मानवतेची शिकवण देणारे साने गुरुजी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, June 11, 2020

मानवतेची शिकवण देणारे साने गुरुजी




11 जून हा गुरुजींचा स्मृतीदिन आहे. तहहयात पेटत्या निखाऱ्यावर चालून प्रत्येक मराठी माणसाला स्फूर्ती आणि संस्कार देणाऱ्या सानेगुरुजींच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! त्यांना महाराष्ट्रातील अनेक चाहत्यांनी वाहिलेली शब्दांजली. -संपादक

मानवतेची शिकवण देणारे साने गुरुजी

पांडुरंग सदाशिव साने ज्यांना आपण सर्वजण साने गुरुजी या नावाने ओळखतो. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. सदाशिवराव व यशोदाबाई यांच्या पोटी जन्मलेला दुसरा मुलगा असून तिसरे अपत्य म्हणजे साने गुरुजी. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण झाले. त्यांचे वडील सारा गोळा करण्याचे काम करीत होते. साने गुरुजी यांची आई त्यांना श्याम या नावाने प्रेमाने हाका मारीत असे. त्यांच्या लहानपणीच्या छोटया मोठया प्रसंगातून आईने त्यांच्यावर संस्कार करण्याचे काम केले आहे. याच विचारातून त्यांच्या हातून श्यामची आई नावाचे प्रसिद्ध साहित्य निर्मिले गेले. ज्यातून श्याम म्हणजे साने गुरुजी कसे घडले ? याची प्रचिती येते. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते पुण्याला त्यांच्या काकांकडे राहू लागले, परंतु तेथील वातावरण व परिसर त्यास रुचले नाही आणि ते परत आपल्या गावी आले. गावापासून जवळपास 6 मैल अंतरावर असलेल्या मिशनरी शाळेत प्रवेश घेतला. रोज पायी चालत ते शाळेला जात असे. मराठी व संस्कृत विषयात आपण प्रज्ञावान आहोत याची सर्वप्रथम जाणीव याच शाळेत झाली आणि तेथेच त्यांना कविता करण्याचेही सुचू लागले. साने गुरुजींच्या घरची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली होती. गुरुजींच्या शिक्षणाविषयी घरात चर्चा होऊ लागली. वडील भाऊ सुद्धा साने गुरुजींच्या शिक्षणाविषयी चिंतेत होते. ही बाब साने गुरुजींच्या लक्षात आल्यावर त्यांनी औंध इंस्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतला. कारण येथे गरीब मुलांसाठी मोफत शिक्षणासोबत मोफत जेवण सुद्धा दिल्या जात असे. कठीण परिश्रम करीत ते आपल्या शिक्षणाचा प्रवास करीत होते. तेथून ते पुण्यातील नूतन मराठी विद्यालयामध्ये प्रवेश घेतला . सन 1918 मध्ये गुरुजी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्याच्या एका वर्षापूर्वी त्यांची लाडकी आई यशोदाबाई यांचे निधन झाले, तेव्हा त्यांना डोक्यावर आभाळ कोसळल्यागत वाटले. कारण त्यांच्यासाठी आई ही सर्वस्व होती. ती प्रेमस्वरूप होती, वात्सल्यसिंधु होती. महाविद्यालय शिक्षण त्यांनी न्यू पुणे कॉलेज ( परशुराम भाऊ कॉलेज जुने नाव) येथून बी.ए. व एम.ए. चे शिक्षण पूर्ण केले. मराठी व संस्कृत विषयातून पदवी आणि पदव्युत्तर चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अंमळनेर मधील प्रताप हायस्कुल मध्ये शिक्षकांची नोकरी पत्करली. गुरुजींना लहान मुलांचा लळा होता आणि ग्रामीण भागात काम करण्यात विशेष रस होता. शिक्षकांना मिळणाऱ्या पगारी पेक्षा मुलांना मानवतेचे धडे शिकवण्याची त्यांच्या आवडीमुळे ते विद्यार्थीप्रिय बनले होते. मुलांचे ते गुरुजींच नाही तर आई, वडील पालकही होते. कारण वार्डनर म्हणूनही त्यांनी काम केले. शाळेत असतांना त्यांनी विद्यार्थी नावाचे मासिक प्रकाशित करायला सुरुवात केली, जे की खूपच प्रसिद्ध झाले होते. साने गुरुजींचे जेवढे मुलांवर प्रेम होते तेवढेच प्रेम मुलांचे साने गुरुजीवर होते. येथे केलेल्या मेहनती मुळेच ते साने गुरुजी या नावाने मुलांमध्ये ओळखले जाऊ लागले. जो पर्यंत त्यांनी या शाळेत कार्य केले तो त्यांच्या जीवनाचा पहिला भाग होता.
महात्मा गांधीजींनी सन 1930 मध्ये मिठाचा सत्याग्रह करीत दांडी यात्रेचे आयोजन केले. त्या सत्याग्रहात साने गुरुजी यांनी सहभाग घेतला आणि त्यांच्या जीवनातील दुसऱ्या भागास प्रारंभ झाला. वडील लोकमान्य टिळकांच्या विचारांशी सहमत होते. घरात तसे वातावरण नव्हते परंतु अधूनमधून विचारधारा चालत असे. भारतीय स्वातंत्रलढ्यात सहभाग घेतल्यामुळे त्यांना धुळे येथील तुरुंगात जेरबंद करण्यात आले ते 15 महिन्यांसाठी. याच तुरुंगात त्याच कालावधीत विनोबा भावे दररोज गीतेवर प्रवचन देत असत, त्यांचा प्रभाव गुरुजींवर झाला. पुढे त्यांना तिरुचैन्नपल्ली येथे तुरुंगवास भोगावा लागला. येथे त्यांनी तामिळ व बंगाली भाषा शिकली. यातूनच मग आंतरभारती चळवळ उदयास आली. सन 1942 च्या चले जावं आंदोलनाच्या माध्यमातून साने गुरुजीचा संपर्क मधू लिमये, कॉ. एस. एम. डांगे, एन. जी. गोरे, एस.एम.जोशी यांच्याशी आला. पंढरपूरचे विठ्ठल मंदिराचे दार सर्वांसाठी खुले करावे म्हणून 01 मे ते 11 मे 1947 मध्ये आंदोलन करून ते यशस्वी केले. 15 ऑगस्ट 1948 रोजी साधना साप्ताहिकाची सुरुवात केली. जे की आजतागायत चालू आहे.
यशोदाबाईच्या श्यामचा म्हणजे साने गुरुजींचा 11 जून 1950 रोजी मृत्यू झाला. प्रत्येक गुरुजीनी जर साने गुरूजी होण्याचा प्रयत्न केल्यास भविष्यात संस्कारमय विद्यार्थी नक्कीच तयार होतील. आज त्यांची पुण्यतिथी त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

-नागोराव सा. येवतीकर,
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद  जि. नांदेड
9423625769



मातृहृदय स्वातंत्र्यसैनिक-साने गुरूजी
           पांडुरंग सदाशिव साने (साने गुरुजी)हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते. साने गुरुजींचा जन्म 24डिसेंबर 1899रोजी कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यात दापोली तालूक्यातील  पालगड या गावी झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून काही काळ नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळावा. त्यांनी तेथील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वत:च्या उदाहरणातून *स्वावलंबनाचे* धडे दिले. सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील तत्त्वज्ञान मंदिरात त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.
"सूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे बर्फाच्या राशी वितळतात त्याप्रमाणे अहंकाराच्या  राशी प्रेमाच्या ओलाव्याने  वितळतात".
      वरील प्रमाणे प्रेमाचाओसंडून वाहणाऱ्या झर्रा असलेले साने गुरूजीनी  १९२८ साली त्यांनी 'विद्यार्थी' हे मासिक सुरु केले.विद्यार्थ्यामध्ये संस्काराचे धडे द्यायला लागले . त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वत: खादीचाच वापर करत असत. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. 'काँग्रेस' नावाचे साप्ताहिक, दुष्काळात शेतकर्‍यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्‍न, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी कार्य, १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार, राष्ट्र सेवा दलाचे कार्य - या माध्यमातून त्यांनी राजकीय कार्य केले."पत्री"या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तिपर कविता प्रसिद्ध केल्या. त्यातील *'बलसागर भारत होवो*' सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.
*'बलसागर भारत होवो | विश्वात शोभूनी राहो || राष्ट्रार्थ प्राण हे उरले | मी सिद्ध मराया हो* ||'अशा प्रेरक लेखनाने समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रुढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्‍न केला. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. 'एका पांडुरंगाने दुसर्‍या पांडुरंगाला खर्‍या अर्थाने मुक्त केले,' असे त्या वेळी म्हटले गेले.
      स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर (आंतरभारती चळवळ) आंतरभारती चळवळीच्या माध्यमातून त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्‍न केला. विविधराज्यांतील लोकांनी एकमेकांची  संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वत: तामीळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी 'साधना' साप्ताहिक सुरु केले. त्यांच्याकथा, कांदबर्‍या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील *संवेदनशील साहित्यिकही* आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ८२ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. 'श्यामची आई' ही सुप्रसिद्ध कादंबरीही त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित 'गीता प्रवचने' सुद्धा विनोबजींनी धुळे येथील तुरुंगात सांगितले व साने गुरुजींनी लिहिली, धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला.अशा मातृहृदय असलेल्या स्वातंत्र्याच्या लठ्यात स्वतःला झोकून देणाऱ्या वीराला माझा मानाचा मुजरा.

-यशोधरा सोनेवाने,
गोंदिया
(9420516306 )



।। साने गुरुजी ।।

रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड गावी
ओळख साने गुरुजी यांच्याच नावी

पांडुरंग होते त्यांचे नाव जरी
श्याम म्हणून आई हाक मारी

यशोदेने घडविले नटखट श्यामला
आम्ही कसे विसरु साने गुरुजींला

गुरुजींना होता मुलांचा लळा
जिथे तिथे भरवी प्रेमाची शाळा

अठरा विश्व दारिद्र्य होते घरात
शिक्षण घेतले राहून वसतिगृहात

खूपच भित्रा होता श्याम लहानपणी
आईच्या संस्काराने घडले तरुणपणी

साधी राहणी पण उच्च विचारसरणी
सर्वाना आदर्श त्यांची जीवन कहाणी

द्वार उघडले विठ्ठल मंदीराचे
हक्क मिळाले सर्वाना दर्शनाचे

घेतला सहभाग स्वातंत्र्यलढ्यात
श्यामची आई लिहिली तुरुंगात

साने गुरुजी होते खरंच खूप महान
त्यांची मूर्ती लहान पण कीर्ती महान

स्वातंत्र्यानंतर फक्त तीन वर्षे ते जगले
सदा त्यांची आठवण काढतात सगळे

-नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769



संस्कारमूर्ती परमपुज्य साने गुरुजी

'खरा तो एकची धर्म l जगाला प्रेम अर्पावे'l हे गोड गाणे पूज्य साने गुरुजींनी लिहिलेले आहे. या गीतातून गुरुजींनी जगाला संदेश दिला आहे तो किती अर्थपूर्ण आहे! हे आचरणात आणल्यावरच जाणवेल. आपण साऱ्यांनी गुरुजींच्या संस्कार पथावरून वाटचाल केली तर आपले आयुष्य उजळून जाईल. 'मेणबत्तीप्रमाणे जळावे आणि दुसर्याला प्रकाश देत स्वतः जळून जावे;' जीवनाचे असे वेगळे ध्येय मानून प्रत्यक्षात असेच जीवन जगलेले परमपुज्य साने गुरुजी म्हणजे माणुसकीचा धर्म जोपासणारा एक थोर संतपुरुष होय.
पूज्य सानेगुरुजी उर्फ पांडुरंग सदाशिव साने यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या पालगड येथे २४ डिसेंबर १८९९ रोजी झाला. त्यांची आई यशोदाबाई यांनी त्यांच्यावर उच्च जीवन मूल्यांचे संस्कार केले. आपल्या आई विषयी कृतज्ञता व्यक्त करताना श्याम म्हणतो ' आई देह देते व मनही देते. जन्मास घालणारी तीच व ज्ञान देणारी तीच'.  माझ्यात जे काही चांगले आहे ते माझ्या आईचे आहे. आई माझा गुरु ,आई कल्पतरु . तिने मला काय दिले नाही? सारे काही दिले. प्रेमळपणे बघायला, प्रेमळपणे बोलायला, तिनेच मला शिकवले.
मनुष्यावरच नव्हे तर गाई गुरांवर, फुलपाखरांवर ,झाडा झाडांवर, प्रेम करायला तिने ते मला शिकवले. आईचे प्रेम जेथे असेल, ती झोपडी राजराजेश्वरचा ऐश्वर्याला ही लाजवील, हे प्रेम जेथे नाही ,ते महाल व दीवानाखाने म्हणजे स्मशाने होत. एवढं उत्कट प्रेम गुरुजींच्या हृदयात आईविषयी  होते.
आईच्या बोलण्यातून श्यामच्या मनाला संस्काररुपी शिकवण मिळत होती. समाजाची कामे करणारी माणसे देवाला प्रिय असतात. कोणी हीन - दिन,कोणी श्रेष्ठ-कनिष्ठ नसतो, सगळेच समान असतात, अशा संस्कारांनी गुरुजी घडले होते.  खादीचा कुर्ता व धोतर आणि डोक्यावर पांढरी टोपी अशी त्यांची साधी वेशभूषा असे. साधी राहणी उच्च विचारसरणी असलेले व सर्वांवर भरभरून प्रेम करणारे साने गुरुजी म्हणजे मातृप्रेमाचा मंगलमय साक्षात्कारच. आईच्या प्रेमाची किंमत गुरुजीच्या मनाला समजलेली होती म्हणूनच आई आणि आई स्वरूप माऊलीच्या प्रेमावर अपार भक्ती करणार्‍या साने गुरुजीची तीन दैवत फार प्रिय होती. जन्म देणारी जन्मदाती आई, आपले पालन पोषण करणारी धरणीमाता आणि जन्मभूमी म्हणजे राष्ट्रमाता. या दैवतावर  गुरुजींचे आतोनात प्रेम व भक्ती होती.
पूज्य साने गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वात किती व्यक्तिरेखा दडलेल्या होत्या ते ईश्वरालाच ठाऊक. गुरुजी लेखक होते, कवी, शिक्षक आणि सेवाभावी कार्यकर्ते होते. लोकसाहित्याचे संग्राहक होते. किसान मजुरांच्या चळवळीचे संघटक, प्रभावी वक्ते, दीन -दलितांचे अश्रू पुसणारे जिवलग, आंतर भारतीय प्रवक्ते या रूपात गुरुजी सर्वत्र समाजात वावरले. “ एक परार्धांश गांधी, एक परार्धांश रवींद्रनाथ, एक परार्धांश रामकृष्ण ही गुरुजींची आदर्शवत आहेत. गांधीजींची सेवावृत्ती, रवींद्रनाथ टागोरांची कवी वृत्ती आणि रामकृष्णांची भक्ती असे मिश्रण माझ्यात आहे. हात सेवेत राबवावेत, ओठ एखादे गोड गाणे गुणगुणत असावे, आणि भक्तीने सर्वांविषयीच्या प्रेमाने हृदय भरलेले असावे. ह्या तीन माझ्या क्षुधा आहेत.ह्या तीन वृत्ती समाधान पावल्या की मी समाधानी राहीन असे गुरूजी म्हनत असे. गुरुजींनी चे कार्य स्वीकारले त्या कार्याला उदात्ततेचे स्वरूप होते.
दुसऱ्यासाठी काहीतरी करत राहण्यासाठी सदैव तत्पर असायचे. त्यासाठी ते तन -मनाने अपार कष्ट करायचे. आपल्याजवळ जे जे आहे ते सर्वस्वी दुसऱ्याला देऊन टाकण्याची वृत्ती गुरुजींच्या ठायी होती.
*'उक्ती आणि कृती'* यात कधीच फरक पडू द्यायचा नसतो. ही शिकवण गुरुजींनी आपल्या वागणुकीतून दिली आहे.दीन दुबळ्यांनविषयी अपार करुणा बाळगणारे मन सर्वांनाच लाभावे म्हणजे जगातील दुःखे आपण कमी करू,शकतो, असा विश्वास साने गुरुजींनी दाखविलेल्या 'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे'  या ओळीवरून यावा आणि आपल्याही मनाला निश्चितपणाने वाटत राहील की, गुरुजींचा सात्विक प्रेमाचा धर्म आपणही अंगीकारला पाहिजे. अशा या महान  क्रांतिकारी गुरुजीस कोटी कोटी वंदन

-प्रमिलाताई सेनकुडे
ता.हदगाव जि. नांदेड.



माझ्या आवडीचे साहित्यिक

पांडुरंग सदाशिव साने 'साने गुरुजी' या नावाने लेखन साहित्य क्षेत्रातील कोहिनूर. स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्ते असूनही ते मराठीतील थोर साहित्यिक होते. साधी  सरळ ओघवती भाषा, रसाळ लेखणीची जादू लहान-थोर सर्वांच्या मनावर प्रभाव उमटवते. संस्कारक्षम निवेदन शैलीतून त्यांच्या आदर्श जीवनाचा पैलू उलगडते.'श्यामची आई' या पुस्तकातून त्यांच्या मिठास वाणीचे दर्शन घडते. आई-वडील, भाऊ तसेच गरीब, वृद्धां- विषयीचा कळवळा त्यांच्या लेखणीत ओतप्रोत भरलेला  जाणवतो.'पत्री' या काव्यसंग्रहातून त्यांच्या देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील 'बलसागर भारत होवो' सारख्या कवितांचा नागरिकांवर इतका प्रभाव पडला की इंग्रज सरकारला त्या प्रती जप्त कराव्या लागल्या.
            स्वातंत्र्य चळवळीत सहभाग असल्याने त्यांचे बरेच लिखाण  तुरूंगातच झाले आहे. 'श्यामची आई' ही कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरूंगात असताना लिहिली. आचार्य विनोबा भावे रचित' गीता प्रवचने'  आचार्यांनी कारागृहातच सांगितली आणि साने गुरुजींनी लिहिली. बंगलोर येथील तुरुंगात 'तिरुवल्लुवरे' नावाच्या कविता कुरल  या तमिल महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले. "करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे" हे त्यांच्या जीवनाचे सार होते. त्यांना" मुले ही देवाघरची फुले" वाटत. त्यामुळे मनोरंजनाबरोबरच मुलांवर संस्कार होण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांच्या आई वडिलांवर त्यांचे फार प्रेम होते. आईच्या कष्टाची त्यांना नेहमीच जाणीव असे. आई वडिलांच्या प्रेमावर त्यांनी 'मोलकरीण 'म्हणून सुंदर कादंबरी लिहिली. पुढे त्याचा चित्रपट निघाला.
    ' खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे' ही कविता त्यांना देशाविषयी वाटणारा जिव्हाळा प्रतित करते. त्यांनी अविरत लेखणी चालवली विविध विषयांवर त्यांनी  अफाट लिखाण केले. त्यांच्या लेखनातून सर्वांनाच काही ना काही बोध मिळत असे. त्यातून त्यांना इतरांविषयी वाटणारे प्रेम, कळवळा जाणवतो. त्यांचे निबंध लेखनही अप्रतिम आहे.' गोड गोष्टी' किंवा' कथा माला' म्हणून लहान मुलांसाठी त्यांनी बोधप्रद कथा लिहिल्या आहेत. त्यांच्या साहित्याची संपत्ती अफाट आहे की वाचता वाचता जीवन संपून जावे.

-भारती सावंत,
मुंबई
9653445835



सानेगुरुजी : एक अलौकिक व्यक्तिमत्त्व

          सानेगुरुजी म्हणजे महाराष्ट्राच्या शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय इतिहासातील एक सोनेरी पान होय ! साने गुरुजींच्या आयुष्याचे अनेक पैलू मराठी मनाला भावतात. आईचे संस्कार, आदर्श व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, सामाजिक प्रश्नांकडे डोळसपणे बघण्याची वृत्ती,  विषमतेतून मनाची होणारी तगमग, आदर्श पिढी घडविण्यासाठी होणारी धडपड, तुरुंगातही स्वस्थ न बसता विविध विषयांवर केलेले लेखन असे कितीतरी पैलू साने गुरुजींच्या जीवनचरित्रातून आपणास अनुभवास मिळतात.
        एक शिक्षक म्हणून सानेगुरुजी, एक सुपुत्र म्हणून सानेगुरुजी, एक समाजसेवक म्हणून सानेगुरुजी, देशभक्त असलेले सानेगुरुजी आणि साहित्यिक म्हणून सानेगुरुजी अशा कितीतरी रूपातून सानेगुरुजींचे चरित्र आपल्याला प्रेरणा देते.  पूर्वीचे वैभव गमावलेल्या खोतांच्या कुटुंबात साने गुरुजींचा दिनांक 24 डिसेंबर 1899 रोजी जन्म झाला.  रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पालगड हे गुरुजींचे जन्म गाव. त्यांचे वडील सदाशिवराव एक खोत होते. आईची संस्कारशील शिकवण हे सानेगुरुजी यांच्या आयुष्यातील  फार मोठे भांडवल होते. अगदी साध्या साध्या प्रसंगातून आई गुरुजींवर संस्कार करत गेली. आंघोळ करून बाहेर येणाऱ्या श्यामला , ' बाळा पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस तशी मनाला घाण लागू नये म्हणून जप हो!'  असा सहज संस्कार करून जाणारी श्यामचीआई जगात श्रेष्ठ ठरते. एवढेच नाही तर सानेगुरुजींची 'श्यामची आई' ही महाराष्ट्राला मिळालेली अनमोल देणगी आहे.
      सानेगुरुजी शिक्षक म्हणूनही तितकेच महान आहेत. इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही पदवी धारण करून ते अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाले. अध्ययन आणि अध्यापन एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता त्यांनी विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने जीवन शिक्षण दिले. ते स्वतः वसतिगृहाची जबाबदारी सांभाळत असत. त्यातून त्यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे दिले. सेवावृत्ती शिकवली. एवढेच नव्हे तर जीवनाचे खरेखुरे तत्वज्ञान देखील शिकवले.
           साने गुरुजी लेखक म्हणूनही तितकेच महान आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी 'विद्यार्थी' नावाचे मासिक सुरू केले. शिक्षकाची नोकरी सोडल्यावर 'दैनिक काँग्रेस'  नावाचे साप्ताहिक सुरू केले. 'पत्री' हा काव्यसंग्रह लिहिला. ' बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो' ही गाजलेली कविता साने गुरुजींनी 'पत्री' या काव्यसंग्रहातून लिहिली. नंतर त्यांनी साधना नावाचे साप्ताहिक सुरु केले.  संपूर्ण आयुष्यात गुरुजींनी एकूण 73 पुस्तक लिहिली.  विशेष म्हणजे त्यातील बहुतेक लिखाण त्यांनी तुरुंगात असताना पूर्ण केले. विनोबा भावे यांच्या 'गीताई' या पुस्तकाचे लेखन देखील गुरुजींनी विनोबाजींच्या सहवासात  धुळ्याच्या तुरुंगात असताना केले. 'कुरळी' या तमिळ महाकाव्याचे गुरुजींनी मराठीत भाषांतर केले. 'करील मनोरंजन जो मुलांचे,जडेल नाते प्रभूशी तयांचे'  हे गुरुजींचे ब्रीद होते. 'खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे' हे गुरुजींचे गीत आजही शाळाशाळांमधून प्रार्थना म्हणून गायिले जात आहे. गुरुजींनी लिहिलेल्या 'मोलकरीण' आणि 'श्यामची आई' या कादंबऱ्यांवर  चित्रपट देखील निघालेले आहेत.
             संवेदनशील मनाचे गुरुजी सामाजिक-राजकीय चळवळींपासून स्वतःला अलिप्त ठेवू शकले नाहीत. 1930 साली गुरुजी 'सविनय कायदेभंग' आंदोलनात सहभागी झाले. 1936 साली जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या यशस्वीतेमध्ये गुरुजींचा सिंहाचा वाटा होता. साने गुरुजींनी 'राष्ट्र सेवादलाची' स्थापना केली. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा म्हणून गुरुजींनी उपोषण केले. त्याला यशही मिळाले आणि 'एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले' असे म्हटले जाऊ लागले. पुढे त्यांनी समाजवादी पक्षातही काम केले.     
          वेळोवेळी गुरुजींना तुरुंगातही जावे लागले. श्यामची आई हे पुस्तक त्यांनी नाशिकच्या तुरुंगात असतानाच  लिहून पूर्ण केले. 11 जून हा गुरुजींचा स्मृतीदिन आहे.
   तहहयात पेटत्या निखाऱ्यावर चालून प्रत्येक मराठी माणसाला स्फूर्ती आणि संस्कार देणाऱ्या सानेगुरुजींच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

-सुधाकर रामदास पाटील,
प्रा.शिक्षक,
जि. प. शाळा शेलवली बांगर,
ता.शहापूर जि. ठाणे
7798963063
srp1672@gmail.com



श्यामची आई.....संस्कारांची शिदोरी

"आई माझा गुरु, आई कल्पतरु, विद्येचा सागरु आई माझी",
आपल्या इवल्याशा बोटाला धरून आपल्याला आपल्या पायावर उभं करणारी आई, चिल्यापिल्यांच्या पंखांना बळ देणारी आई, चिऊ-काऊच्या गोष्टी सांगून घास भरवणारी आई, अंगाई गाते बाळाला कुशीत झोपवणारी आई. आई म्हणजे न दमणार चालत बोलत घड्याळ! पहाटेपासून रात्री पर्यंत आणि रात्रीपासून पहाटेपर्यंत डोळ्यात तेल घालून बाळाचे संगोपन करणारी आई! आई म्हणजे ममतेचा अथांग सागर. बाळ कसा आहे असो तो तिचा कान्हाच असतो. आई वेळोवेळी मुलांना  योग्य दिशा दाखवत असते. त्याला ती सुसंस्कृत बनवते. खरंतर आई गुरुचीच भूमिका पार पाडत असते. मुलांवर चांगले संस्कार करून त्यांचे समाजात एक चांगलं व्यक्तिमत्त्व घडविण्यात यशस्वी होत असते अशीच एक यशस्वी आई म्हणजे सानेगुरुजींची 'श्यामची आई.'
मित्रांनो, साने गुरूजींचे श्यामची आई हे पुस्तक आपण वाचलच असेल. नसेल तर नक्की वाचा सिनेमादेखील पहिला असेल नसेल तर अवश्य पहा. श्याम म्हणजेच साने गुरुजी. त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. त्यांच्या जन्मा 24 डिसेंबर 1999 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव यशोदा. त्यांच्या आईने त्यांना घडवले एक सुसंस्कृत आणि समाज प्रिय माणूस बनवले.
सर्व सृष्टीवर प्रेम करायला शिकवणारी, झाडे, फुले, पशू, प्राणी यांच्यावर प्रेम करायला शिकवणारी, गरिबीतही स्वतःचे स्वत्व न गमावता सत्याने वागणारी, कोंड्याचा मांडा करून खाणारी, गरिबांविषयी कणव असणारी, असे कितीतरी गुणवैशिष्ट्ये यांनी भरलेली श्यामची आई म्हणजे संस्काराची शिदोरीच!
श्यामची आई हे पुस्तक वाचत असताना पुस्तकातील प्रत्येक कथा ही आपल्याला नवीन संदेश देते. त्यात साने गुरूजी म्हणतात," मित्रांनो, माझ्या अंगात जे चांगले गुण आहेत ते सर्व आईचे देणे आहे. माझ्या आईने मला मनुष्यावरच नव्हे तर सर्व सजीव सृष्टीवर प्रेम करायला शिकवले. श्रीमंतीने माजू नये आणि गरिबीत लाजू नये हेही तिने मला शिकवले. आपल्याकडे जे देण्यासारखे आहे ते देत रहावं हे देखील माझ्या आईने मला शिकवले. माझ्या जीवनात घडलेले अनेक प्रसंग, अनुभव माझ्या गाठीशी आहेत. काही चुका घडत गेल्या त्यातूनच मला आईकडून धडा मिळत गेला आणि मी घडत गेलो. माझ्या आईचे गुणगान करून मी पवित्र होईल, मी धन्य होईल. ही  संस्काराची शिदोरी जपायची असेल तर प्रत्येक आईने आज सानेगुरुजींची आई होणे मला जास्त महत्वाचे वाटते.
महात्मा गांधी म्हणत," आई हे मुलाचे पहिले विद्यापीठ आहे." या वाक्यात आई म्हणजे मुलाची पहिली शाळा. शाळेत मुल सहा तास असतं आणि उरलेले अठरा तास ते घरात असतं. सुरुवातीची काही वर्ष या आईच्या विद्यापीठातच तर जातात. तेव्हा शाळा जीवनात काय करते याचं मूल्यमापन करताना आई नावाच्या शाळेत मुल काय शिकतो आणि काय शिकायला पाहिजे याचा विचार करताना 'श्यामची आई' योग्य मार्गदर्शक ठरते.
सोप्या सोप्या प्रसंगातून ती जे तत्त्वज्ञान सांगते ते किती विलक्षण आहे! श्याम डोक्यावरचे केस वाढवतो, वडील रागवतात श्याम वैतागून म्हणतो," आई केसात कसला गं आलाय धर्म?" तेव्हा ती म्हणते," तुला केस राखायचा मोह झाला ना. मग मोह टाळणे म्हणजे धर्म." इतके सोपे धर्माची व्याख्या ती सांगते. लाडघरच्या समुद्रात पैसे वाहते. तेव्हा श्याम म्हणतो," ज्याच्या पोटात रत्न आहेत त्याला पैसे कशाला?" तेव्हा ती म्हणते,"सूर्यालाही आपण ओवाळतोच ना? प्रश्न आहे त्याच्या कृतज्ञतेचा."
अनेक जण म्हणतील की, आज काळ बदलला आहे. आजचे प्रश्न वेगळे आहेत. मोबाईल आणि संगणक वापरात ही पिढी खूप

 पुढे गेली आहे. हे जरी खरं असलं तरी मुलांमधील बालपण जगवायला, मुलांना संवेदनशील आणि सामाजिक बनवायला श्यामच्या आईचीच शिदोरी वापरावी लागेल.
आजच्या वेगवान बदलाच्या काळात शिक्षणात ध्येयवाद आणि भावनांक विकसन या गोष्टी खूप दूर गेल्या आहेत. मुलांचा भावनांक वाढवायचा कसा? या नव्या पिढीला संवेदनशील बनवायचं कसं? हे कळीचे प्रश्न आहेत.
अशा या गंभीर सामाजिक परिस्थिती शिक्षक, पालक व मूल यांना एकाचवेळी संबोधित करायला आणि या तीनही घटकांना अधिक संवेदनशील आणि प्रेमळ बनवायला 'शामची आई' हेच एकमेव औषध आहे. यातून केवळ शिक्षणक्षेत्रावरच चांगला परिणाम होणार असं नाही, तर व्यापक पातळीवर समाज अधिक संवेदनशील होणार आहे. तेव्हा श्यामची आई समाजाला पुन्हा एकदा श्रद्धास्थान वाटणे हा समाजाचा प्रवास विवेकाकडे आणि संवेदनशीलतेकडे असेल त्यासाठीच श्यामची आई संस्कारांची शिदोरी ठरते.

-मनिषा पांढरे,
सोलापूर
9730195015



संस्कार सरिता:- सानेगुरुजी

पूज्य सानेगुरुजी लक्षवेधी मुलांवर, युवकांवर, कामगार, किसान वर, निती संस्कार करणारे एक राष्ट्रीय शिक्षक होते. ओल्या मातीला आकार देण्यासाठी, संस्कार सरीतेत मुलांना न्हाऊ घालण्यासाठी त्यांची धडपड होती. प्रेम म्हणजे हृदयाचा विकास, ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास, आणि शक्ती म्हणजे शरीराचा विकास हा गुरुजी चा मंत्र होता. गंगे सारखे निर्मळ असलेले लाखोंची मने आपल्या आचार विचाराने पोसणारे सानेगुरुजी ही एक संस्कार सरिता होती. साने गुरुजींच्या वाड्मयात, त्यांच्या  भाषणात, त्यांच्या आचरणात संस्कार क्षमतेची कक्षा  वाढविण्याची प्रखर शक्ती होती. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा सद विचाराने, सदाचाराने व ध्येय निष्ठेने जीवन सफल होऊ शकते याचे सानेगुरुजी एक आदरणीय उदाहरण आहे .
साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव माने. त्यांचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या खेड्यात 24 डिसेंबर1 899 सालीझाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करत होते. बालपणी त्यांची आई त्यांची देवता होती. आईने दिलेले शिक्षण हीच त्यांच्या आयुष्याची शिदोरी होती." आई माझा गुरु आई माझी कल्पतरू"असे तिचे वर्णन "श्यामची आई "या पुस्तकातून केले आहे."खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे"आणि "बलसागर भारत होवो"हयाच्या कविता प्रसिद्ध आहे. शालांत परीक्षेचा अभ्यास त्यांनी पुणे येथे पूर्ण केला. चुरमुरे, शेंगदाणे खाऊन दिवस काढले. गुरुजींनी शालांत परीक्षा 1918साली* देऊन पुढील शिक्षणासाठी न्यू पुना कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी पुण्यात कोठे काम, कुठे शिकवणी, थोडे स्वालंबन या प्रकारांनी स्वाभिमान सांभाळून मदत घेत आपला मार्ग कम  साकारला. ग्रंथ आणि ग्रंथालयाशी मैत्री केली. अमळनेरच्या तत्वज्ञान केंद्रात दाखल झाले. तेथूनच त्यांनी एम ए ची परीक्षा दिली. व ते खानदेश शिक्षण संस्थेच्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. शाळेत असतानाच त्यांनी मुलांसाठी "छात्रालय दैनिक" सुरु केले. पुढे "विद्यार्थी" नावाचे मासिक पण सुरू केले.
          1930 सारे भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण वर्षे होते. पंडित नेहरूंनी संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा करून 26 जानेवारी हा स्वातंत्र्य दिन म्हणून जाहीर केला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. ते स्वतः तमिळ ,बंगाली आदी भाषा शिकले होते. 1948 मध्ये त्यांनी "साधना "साप्ताहिक सुरु केले. त्यांच्या कथा ,कादंबर्‍या, लेख, निबंध, चरित्रे ,कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. त्यांनी एकूण 73 पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले."श्यामची आई"ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगातच लिहीली. आचार्य विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात सांगितले व साने गुरुजींनी लिहिली.
साने गुरुजींनी तुरुंगातून बाहेर आल्याबरोबर सामाजिक अभिसरणाचा वेग वाढवण्यासाठी अस्पृश्यता निवारणाचे कार्य हाती घेतले. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांना खुले झाले. 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला.
1 फेब्रुवारीला कामगार मैदान परळ येथे गुरुजींचे भाषण झाले. हृदय पिळवटून टाकणाऱ्या शब्दात गुरुजी बोलत होते. साऱ्यांचे डोळे पाण्याने भरून आले होते. देशभर ध्येयशूनयतेचे धुके वाढतच चालले होते. काँग्रेस, सेवादल ,प्रांत भरती, ही जीवितकार्य निराश मय होत चालली होती.
गुरुजींनी निर्णय घेतला आणि 11 जून 1950 या दिवशी महानिर्वाण करण्याचे ठरवले. खादीचे नवे कपडे घातले. साधना, सेवा दलातील जवळच्यांना पत्रे लिहिली. आणि झोपेच्या गोळ्या घेऊन मातृभूमीच्या मांडीवर तिचा लाडका शाम चिर निद्रिस्त झाला.

-भारती दिनेश तिडके,
रामनगर, गोंदिया
8007664039.



"परमपूज्य साने गुरुजी:-अल्प परिचय"

साने गुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी कोकणातील "पालगड "या गावी झाला.साने गुरुजींचे वडील "सदाशिवराव "खोताचे काम करीत असत. लहानपणापासून गुरुजींचे आपल्या आईवर अतोनात प्रेम होते." श्यामची आई" या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या साऱ्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. सर्वांवरती प्रेम करण्याचा धडा साने गुरुजींच्या आईंनीच त्यांना दिला. साने गुरुजींचे मन अतिशय भावनाप्रधान व संस्कारक्षम होते. म्हणूनच आईने पेरलेल्या सद्भावनांची वाढ त्यांच्या ठिकाणी लवकर झाली. गुरुजींनी विपुल वाङ्मय लिहिले आहे. कादंबऱ्या लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद, इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालत होती. त्यांच्या वाङ्मयातून  कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींचा वर्षाव झालेला आहे. त्यांच्या भाषेला एक प्रकारची धार आहे, बोध आहे. त्यांची साधीसुधी भाषाच लोकांना आवडली. गुरुजींनी आपले सर्व लेखन  समाज उध्दारासाठी केले. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणी द्वारे प्रकट केले. साने गुरुजी यांची कर्मभूमी खानदेशची. अमळनेर येथील तत्त्वज्ञान मंदिर आणि प्रताप विद्यालयात त्यांनी अध्यापन केले. स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाबद्दल त्यांना तुरुंगवास झाला. नाशिक कारागृहात त्यांनी" श्यामची आईचे "लेखन पूर्ण केले. धुळ्यातील कारागृहात असताना त्यांनी विनोबा भावेंनी सांगितलेली "गीताई" लिहिली. मुलांवर संस्कार व्हावेत यासाठी त्यांनी विपुल लेखन केले. “श्याामची आई‘ च्या एकपात्री प्रयोगांनी तर संस्काराची शिदोरी अधिकच घट्ट केली. गुरुजींनी अंमळनेर, धुळे व काही काळ नाशिक येथे वास्तव्य करून खानदेशला कर्मभूमी बनविले. गुरुजींचे आणखी एक मोठे कार्य म्हणजे "आंतरभारतीची स्थापना "करण्याचा प्रयत्न होय. प्रांताप्रांतातील हेवादेवाही अद्याप नष्ट झालेला नाही. भारतीयाच्या एकत्वताला बाधक ठरणार असे दिसू लागले म्हणून त्यांनी प्रांताप्रांतातील द्वेष नाहीसा होऊन सर्वत्र बंधूप्रेमाचे वारे वाहावे यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतीनिकेतन प्रमाणे काही सोय करावी, हि मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्यसंमेलनामध्ये याच ठरावावर बोलत व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता. पण,हे कार्य अपूर्ण असतानाच त्यांनी आत्महत्या केली.
         पांडुरंग सदाशिव साने "साने गुरूजी" नावाने प्रसिद्ध होते.ते स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते. साधी, सरळ, ओघवती भाषा, भावपूर्ण संस्कारक्षम निवेदनशैली हे त्यांच्या लेखणाचे विशेष गुण होते. 'श्यामची आई', 'नवा प्रयोग', 'सुंदर पत्रे', 'हिमालयाची शिखरे', 'क्रांती', 'समाजधर्म', 'आपण सारे भाऊ' इत्यादी त्यांचे विपुल साहित्य प्रसिद्ध आहे.त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती. १९२८ साली त्यांनी "विद्यार्थी "हे "मासिक "सुरू केले. त्यांच्यावर "महात्मा गांधींच्या" विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वत: खादीचाच वापर करत असत. १९३०साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून "सविनय कायदेभंगाच्या चळवळीत "भाग घेतला. त्यांनी काँग्रेस नावाचे साप्ताहिक काढणे, दुष्काळात शेतकर्‍यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न करणे, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी कार्य केले. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार या माध्यमांतून त्यांनी राजकीय कार्य केले. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी मैला वाहणे व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. त्यानी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली. समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला.      
     साने गुरुजी यांचे ११ जून १९५० रोजी निधन झाले.

-शुभांगी विलास पवार,
नागठाणे (कंदी पेढा),
सातारा



साने गुरुजी तुम्ही आज हवे होता

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सत्ययुगातील कौसल्येचा राम हा आदर्श पुत्र मानला जातो तर द्वापर युगात यशोदेचा कान्हा अर्थात कृष्ण हा आदर्श पुत्र मानला जातो तर आजच्या सत्ययुगात यशोदेचा शाम अर्थात साने गुरुजी हे आदर्श पुत्र मानले जातात. यशोदेचा शाम अर्थात पांडुरंग सदाशिव साने यांचा जन्म 24 डिसेंबर 1999 मध्ये पालघरमध्ये झाला. साने गुरुजींची जीवन म्हणजे आजच्या विद्यार्थ्यांसाठी एक संस्कार शाळा आहे.
श्यामची आई पुस्तक वाचलं नाही किंवा ज्याने त्याबद्दल काहीच ऐकले नाही असे महाराष्ट्रामध्ये व्यक्ती सापडणे दुर्मिळ आहे गेली ऐंशी वर्षे या पुस्तकाने सर्वांना मोहिनी घातली असे श्यामची आई पुस्तक. लॉक डाऊन काळात सर्व परिवाराने एकत्र बसून रामायण आणि महाभारत पाहिले कृष्णा पाहिले त्याचबरोबर श्यामची आई ही देखील दूरदर्शन मालिका सुरू केली असती तर फार बरे झाले असते असे वाटते कारण गीता रामायण यामधून जे संस्कार आपणास आपल्या पिढीला द्यायचे आहेत तेच संस्कार शामचीआई मधून दिले गेले आहेत. श्यामची आई म्हणजे साने गुरुजींनी आसवांच्या रूपात लिहिलेले एक पुस्तक आहे.
आजकालचे आई-वडील असे म्हणतात मला जे कष्ट पडले ते माझ्या मुलाला करायला लावू नयेत परंतु त्या सर्वांनी श्यामची आई हे पुस्तक वाचावयास हवे त्यामधून त्यांना कळेल शामच्या वडिलांनी आणि आईने त्यांच्या मुलांना कसे घडवले ?श्यामचे वडील स्वतः पाने घेऊन स्वतः जेवणासाठी पत्रावळ बनवत असत आणि मुलांनाही ते बनवण्यास आपल्या कृतीद्वारे शिकवले. जेवणात मीठ जरी कमी असले तरी याअन्नास  त्यांनी पूर्णब्रह्म मानून  व अन्न बनवणाऱ्या  अन्नपूर्णेचा अपमान होऊ नये तिचे कष्ट वाया जाऊ नये तिला नावे ठेवली जाऊ नयेत म्हणून जेवताना अन्नाविषयी कधीही तक्रार केली नाही.
आणि आज आपण मुलांना कष्ट पडू नये म्हणून किती काळजी घेतो यातून मुले खरेच घडतील का?
साने गुरुजींनी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसाठी दिलेले योगदान अनमोल तर आहेच परंतु स्वातंत्र्यलढ्यातील एक स्वातंत्र्य सेनानी म्हणून देखील त्यांनी कार्य केले आणि आपल्या वागण्याने शिक्षक कसा असावा हे दाखवून दिले .पंढरपूरच्या पांडुरंगाला या पांडुरंगाने बडव्यांच्या जोखडातून मुक्त करून जनसामान्यांच्या दर्शनासाठी खऱ्या अर्थाने खुले केले.
साधारण मार्च महिन्यापासून संपूर्ण भारत लॉक डाऊन स्थितीत गेला आणि प्रत्येकालाच घरी बसून काय करावे? मुलांवर संस्कार कसे करावे हा प्रश्न पडू लागला? लोक डाऊन मुळे अनेक जण अंतर्मुख झाले आणि विचार करू लागले .अशाच एका लॉक डाऊन मध्ये सानेगुरुजी देखील काही काळ गेले होते.  1933 मध्ये ते नाशिकमधील तुरुंगात  होते. आज आपण संसर्गजन्य रोगांच्या भीतीने  लॉकडाऊन मध्ये गेलो होतो परंतु साने गुरुजी आपल्या विचारांवर चालण्याच्या स्वभावामुळे व भारतभूमीला इंग्रजांच्या दास्यातून मुक्त करण्यासाठी इंग्रज सरकारविरुद्ध गेले त्यामुळे त्यांना तुरुंगवास घडला आणि एक प्रकारे  लॉक डाऊन सोसावा लागला. या तुरुंगवासाच्या काळात त्यांनी एकूण 73 पुस्तके लिहिली. नाशिकच्या तुरुंगात असताना आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी आपल्या आईच्या काही आठवणी सांगितल्या. 45 रात्री पैकी 42 रात्रीच्या गोष्टी पुढे अजरामर श्यामची आई या पुस्तकाच्या रूपाने सर्वांसमोर आल्या.
आज भागवत सप्ताह, रामायण सप्ताह, गीता सप्ताह असे आपल्या भारतामध्ये अनेक कथा सप्ताह साजरे होतात मला वाटते सानेगुरुजींच्या या 73 गोष्टींचा रूपात आपल्याकडे सप्ताह साजरा होऊ लागला तर संस्कारक्षम पिढी घडवणे नक्कीच अवघड नाही.
आजकाल कोणी एखादे पुस्तक लिहिले किंवा एखादा शोध लावला तर त्याच्या कॉपीराईट साठी कितीतरी भांडणे होतात , कोर्टामध्ये मध्ये दावे दाखल होतात परंतु गुरुजींचे उदाहरण अशा लोकांसमोर नक्कीच सांगावयास हवे आहे .श्यामची आई हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्यांनी 'पत्री' हा कवितासंग्रह प्रकाशित केला. 'बलसागर भारत होवो' हे काव्य त्यामधील एक त्यामुळे इंग्रज सरकारला त्यावर आक्षेप होता आणि त्यांनी या कविता संग्रहा वर बंदी घातली. पण  पुण्यातील अनाथ विद्यार्थी गृहाच्या मालकीच्या छापखान्यात हा कविता संग्रह छापला गेला त्यामुळे गुरुजींना दोन हजार रुपये जामीन भरावा लागला. संस्थेलाही चांगलाच फटका बसला .गुरुजी या घटनेने व्यथित झाले. आपल्यामुळे एका अनाथ वसतिगृहाच्या संस्थेला फटका बसला म्हणून गुरुजींना वाईट वाटले त्यांनी अवघ्या पाचशे रुपयात श्यामची आई पुस्तकाबद्दल सर्व हक्क या अनाथ मुलांच्या विद्यार्थीगृहास विकले. नाईलाजास्तव त्यांनी ही गोष्ट केली आणि निराश होऊन त्यांच्या सहकाऱ्यांना म्हणाले आज मी माझ्या आईला मी विकून आलो. किती मोठा त्याग साने गुरुजींनी केला होता आज हा त्याग खरंच सर्वांसाठी दिशादर्शक आहे.  श्यामची आई चे मुखपुष्ट गुरुजींच्या एका विद्यार्थ्याने तयार केले होते. शिक्षकांसाठी  त्यांच्याच एका   विद्यार्थ्याने केलेले  सुंदर काम. आजच्या विद्यार्थ्यांसमोर हा एक चांगलाच आदर्श आहे. असे असावे गुरुजी आणि असेच असावे आजचे विद्यार्थी.
एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी केलेला त्याग म्हणजे किती चांगले उदाहरण आहे. त्यामुळे असे वाटते सानेगुरुजी आज खरच तुम्ही हवे होतात एक संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी आणि विद्यार्थ्याला दिशा देण्यासाठी.

-सविता साळुंके,
श्रीरामपूर
9604241747



साने गुरुजी- स्वच्छतेचे पुजारी

    करीन सेवा तव मोलवान
असो अहंकार असा मला न
कधी करावा पथ साफ छान
कधी हरावी मलमूत्र घाण
बघून रोगर्त करेन घाई
बनेन त्याची निरपेक्ष आई
  अशा या साने गुरुजींच व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होत.त्यांचा जन्म कोकणात पालगड या गावी 24 डिसेंबर 1899 या दिवशी झाला.त्यांच संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने होते.पण सानेगुरुजी याच नावाने ते अधिक लोकप्रिय झाले.त्यांच आईवर विलक्षण प्रेम होत.
  नाशिकच्या तुरुंगात असताना त्यांनी आईच्या आठवणी शब्दबद्ध करणार 'श्यामची आई 'नावाच पुस्तक लिहिले.
साने गुरुजींच बालपण अतिशय कष्टात आणि दारिद्र्यात गेल पण विद्येची तहान  त्यांना स्वस्थ बसू देईना. औंध च्या वसतिगृहात तर मधुकरी मागून आणि वार लावून त्यांनी शिकण्यासाठी प्रचंड धडपड केली. इथून पुढे त्यांच्या आयुष्यातील धडपडणारा श्याम हा नवा अध्याय सुरू झाला.
   गुरुजी विलक्षण बुद्धिमान .पुण्यातील नुमवी मधून ते मॅट्रिकची परीक्षा द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.स.प. महाविद्यालयातून संस्कृत व मराठी विषय घेऊन बी. ए. झाले.  साने गुरुजींनी मुलांसाठी सुमारे 150 पुस्तके लिहिली.ती कमालीची लोकप्रिय झाली.असे असूनही साने गुरुजींनी एका ठिकाणी म्हटलं आहे
' मला लेखणीच्या लालित्य इतकंच झाडूच ललित्यही प्रिय आहे'
साने गुरुजींनी अमळनेरच्या शाळेत 5 वर्षे शिक्षक म्हणून काम केलं. गुरुजी मुलांच्यात राहायचे,बसायचे,उठायचे त्यामुळे ते मुलांशी एकरूप झाले होते. ते मुलांना गोष्टी सांगत.मुलांना आईशिवाय राहण्याची सवय नव्हती.स्वच्छता व टापटीप याबाबतीत मुलांचं वर्तन यथातथाच होत .चांगल्या सवयी या मुलांना लावायलाच हव्यात पण छडीच्या जोरावर किंवा शिक्षा करून मुलांच्यात सुधारणा घडवून आणणे हे गुरुजींच्या मनाला कस रुचाव? त्या महात्म्याच अंतःकरण मातेचं होत .
  मूले संध्याकाळी खेळायला गेली की ,स्वतः हातात झाडू घेऊन मुलांच्या खोल्या स्वच्छ करायचे.खेळून आल्यावर मुलांच्या लक्षात यायचे, त्यांच्या खोल्या चकाचक असायच्या. मुलांची समजूत हे काम शाळेचा गोपाळ गाडी करत असे.पण एक दिवस त्यांचा भ्रमनिरास झाला.बार नसल्याने खेळायला न गेलेल्या एका मुलाने गुरुजींना खोल्या स्वच्छ करताना पाहिले. त्याने ती गोष्ट मित्रांना सांगितली. संध्याकाळी मुले प्रार्थनेला जमली. गुरुजींच्या लक्षात आले की आज मुले हसत खेळत नाहीत ,तेव्हा त्यांनी विचारले, बाळांनो , आज तुम्ही गप्प गप्प का?
एक जण म्हणाला, आम्ही तुमच्यावर रागावलो आहोत. आम्ही खोल्या अस्वच्छ करायच्या आणि तुम्ही त्या स्वच्छ करायच्या.
   अरे, घरी तुमची आई तुमची असली कामे करते ना? बर जाऊदे , आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे म्हणजे तुमचा राग पळून जाईल. गुरुजींनी मोरू शहाणा झाला ही गोष्ट सांगितली.गोष्ट सांगितल्याबरोबर मुले उठून निघून गेली. गुरुजींना आश्चर्य वाटले.पण मग समजले की, मुले त्यांच्या खोल्या स्वच्छ करायला गेली होती .एक साधी कृती किती बोलकी असू शकते याचा हा वस्तुपाठच होता.
     
-निलम विनायक गायकवाड,
(उपशिक्षिका), पुणे



*महाराष्ट्राचे अलंकार साने गुरुजी*

'मराठी भाषेवर माझे अपार प्रेम आहे. मी तिचा भक्त आहे. मराठीवर प्रेम करण्यात मी कुणालाही हार जाणार नाही. मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य शोभतो.' किती सुंदर शब्दात आपल्या भाषेवर प्रेम करणार्‍या ओवीत आपले विचार व्यक्त केलेत. अशा आपल्या भाषेवर आपल्या आई इतकेच प्रेम करणार्‍या साने गुरुजींचा आज स्मृति दिन.

        बालवयात योग्य संस्कार झाले तर संपूर्ण आयुष्य कसं सूर्याप्रमाणे प्रकाशमान होतं याचे जिवंत उदाहरण म्हणजे यशोदा सदाशिव साने. या मातेने अगदी बालपणापासूनच आपल्या बाळावर संस्कार टाकले ते जीवनभर व मृत्यु पश्चात अजरामर झालेत. आईचे प्रेम जिथे असेल ती झोपडी राज राजेश्वरी च्या ऐश्वर्या ला सुद्धा लाजवेल हे प्रेम जिथे नाही ते महाल व दिवाणखाने म्हणजे स्मशानच होत. अशा या श्यामच्या यशोदा आईला त्रिवार नमन. बाल वयात मुलांच्या मनावर जे संस्कार होतात ते आयुष्यभर त्याची सोबत करतात. हे लक्षात घेऊन आई-वडिलांनी मुलांवर चांगले संस्कार करायला पाहिजेत. पूजनीय साने गुरुजी यांना सुदैवाने तसेच आई-वडील लाभले होते.जर साने गुरुजी ला यशोदा सारखी संस्कार टाकणारी आई नसती तर कदाचित आज साने गुरुजी ला कुणीही ओळखलं नसतं. म्हणूनच म्हणतात, *जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी*

साने गुरुजींचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी दापोली तालुक्यातील पालगड या गावी झाला हे गाव रत्नागिरी जिल्हात येते. त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने, पण त्यांना घरी पंढरी म्हणत.त्यांची आई यशोदाबाई, वडील सदाशिवराव  हे पंढरीचे योग्य तर्‍हेने संगोपन करत. ते प्रथम पालगड च्या शाळेत शिकले. त्यांचे वडील त्यांच्या शिक्षणात फार दक्ष होते. तसेच यशोदाबाईने लहानपणी त्यांच्या वर फार मोलाचे संस्कार केले. सालस, गुणी, कष्टाळू आणि सात्विक मनोवृत्ती असलेल्या पंढरीची पुढे ‘गुरुजी’ हीच ओळख झाली. लहान वयातील शारीरिक-मानसिक जडण-घडण करण्याची  जबाबदारी ही मुख्यत: आई वरच पडते. त्यांची आई तशीच होती.त्या म्हणायच्या” पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसेच मन घाण होऊ नये म्हणूनही जप हो !” , खोटे कधी बोलू नको, ‘ कोणत्याही प्रकारचे काम करण्याची लाज बाळगू नको ”, ” दिन दुबळ्याना मदत करण्यास पुढे हो” अशा अनेक गोष्टी त्यांना लहानवयात रुजवण्यात आल्या. त्या प्रेम करीत,पण चुकी झाल्यास कठोर शिक्षा देत असत.त्यामुळे मोठेपणी ते सत्यनिष्ठ, परोपकारी, प्रामाणिक बनले. ध्येय जितके महान तेवढा त्याचा मार्ग ही खडतर व लांब असतो

     पालगडचे पाचवीपर्यंत  शिक्षण झाल्या नंतर ते मामा कडे पुण्याला गेले, तेथे त्यांनी अनेक धार्मिक पोथीपुराणांचे   वाचन केले पण आईकडे जाण्याच्या ईच्छेने ते परत पालगडला आले. त्यासाठी त्याना खूप बोलणी खावी लागली. पण ते भरपूर कामे करून आईची मदत करीत असत त्यामुळे घरच्यांचा राग दूर करत. नंतर ते इंग्रजी शिक्षणा करीता आत्याकडे दापोलीला राहिले तेथे त्यांनी आपली वाचनाची हौस भागविली. संस्कृत, ईंग्रजी, मराठी अशी अनेक पुस्तके त्यांना तेथे वाचनास मिळत. 

त्यानंतर  माहिती पडले की  औंध ला मोफत शिक्षण व जेवण मिळते. तेव्हा घरच्यांच्या परवानगीने ते औंध ला गेले.काही दिवसातच तेथे प्लेग ची साथ आल्यामुळे  ते परत आले. नंतर ते पुण्याला गेले, १९२२ मध्ये बी.ए. ची पदवी उत्तीर्ण झाले.पुढे अमळनेरला तत्वज्ञान मंदिरात काम करीत एम.ए.झाले.

करेल मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयांचे

     साने गुरुजींना खानदेश एजुकेशन सोसायटी शाळेत  नोकरी मिळाली. मुलांना शिकविण्याची त्यांची पद्धत आणि त्यामागची कळकळ पाहून उत्तम शिक्षक म्हणून प्रसिद्धी झाली. काही दिवस वस्तीगृहाचे काम चालविले. मुलांना चांगले संस्कार देण्याची त्याना संधी मिळाली. त्यावेळीच त्यांच्या मनात आपण देशासाठी काही तरी करावे असे वाटू लागले. नेत्यांची भाषणे, गांधीजींच्या चळवळी जनतेला मिळणारे संदेश या सर्व गोष्टींने  त्यांच्या मनावर देशा विषयीच्या भावना बळावल्या. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी.

       १९३० मध्ये त्यांनी शाळा सोडली.आणि ते आश्रमात दाखल झाले. सत्याग्रहाच्या कामात भाग घेऊन भाषणे करू लागले त्यांच्या भाषणाने तरुणांना भारावून जात. त्यांच्या अंमळनेरच्या  भाषणात त्यांवर खटला भरण्यात आला त्याना १५ महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली.त्यातही त्यांनी लोकशिक्षण, लेखन, स्फूर्ती गीते चालूच ठेवले.” स्वातंत्र्याचे आम्ही शिपाई”, ”दुखी सारख्या कथा,” ”खरा सत्याग्रही” , क्रांती, आस्तिक, अशा कथा कादम्बरी, नाटके त्यांनी लिहिलीत. त्यांची ”श्यामची आई ” ही कादम्बरी फार प्रसिद्ध झाली.

श्यामची आई या कादंबरीतील बालमनावर संस्कार रूजविणारे धडे आजही प्राथमिक स्तरातील वर्गात अभ्यासक्रमात समाविष्ट केलेले आहे. स्वातंत्र्यलढ्यात भूमिगत राहून त्यांनी देशाच्या स्वांतंत्र्यासाठी अंनेकांना प्रेरणा दिली. साने गुरुजींनी लिहिलेले 'खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....' ही प्रार्थना आजही प्रत्येक शाळेत विद्यार्थी मोठ्या भक्ति भावाने म्हणतात. 'बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो....' हे देशभक्ति दर्शविणारे साने गुरुजीनी लिहिले ले गीत म्हणताना आपोआपच देशभक्ति जागृत होते. 

 ”आधी केले मग सांगितले” या विचारांचे ते होते. समाजात एकोपा राहावा असे त्याना वाटे. ”साधना साप्ताहिकांचे संपादन”  कुमार संमेलनाचे अध्यक्षपद, मंदिर प्रवेशाच्या निमित्ताने पंढरपुरला प्राणांतिक उपोषण असे समाज कार्य करताना त्यांनी कुमारांना संदेश म्हणून सांगितले ” देशी- विदेशी वाड्मयाचा अभ्यास करा, अनुवाद करा. सर्वत्र हिंडून वाड्मय गोळा करा, आणि देशाची, समाजाची सेवा करा ही शिकवण त्यांनी दिली व सेवा दलात त्यांनी प्रत्यक्ष कार्य केले होते. ते मनाने फार हळवे होते देशाच्या स्वातंत्र्या नंतर घडलेल्या काही घटनांनी अस्वस्थ झालेले गुरुजी अखेर ११ जून १९५० साली सर्वांना सोडून गेलेत.

       आज त्यांचा स्मृति दिन असून जरी आज ते या जगात नसले तरी प्रत्येक भारतीयांच्या हृदयात ते जिवंत आहेत. आजही सन्मानपूर्वक एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून, आदर्श शिक्षक म्हणून साने गुरुजींचे नाव आदराने घेतले जाते.

 मेघ सारे पाणी देतात, झाडे फळे देतात , फुले सुगंध देतात, नद्या ओलावा देतात, सुर्य चंद्र प्रकाश देतात, यशोदा सारखीआई मुलांवर संस्कार देतात व त्यामुळेच असे साने गुरुजी सारखी संस्कारी मुले तयार होतात.

-जयश्री निलकंठ सिरसाटे,
गोंदिया
9423414686



जगाला प्रेम अर्पणारे साने गुरुजी

  आपले आयुष्य समुद्रात तरंगणार्‍या नौकेसारखे आहे.  तरुन जाण्यासाठी एखाद्याला बर्‍याच लाटाचा सामना करावा लागतो. आम्ही मानव देखील या जीवनात प्रवास करणारे प्रवासी आहोत. या दु:खात आपल्याला समाधान देणारे एकमेव बाधन म्हणजे पुस्तके. पुस्तकांद्वारे आपल्याला जीवनातल्या अनेक संघर्षांना सामोरे जाण्याचे ज्ञान मिळते. पुस्तके आपले जीवन घडवतात.त्याचप्रमाणे जगात एक अप्रतिम पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. साने गुरुजींचे "श्यामची आई" हे पुस्तक.या पुस्तकाच्या माध्यमातून साने गुरुजींनी जगभरातील लोकांना संस्कारांचे ज्ञान दिले आहे.अशा महान व्यक्तीची म्हणजेच साने गुरुजींच्या जीवनाची ओळख प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे.

त्यांचा जन्म पालगड गावात 24 डिसेंबर रोजी झाला. त्याच्या वडिलांचे नाव सदाशिव आणि आईचे नाव यशोदा.  त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या घरची स्थिती चांगली होती. पण नंतर तेकालपरत्वे बदलले.तथापि, आई यशोदाने हिम्मत हरली नाही.चांगली मूल्येच तिने आपल्या मुलांना दिली.  गरीबीतही स्वाभिमान सोडला नाही.श्यामला म्हणजेच साने गुरुजींना स्वाभिमानी जीवन शिकवून आत्मनिर्भर बनले. आईने दिलेलं हे शिक्षण गुरुजींनी आयुष्यभर जपलं. साने गुरुजी मातृहृदयी होते.तिच्या आईमुळेच त्यांच्या मनात सात्विक भावना निर्माण झाल्या. स्वातंत्र्यलढ्यात जेव्हा - जेव्हा ते तुरूंगात जात तेव्हा - ते आपला वेळ तसाच घालवत नसत.ते तिथे लिहायचे.तुरुंगातही त्यांनी "श्यामची आई" हे अजरामर पुस्तक लिहिले.या पुस्तकात त्यांनी आईचे प्रेम, संस्कृती आणि भारतीय संस्कृतीची ओळख करुन दिली आहे.आम्ही जेव्हा जेव्हा हे पुस्तक वाचतो तेव्हा आपल्या डोळ्यांमधून नकळतपणे अश्रू येतातच.साने गुरुजींच्या लिखाणाचे हे गमक आहे.त्यांच्यासाठी, त्यांची आई महान होती, त्याच वेळी,तो आपल्या भारतमातेलाही मानत.तिच्यासाठी लढणे हे ते आपले कर्तव्य देखील मानत असे.तिच्या संरक्षणार्थ लढण्यात धन्य वाटे.कोणाबद्दलही त्याला कधीही द्वेष, मत्सर वाटण्याची भावना त्यांच्या मनात कधीही आली नाही. त्याचे मन प्रेमळ होते. दयाळूपणाने आणि करुणेने नेहमीच भरलेले असायचे.ते नेहमी म्हणायचे, जर आपल्यालाआपले मन शुद्ध करायचे असेल तर आपल्या अश्रूंसारखे कोणतेही औषध प्रभावी नाही. त्यांना मानवजात, निसर्ग, झाडे, पक्षी, फळे आणि प्राणीसुद्धा आवडत होते.  संपूर्ण जगातील कोणीही दुखी नसावे,असे त्यांना वाटे.म्हणून त्यांनी सर्वांना अत्यंत प्रेमळपणे वागवले. त्यांना असे वाटत होते की सर्वांनी आनंदाने च जगावे. “खरा तो एकची धर्म जगला प्रेम अर्पावे”ही गीत हेच सांगते. या गाण्याने त्यांनी संपूर्ण मानवजातीसाठी सद्भावना व्यक्त केली आहे., हे गीत त्यांनी लिहिले आहे.त्यांचा विश्वास होता की प्रेम हे जीवनाचे तत्वज्ञान आहे. प्रेमाच्या बदल्यात आनंद देण्यावर त्याचा विश्वास होता.त्यांचा असा विश्वास होता की प्रत्येकाने आपल्या आयुष्यात नेहमीच आनंद लुटला पाहिजे.ते म्हणतात की बालपणात आपल्याकडे चांगली मूल्ये आहेत, आयुष्यभर प्रेमाचे समर्थन करत आले.ज्याप्रकारे आपण आपले शरीर मलीन होण्यापासून वाचवितो त्याच प्रकारे, आपले मन देखील घाणेरड्या विचारांपासून दूर ठेवले जावे. असे त्यांना वाटे. मोह आपले हृदयाला दु: खी करते, म्हणून आपण कधीही आपल्या मनात मोह ठेवू नये ही त्यांच्या आईची शिकवण त्यांनी आयुष्यभर पाळली होती.कोणतीही चांगली कामे करण्यास त्यांना कधीच लाज वाटली नाही.ते म्हणायचे, " जेव्हा आपण वाईट गोष्टी करतो तेव्हा आपल्याला लाज वाटली पाहिजे.जे काही चांगले कार्य ते करा.कोणत्याही कामाला छोटे किंवा मोठे समजू नका. सर्वांनी ते परिश्रमपूर्वक करावे." त्यांचा स्त्री-पुरुष समानतेचा संदेशही महत्त्वाचा आहे.त्यांचे साहित्यही विपुल आहे.  ज्यामध्ये आपल्याला संस्कार शिकायला मिळतात, निसर्गाप्रती असलेले प्रेम दिसून येते.आम्ही जेव्हा जेव्हा त्यांचे साहित्य वाचतो तेव्हा असे दिसते की पुस्तकातील संदर्भ डोळ्यांसमोर आहे.आम्ही त्याचा अनुभव घेऊ शकतो.  हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येकाने परिश्रमपूर्वक वाचन केले पाहिजे,असे ते म्हणत.त्यांनी जगात प्रचलित असलेल्या अनेक वाईट प्रथांच्या विरोधात आपले लेखन केले आहे.समाजावर प्रभाव पाडणारे प्रबोधनपर लेखन केले आहे.त्याचे मन खूप संवेदनशील होते.त्यांनी महात्मा गांधींच्या स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेतला होता.ते खादीचे कपडे नेहमी परिधान करत. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला तेव्हा देशभक्तीपर गीते लिहून ,गाऊन त्या गाण्यांनी लोकांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटली.त्यांना हरिजनांविषयीही दया होती.आयुष्यभर त्यांनी आपल्या आईचा संस्कार सोडला नाही.सतत संघर्षांचाच सामना केला, दारिद्र्याशी सामना केला.जेव्हा त्यांनी वसतिगृहात काम केले तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांना खूप चांगले संस्कार दिले.त्यांनी त्यांची आईसारखी सेवा केली.त्यांची शिक्षणाची पद्धतही खूप प्रभावी होती.त्यांच्या कार्याने ते महान व अमर झाले.त्यांचे कार्य प्रत्येकासाठी आदर्श आहे. आणि कायम राहील.  परंतु वारंवार प्रयत्न करूनही समाजात त्याचा काही परिणाम होत नाही.हे पाहून त्याच्या मऊ, संवेदनशील मनाला खूप वेदना होत.अशा दु: खी मनस्थितीत त्यांनी 11 जून 1950 रोजी आपला जीवनयात्रा संपवली. पण समाजातील लोकांना कुणाबद्दल काहीच वाटतं नाही. ते नेहमी आपली वाट न सोडता चांगले ऐकण्याचा प्रयत्नही करत नाहीत.

-श्रीमती माणिक नागावे, 
कुरुंदवाड, जिल्हा कोल्हापूर
9881862530


 

शामची आई

मातृप्रेमाचा महन्मंगल झरा,

शामची आई बावनकशी सोनं

पांडुरंग सदाशिव साने लेखक

आहे शंभर नंबरी खरं नाणं

कारावासातील त्या रात्री,

दररोज एक कथा स्फुरली.

पत्थरदिल कैदीही गहिवरले,

सर्वांना आपली माता स्मरली.

संस्काराची खाण शामची आई

कर्तव्यदक्ष मातेची करुण कहाणी

शिकविले जगणे स्वाभिमानाने

नेहमीच तिची कोमल वाणी

पाठ भूतदयेचा,माणूसकीचा,

प्रेमाने सहजी शिकवला.

चटके गरीबीचे साहण्या,

स्वानुभवातून दाखवला.

आली भरल्या खानदानातून,

होती लक्ष्मी धनसंपत्तीची.

झाली लंकेची पार्वती संसारी

तमा न कुठल्या आपत्तीची.

दीनदुबळ्यांची केली सेवा,

पशूपक्ष्यांच्यावर केली माया

माणुसकी पुढे जातीयतेला,

सज्ज सदैव दूर फेकाया.

करुणावतार तर कधी करारी,

शिकवले पोहण्या शामला.

जरी दिले फटके पाठीवरती,

हात तेलाचा प्रेमाने लावला.

मुक्या कळ्या तोडण्या मनाई,

संदेश काळजाला भिडला.

स्मरणात सदैव राही माझ्या

प्रेरणाज्योतीसम जवळ दिसला.


-श्रीमती माणिक नागावे,

कुरुंदवाड, जिल्हा कोल्हापूर


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News