मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांच्या पुढाकाराने आज मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मुख्यालयात उत्तर मुंबईतील प्रलंबित विषयांबाबत बैठक पार पडली. या बैठकीत भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मागाठाणे विधानसभा क्षेत्रात प्रलंबित असलेल्या मूलभूत नागरी समस्यांचे तातडीने निराकरण करावे, अशी मागणी मनपा आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली.
या बैठकीला खासदार पियुष गोयल, विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर, आमदार सुनील राणे, आमदार मनिषा चौधरी, आमदार योगेश सागर यांसह महापालिका, एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत बोलताना आ. दरेकर यांनी मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक ३, ४, ५, ११, १२, २५, २६, २७ मधील प्रलंबित समस्या आयुक्त गगराणी यांच्यासमोर मांडल्या. त्यात प्रामुख्याने दहिसर (पूर्व), चेकनाका ते समता नगर दरम्यान सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी खुला करून अनेक रिक्षा, टू-व्हीलर गॅरेज, सर्व्हिस सेंटरवर कारवाई करावी. वैशाली नगर तावडे कंपाउंड येथे पोलीस बिटची उभारणी करावी, बस क्रमांक ६, ९, ८ येथील शेवटचा थांबा बाळूमामा मंदिर येथे अनधिकृत पार्किंग होत आहे. ती अनधिकृत पार्किंग बंद करावी. शिववल्लभ क्रॉस रोड व एसएन दुबे रोड, शिंगटे कंपाउंड, चौगुले कंपाउंड येथे अवजड वाहनांची सर्रास ये-जा होत असल्याने शाळेच्या वेळेस मुलांना त्रास होत आहे. तसेच अपघात होत असल्याने अवजड वाहनांची वाहतूक शाळेच्या वेळेस बंद करावी.
तसेच एक-एक चाळ झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यापेक्षा खाजगी विकासकाकडून सामूहिकपणे योजना राबविल्यास खेळाची मैदाने, उद्याने, आरोग्य केंद्रे आणि दवाखाने आदीसाठी आरक्षित भूखंडाचा विकास आराखड्यात नगररचनाकाराच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करावे. श्रीकृष्ण पुलाचे काम जलदगतीने चालू असून तेथील वाहतूक लवकरात लवकर खुली करावी. अतिवृष्टीमुळे नॅशनल पार्कमधून येणाऱ्या नदीच्या प्रवाहात श्रीकृष्ण नगर, शांतीवन परिसर, काजूपाडा झोपडपट्टी येथील सुदाम नगर, श्रीराम नगर येथे घरात पाणी शिरल्याने पुरस्थिती निर्माण होते. परिणामी तेथील रहिवासी व व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यावर नगर रचनाकाराच्या माध्यमातून पुनर्विकास करून कायमस्वरूपी मार्ग काढावा.
एसआरए प्रकल्प प्रलंबित झाल्यास सभासदांचे भाडे थकीत राहिल्यास त्या गरीब सभासदांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. यासाठी विकासकावर भाडे थकविल्यास थेट एफआयआर नोंदवून कार्यवाही करावी. रहेजा येथील बॉटलनेकच्या सद्यस्थितीचा आढावा घ्यावा. जानूपाडा पांडे कंपाउंड येथे वीज मीटर, पाण्याचे नवीन कनेक्शन बसवावे. वॉर्ड क्र. २५ येथील आकुर्ली प्रसूतीगृह नूतनीकरण करून मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालयाची निर्मिती करावी. संभाजीनगर येथील नाला आच्छादित करून संभाजीनगर ते एनजी पार्क येथील डीपी रस्ता चालू करावा. मागाठाणे विभागातील इमारतींत नागरिकांना गॅस कनेक्शन उपलब्ध करून द्यावे. तसेच डीपी रस्ते विकसित करून नागरिकांच्या मूलभूत समस्यांचे निराकरण करावे, या मागण्यांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment