किनवट : दुचाकीच्या मागील चाकात साडीचे पदर अडकून झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर जखम होऊन एका शिक्षिकेचा मृत्यू झाला.ही दुर्दैवी घटना बुधवारी दि.३ सकाळी किनवट - दराटी मार्गावर घडली.
मुखेड तालुक्याच्या येवती येथील रहिवाशी मनीषा दिगंबर घोडके-सुडके ( वय ३३) ह्या यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील दराटी येथील जि.प.शाळा शिवाजीनगर येथे शिक्षिका म्हणून सेवारत होत्या.त्या किनवटच्या गोकुंदा येथे भाड्याच्या घरात राहात होत्या.दररोज त्या पतीच्या मोटारसायकलने शाळेत ये- जा करीत होत्या.
बुधवारी सकाळी मनीषा घोडके ह्या रोजच्याप्रमाणे त्यांचे पती प्रताप सुडके यांच्या मोटारसायकलने ( क्र.एम एच - २६ ए झेड १४१७) शाळेकडे निघाल्या होत्या.खरबी रस्त्यावरील टाकळी हनुमान मंदिराजवळ मोटारसायकलच्या चाकात मनीषा घोडके यांच्या साडीचा पदर अडकून त्या जमिनीवर कोसळल्या.या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.पत्नी दुचाकीवरून पडल्याचे लक्षात येताच पती प्रताप सुडके यांनी वाटसरुंच्या मदतीने जखमी पत्नीला ऑटोतून गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात आणले.प्रथमोपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचारासाठी आदिलाबादला हलविण्याचा सल्ला दिला.१०८ रुग्णवाहिकेने मनीषा घोडके यांना आदिलाबादला नेत असताना अंबाडी घाटात त्यांना उलट्या होवू लागल्याने पुन्हा त्यांना गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मृतक शिक्षिका मनीषा घोडके यांना पती,१ मुलगी,१ मुलगा होता. विशेष म्हणजे त्यांच्या मुलीचा बुधवारीच वाढदिवस होता.मनीषा घोडके यांच्या प्रेताच्या उत्तरीय तपासणीनंतर त्यांचा पार्थिवदेह येवती येथे नेण्यात आला.याप्रकरणी किनवट पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद करून सदर प्रकरण दराटी पोलिसांकडे वर्ग केले आहे.
No comments:
Post a Comment