन पळ काढला. त्यांना घटनेची माहिती दिल्याने गावकऱ्यांनी घटना स्थळावर धाव घेतली तो पर्यंत त्या दोन बालकांचा मृत्यु झाला होता. ह्या दोघा पैकी नागनाथ हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शनिवारपेठचा तर धम्मपाल हा समता प्राथमिक विद्यालय, सिद्धार्थनगर, किनवटचा विद्यार्थी आहे. सध्या शाळा सुरू नसल्याने ही मुले आपल्या सवंगड्या सोबत परिसरात फिरायला, खेळायला जात असत.
सरपंच शिवराम दत्ता माहुरे यांनी किनवट पोलिसांना या घटनेची खबर दिली. त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही शव, शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. दोन चिमुकल्यांच्या मृत्युने शनिवारपेठ परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. तहसिल प्रशासनातर्फे तलाठी के.आर. कदम, डि.बी जोशी घटनास्थळी होते तर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड यांनी समन्वय साधला.





No comments:
Post a Comment