नांदेड, ता. 17 सप्टेंबर :-“स्वस्थ नारी, सशक्त परिवार” या राष्ट्रीय अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्यप्रदेश राज्यातील धार येथून आज करण्यात आला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण येथील जिल्हा नियोजन भवन सभागृहात दूरदृश्यप्रणालीद्वारे दाखविण्यात आले. या निमित्ताने नांदेड जिल्हास्तरावरील “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियानाचे उद्घाटन पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्हा नियोजन भवन येथे पार पडले.
महिलांच्या आरोग्यासाठी आरोग्य यंत्रणेतील सर्व टिमने “स्वस्थ नारी सशक्त परिवार” हे अभियान यशस्वीपणे राबवावे, अशी सूचना पालकमंत्री अतुल सावे यांनी केली.
या कार्यक्रमास राज्यसभा सदस्य तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव तिडके, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, सहाय्यक जिल्हाधिकारी अनन्या रेड्डी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, महिला, नागरिक आदींची उपस्थिती होती.
या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांची तज्ज्ञ डॉक्टारांकडून मोफत आरोग्य तपासणी, समुपदेशन, उपचार केले जाणार आहे. कार्यक्रमात अवयवदानाची शपथ देण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी आरोग्य शिबिराबाबत माहिती देऊन आरोग्य शिबिराचा जिल्ह्यातील महिला लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
आज स्त्री रुग्णालय श्यामनगर नांदेड आणि उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे झालेल्या आरोग्य शिबिरात 1 हजार 175 महिला लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर 24 नागरिकांनी रक्तदान केले आहे. अशी माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली. शेवटी स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ. मनुरकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment