तारीख २२ जुलै, २०२४ ते ३० ऑगस्ट, २०२४ या कालावधीत “महावाचन उत्सव-२०२४ हा उपक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. या निमित्त अनिल देवराव कांबळे, सहा. शिक्षक यांचा लेख येथे देत आहोत. - संपादक
शालेय औपचारिक शिक्षणाची सुरुवात पहिल्या वर्गापासून सुरू होत असते. आपल्याकडे आता शाळा पूर्व तयारी मेळावे घेऊन शालेय प्रवेशोत्सव अगदी दिवाळी सणासारखा साजरा करण्यात आला. "शाळेतील पहिले पाऊल" नावाची पुस्तिका प्रत्येक "दखलपात्र मूल "व त्याचे "माता-पिता" यांच्या हातात देऊन बालकांच्या शिक्षणाची सुरुवात अतिशय आनंददायक वातावरणात एक आनंद उत्सव म्हणून साजरा करून मागील एप्रिल 2024 व जून 2024 या महिन्यात "शाळापूर्व तयारी मिळावे" घेण्यात आले. बालकांच्या शालेय शिक्षणाची सुरुवात माता पालकांच्या सहकार्यातून करण्यात आली. उन्हाळी सुट्टीच्या काळात बालकांचे शिक्षण "माता गटांच्या" माध्यमातून व्हिडिओ कार्ड्सच्या तसेच शाळेतील पहिले पाऊल या पुस्तकाच्या माध्यमातून सुरू झाले व त्याची नोंद "विकास पुस्तिका" यामध्ये घेण्यात आली.
आई हा बालकाचा पहिला गुरु होय .आईच्या कुशीतील बालक प्रथमच शाळेत पहिले पाऊल ठेवणार आहे. शाळेबद्दलची मनातील भीती घालवण्यासाठी पहिल्याच दिवशी नवीन पुस्तके, पुष्पहार, गुलाबांची फुले आणि खाऊ वाटप करून बालकांचे शालेय शिक्षण सुरू झाले आहे.
शाळापूर्व तयारी मध्ये माता- पालकांचे सहकार्य का घ्यावे? असा प्रश्न निर्माण होतो तेव्हा, आपल्याला राष्ट्रमाता माँ जिजाऊंनी व शहाजीराजे भोसले यांनी शिवरायांना लोककल्याणकारी राजा बनवण्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवले ते दिसते. दुसरे असे की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांनी बाल भीवा विषयी पाहिलेले स्वप्न ते असे की, भीमराव शिकून सवरून या देशातील सर्व बहुजन समाजाच्या कल्याणाचे, त्यांच्या उद्धाराचे काम करेल, ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांना प्रयत्नाची जोड आई-वडिलांनी दिली. म्हणूनच बालकांच्या शालेय शिक्षणाची सुरुवात ही त्यांच्या माता-पित्यांच्या सहकार्यातून करणे गरजेचे झाले. बालकांच्या सर्वांगीण विकासात माता-पिता, समाज आणि शिक्षक यांची महत्त्वाची भूमिका असते.
शाळेत पाऊल ठेवण्यापूर्वीच बालक भाषा बोलायला शिकले आहे. काही गाणी ऐकून गोड आवाजात गायन करते आहे. चित्र रंगवते आहे. मित्रांसोबत खेळते आहे. आता शालेय वातावरणात त्याचे मन रमले आहे. शालेय शिक्षणाची सुरुवात आनंददायक झाली आहे.
आता आता खऱ्या अर्थाने आनंददायक वातावरणात अक्षर ओळख करून देणे, सोपे शब्द वाचायला शिकायला मदत करणे तसेच शालेय वातावरणाची निर्मिती करणे हे प्रत्येक शिक्षकाचे काम आहे .मूल वाचायला शिकल्यानंतर पुढील टप्पा येतो तो म्हणजे समजपूर्वक वाचनाचा. समजपूर्वक वाचनाच्या टप्प्यावर मुल आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच्या व्यक्तिमत्व जडणघडणीच्या कार्यास सुरुवात होत असते. शाळेबद्दलची आवड मनात निर्माण होत असते .
वाचन हे व्यक्तिमत्व विकासाचे एक महत्त्वाचे साधन आहे .वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते. विचारांची क्षितिजे विस्तारित होतात आणि व्यक्तीमध्ये सर्जनशीलता वाढते. विविध साहित्य, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे आणि शैक्षणिक पुस्तकांचे वाचन करून व्यक्ती नवीन माहिती आणि दृष्टिकोन प्राप्त करते. वाचनाच्या सवयीमुळे भाषिक कौशल्य सुधारतात आणि व्यक्तीमत्त्व अधिक समृद्ध बनते. वाचन केल्याने तानतणाव कमी होतो आणि मेंदूला आराम मिळतो. वाचनामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. व्यक्तीच्या विकासासाठी आणि समाजाच्या व राष्ट्राच्या उन्नतीसाठी वाचन संस्कृती समाजात रुजविणे आवश्यक आहे. वाचनातून अध्ययनशील समाज निर्माण करणे हे शिक्षकांचे कार्य आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाचन हे अत्यंत आवश्यक आहे. वाचनामुळे त्यांच्या अभ्यासाच्या गतीत वाढ होते. वाचनाच्या सवयीमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात भर पडते. तसेच वाचनामुळे त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळते.
आदर्श उदाहरण द्यायचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्राविषयी आपण सर्वजण जाणतो. डॉ. बाबासाहेबांना शालेय जीवनापासूनच शालेय पुस्तकांबरोबर अवांतर पुस्तके वाचनाचा दांडगा व्यासंग होता. त्यांचे पुस्तकांवर अत्यंत प्रेम होते. त्यांच्या या वाचनाच्या सवयीमुळे त्यांचे व्यक्तिमत्व विकसित होत गेले. ते भारतातच नव्हे तर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील सर्वात हुशार विद्यार्थी ठरले .आज त्यांचा पुतळा कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये बसवण्यात आला आणि त्याखाली लिहिले "सिम्बॉल ऑफ नॉलेज" म्हणजेच 'ज्ञानाचे प्रतीक'. पुस्तके माणसांचे मन ,मेंदू सशक्त करण्याचे काम करतात. बाबासाहेबांचे जागतिक कीर्तीचे व्यक्तिमत्व त्यांच्या अथक वाचनामुळे घडले हा आदर्श शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घ्यावा.
दुसरे उदाहरण म्हणजे डॉ. अब्दुल कलाम .हे पण बालपनापासून अगदी वाचायला पण शिकले नव्हते, तेव्हापासून वर्तमानपत्रातील चित्रे पाहून वाचन करण्याचा प्रयत्न करत- करत त्यांची पुस्तकांशी मैत्री जमली. शालेय जीवनापासून ते आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा पुस्तके वाचनाचा छंद कायम राहिला. यातूनच त्यांचे व्यक्तिमत्व जागतिक कीर्तीचे बनत गेले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला देशाने सलाम केला. ते देशाचे "मिसाईल मॅन" तसेच देशाचे "राष्ट्रपती" बनले. असे आदर्श व्यक्तिमत्व पुस्तक वाचनाने घडले. समजपूर्वक वाचन हे आदर्श व्यक्तीमत्त्व घडविण्याचे प्रभावी साधन आहे. एवढेच नव्हे तर जागतिक सर्व महान ज्ञानी महापुरुष हे वाचन, मनन आणि चिंतन करून प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे धनी बनले आहेत.
कोविड-19 च्या जागतिक संकटाच्या काळात आपल्याही देशातील सर्व मुले पुढील वर्गात प्रवेशित करण्यात आली. कोविडच्या काळात गुरुजी व विद्यार्थी यांचा प्रत्यक्ष संबंध आला नसल्यामुळे त्यांच्या समजपुर्वक व गतीने वाचनाच्या बाबतीत अडथळे निर्माण झाले. वाचायला येत नसेल तर बालकांच्या मनात न्यूनगंड निर्माण होणे, आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होणे या प्रक्रिया आपोआप घडत असतात. त्यातूनच "मूल शाळाबाह्य" होण्याची सर्वात जास्त भीती निर्माण होते. अशी परिस्थिती निर्माण होऊच नये, सर्वच बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी "मीनल करणवाल" यांनी प्रत्यक्ष शिक्षकांची एक दिवसीय बैठक घेऊन आपण प्रगत मुल आणि प्रगत शाळा करण्यासाठी, गोष्टींचा शनिवार, अवांतर वाचन, दप्तरमुक्त एक दिवसाची शाळा, "वेध" प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिकावे कसे हे शिकण्याची प्रेरणा मुलांना कशी द्यावी, या संबंधाने यशोगाथांचे सादरीकरण करून घेतले. वेध प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुलांना प्रेरित करणे, आव्हानात्मक कामे देणे, त्यांची "सेल्फी विथ सक्सेस" घेणे व ती समाज माध्यमापर्यंत पोहोचविणे त्यातून विद्यार्थ्यांचे शिक्षण व समाज सहभाग घेण्याचे यशस्वी प्रयोग जिल्हाभर राबविण्यात येत आहेत. हा प्रयोग यशस्वी करणारे "शिक्षक व प्रगत शाळा" यांचा सत्कार येत्या 15 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात येणार आहे. सीईओ यांच्या प्रेरणेतून जिल्हाभर "वाचन उत्सव" घेण्यात येत आहे. मीनल करनवाल ह्या यूपीएससीच्या परीक्षेत देशातील 35 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी अभ्यास करण्याचे एक तंत्र जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अवगत करून दिले आहे. ते म्हणजे "प्रश्न निर्माण कौशल्य" होय. विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययन करत असताना स्वतः प्रत्येक ओळीवर प्रश्न तयार करावा. त्याचे उत्तर तयार करावे. या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांचे प्रभावी व समजपूर्वक अध्ययन होत आहे. ही अभ्यासाची पद्धत अतिशय उपयुक्त आहे. सध्या सर्वच शाळांमध्ये याच पद्धतीने अभ्यास करून घेतला जात आहे. यातून विद्यार्थ्यांना आनंद मिळत असून स्वयं अध्ययनाची, वाचनाची गोडी लागली आहे.
माझ्या उमरी तालुक्याचे मातृहृदयी, साहित्यिक गटशिक्षणाधिकारी नंदकुमार कुलकर्णी यांनी दिनांक 20 जुलै 2024 रोजी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेऊन विविध शासकीय उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुक्यात उत्साही वातावरण निर्मिती केली आहे . त्यांच्या प्रोत्साहनाने सर्व शिक्षक वर्गात नवचैतन्य निर्माण झाले आहे. सदरील उपक्रम राबवून आपला तालुका नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर असावा असा मनोदय व्यक्त करून संपूर्ण उपक्रम 100% यशस्वी करण्याची जबाबदारी ,आशावाद आणि विश्वास शिक्षण या घटकावर ठेवला आहे. त्यांचा असा विश्वास आहे की शिक्षक हा राष्ट्रउभारणीतील आधारभूत घटक आहे. शिक्षकांनी ठरवले तर ते राष्ट्राचे नंदनवन करू शकतात .सध्या एमपीएससी ,यूपीएससी ,नीट चे रिझल्ट पाहिले तर ते विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत शिकलेले असल्याचे पाहावयास मिळते .जिल्हा परिषद शाळेत सर्वांगीण विकासाचे शिक्षण देण्याचे काम शिक्षक करतात असा त्यांचा विश्वास आहे.
राज्यातील सर्वच शाळांमध्ये "महाराष्ट्रातील वाचन चळवळ" हा उपक्रम माननीय राज्यपाल यांच्या हस्ते व मा मुख्यमंत्री ,मा. शालेय शिक्षण मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी सदर उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
*महावाचन उत्सव 2024- 25*
राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सण 2024- 25 या वर्षात महावाचन उत्सव 2024 हा उपक्रम रीड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबविण्याचा शासन निर्णय दिनांक 16 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे. त्याचा शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2024 पत्र क्र 217 एसडी4 हा आहे.
*सदर उपक्रमाची व्याप्ती*
राज्यातील सर्व माध्यमातील इयत्ता तिसरी ते बारावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतात.
*ईयत्तानिहाय वर्गवारी*
गट पहिला- ईयता .तिसरी ते पाचवी
गट दुसरा -ईयता .सहावी ते आठवी,
गट तिसरा- ईयता. नववी ते बारावी .
* *उपक्रमाची उद्दिष्टे*
1. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे
2. विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे
3. मराठी भाषा ,मराठी साहित्य ,मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांचे नाते जोडणे.
4. दर्जेदार साहित्याचा व लेखक ,कवींचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे.
5.विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणे .
6. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व भाषा संवाद कौशल्य विकासास चालना देणे. *उपक्रमांचा कालावधी*
दिनांक 22 जुलै 2024 ते 30 ऑगस्ट 2024
*उपक्रमाचे स्वरूप*
1. सदर उपक्रम राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडून अंमलबजावणी करण्यात येईल .
2. एमपीएसपी एक वेबपोर्टल विकसित करेल .त्यावर सहभागी विद्यार्थ्यांनी वाचन केलेल्या पुस्तकावर विचार करून सारांश रूपाने 150 ते 200 शब्द पर्यंत सारांश लेखन करून पोर्टलवर अपलोड करतील.
3. विद्यार्थी वाचनाचा सारांश देणारा एका मिनिटाचा व्हिडिओ किंवा ऑडिओ किंवा ऑडिओ क्लिप महावाचन उत्सव 2024 या पोर्टलवर अपलोड करतील .
*पारितोषिके*
सदर उपक्रमासाठी तालुका, जिल्हा, शैक्षणिक विभाग व राज्य या स्तरावर प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात येणार आहे .
शासनाचा सदरील उपक्रम अतिशय उपयुक्त असून विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासाच्या कार्यात उपयोगी आहे. विद्यार्थ्यांचे FLN पूर्ण केलेल्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन .
सदरील उपक्रमात सहभागी होण्यासाठी माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांना हार्दिक शुभेच्छा!
-अनिल देवराव कांबळे
सहा.शिक्षक,
जिल्हा परिषद हायस्कूल , हुंडा गंगा पट्टी
तालुका उमरी जिल्हा नांदेड
(9403524852)




No comments:
Post a Comment