नांदेड : सोमवारी (ता.१६ सप्टेंबर) येथील कुसूम सभागृहात झालेल्या एका शानदार समारंभात अतिदूर्गम आदिवासी किनवट तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात विशाल बोधीवृक्ष साकारणारे अभियंता प्रशांत ठमके यांना मान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्मृतिशेष गंगाधरराव पांपटवार जयंती महोत्सवाच्या निमित्ताने गंगाधरराव पांपटवार वैद्यकीय सहकारी संस्था संचलित टिचर्स क्लब रुग्णालयाच्या सहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून तिरुमला फाऊंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान केले समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
सोमवारी (ता.१६ सप्टेंबर) दुपारी ४ वाजता कुसूम सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे , स्वागताध्यक्ष प्रा. डी.बी. जांभरुनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक जगदिश कदम (साहित्य), बालाजी जाधव (उद्योजकता), डॉ. जगन्नाथ चितळे (कला), ज्ञानेश्वर महाजन (समाजसेवा), गोपाळ पा. ईजळीकर (कृषी) आणि चारूदत्त चौधरी (पत्रकारिता) यांचा समावेश होता.
अभियंता प्रशांत ठमके यांनी मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ अंबाडीचे सचिव तथा मातोश्री कमलताई ठमके बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून अतिदूर्गम , डोंगरी , आदिवासी किनवट तालुक्यात प्राथमिक शिक्षणा पासून ते उच्च माध्यमिक शिक्षणा पर्यंत विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालये व वसतीगृह स्थापून व ती यशस्वीपणे चालवून शैक्षणिक नवक्रांती केली आहे. त्यांच्या तहयात सुरू असलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील दैदिप्यमान कार्याची दखल घेऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व महावस्त्र देऊन गौरविण्यात आले .
याप्रसंगी उत्तर प्रदेशमधील मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित महाजन यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. स्मृतिशेष गंगाधरराव पांपटवार वैद्यकीय सहकारी संस्थेचे अध्यक्ष गजानन पांपटवार व तिरुमला फाऊंडेशनच्या सचिव अंजली पांपटवार यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.




No comments:
Post a Comment