मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : नैसर्गिक शेती ही निसर्गाच्या नियमांवर आधारित आहे. ही शेतीपध्दत पाण्याचा वापर ५० टक्क्यांनी कमी करते आणि भूजलपातळी वाढवते. नैसर्गिक शेती हा हवामान बदलाच्या संकटावर उपाय असून या शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन चांगले येते. जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या रक्षणाबरोबरच पर्यावरण, प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य, पाणी आणि माती या तिन्हींचे रक्षण करण्याची ही पध्दती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.
राजभवन येथे नैसर्गिक शेती परिषदेत राज्यपाल आचार्य देवव्रत बोलत होते. या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, यांच्यासह खासदार, मंत्रीमंडळातील सदस्य उपस्थित होते.
राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले की, मी कुरूक्षेत्र येथील गुरुकुलात ३५ वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम केले. येथे देखील आम्ही रासायनिक शेती करत होतो मात्र कीटनाशक वापराच्या दुष्परिणामाच्या घटनांमुळे रासायनिक शेती सोडली. विविध तज्ज्ञांशी चर्चा करून नैसर्गिक शेतीची माहिती घेतली. यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याचा अनुभव आहे. अन्न हा विषय सगळ्यांच्या जीवनाशी संबंधित आहे. आजच्या शेतीचे तीन प्रकार आहेत रासायनिक, जैविक (सेंद्रिय) आणि नैसर्गिक शेती. सेंद्रिय शेतीत उत्पादन कमी मिळते, तर नैसर्गिक शेतीत उत्पादन घटत नाही, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. दोन्हींत मूलभूत फरक आहे. सेंद्रिय शेतीसाठी शेणखत आणि गांडूळ खत मोठ्या प्रमाणात लागते, नैसर्गिक शेती ही निसर्गाच्या नियमांवर आधारित आहे. जसे जंगलात कोणी खत, पाणी न टाकताही झाडे जोमाने वाढतात, तशीच पद्धत शेतीत लागू केली जाते. यात रासायनिक किंवा कृत्रिम हस्तक्षेप नसतो, तर मातीतील सूक्ष्मजीवांचे संतुलन टिकवले जाते. रासायनिक शेतीमुळे जमिनीची सुपीकता, धान्याचा स्वाद आणि पोषकता कमी झाली असून संशोधनानुसार गहू व भातातील पोषक घटक ४५ टक्क्यांनी घटले आहेत. म्हणूनच नैसर्गिक शेती ही केवळ शेतकऱ्यांसाठी नव्हे, तर प्रत्येकासाठी आवश्यक आहे असेही राज्यपाल देवव्रत म्हणाले.
राज्यपाल देवव्रत म्हणाले की, नैसर्गिक शेती पध्दती जर सर्व शेतांमध्ये राबवली, तर शेतातील पाणी जमिनीत शोषले जाईल. त्यामुळे पूर आणि दुष्काळ दोन्हीपासून बचाव होईल.जमिनीतील गांडूळ ही निसर्गाने दिलेली अद्भुत देणगी आहे. हे गांडूळ जमिनीला छिद्रे करून हवेशीर बनवते, पाणी शोषून घेण्यास मदत करते, आणि जमिनीला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश यासारखी पोषक तत्त्वे पुरवते. एक गांडूळ आपल्या आयुष्यात ५०,००० नवीन गांडूळ निर्माण करते आणि जमिनीचा ‘ऑर्गेनिक कार्बन’ वाढवते. हीच प्रक्रिया जंगलात नैसर्गिकरित्या होत असते – तिथे कोणी पाणी देत नाही, तरी झाडे १२ महिने हिरवी राहतात. कारण तिथे निसर्ग नियमांचे नैसर्गिकरित्या पालन होते. नैसर्गिक शेतीत रासायनिक खतांचा वापर न करता देशी गाईच्या गोबर व गोमूत्रापासून जीवामृत नैसर्गिक द्रव्य तयार केले जाते. त्यामुळे पिके तंदुरुस्त राहतात, रोग कमी होतात आणि उत्पादन वर्षागणिक वाढते.
रासायनिक शेतीमुळे जमीन नापीक होते व उत्पादन घटते. नैसर्गिक शेतीत जमीन पुन्हा सुपीक बनते, खर्च शून्य होतो. देशी गाईचे संवर्धन होते आणि आरोग्यदायी अन्न मिळते.पर्यावरण, पाणी आणि माती – या तिन्हींचे रक्षण होते.
राज्यपाल देवव्रत म्हणाले की, आजच्या रासायनिक शेतीमुळे आपल्या अन्नधान्यात, पाण्यात आणि हवेत विष मिसळले आहे. रासायनिक खतांच्या भरमसाठ वापरामुळे जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन संपत चालला आहे.
यापूर्वी हा ऑर्गेनिक कार्बन जो जमिनीत २.५% होता तो आता ०.५% पेक्षाही कमी झाला आहे. त्यामुळे जमीन नापीक होत आहे आणि लोकांच्या शरीरात हळूहळू विष जात आहे. यामुळेच हृदयरोग, कर्करोग, मधुमेह यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. शेणही जमिनीसाठी उपयुक्त पोषक द्रव्य ठरते. यांचा वापर करून “जीवामृत” तयार करता येते, ज्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव पुन्हा जिवंत होतात आणि पिके नैसर्गिक पद्धतीने वाढतात. रासायनिक शेतीचा त्याग करून देशी गायींचे संगोपन आधारित नैसर्गिक शेतीकडे वळल्यासच आपली जमीन, आरोग्य आणि पर्यावरण वाचू शकते. रासायनिक शेतीमुळे जमिनीतील सुपीकता कमी होत चालली आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन घटते आहे, खर्च वाढतो आहे, आणि निसर्गाचे संतुलन बिघडत आहे.




No comments:
Post a Comment