*“आनंद करंदीकर यांच्या विचारांची परंपरा जिवंत राहील”; श्रद्धांजली सभेत डॉ. नीलम गोऱ्हे यांचे भावनिक मनोगत* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, November 23, 2025

*“आनंद करंदीकर यांच्या विचारांची परंपरा जिवंत राहील”; श्रद्धांजली सभेत डॉ. नीलम गोऱ्हे यांचे भावनिक मनोगत*




पुणे : (विशेष प्रतिनिधी उदय नरे) स्व. डॉ. आनंद करंदीकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित श्रद्धांजली सभा दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी विद्यार्थी सहायक समिती हॉल, एफ.सी. रोड, पुणे येथे अत्यंत भावस्पर्शी वातावरणात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास काळे होते, तर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या उपस्थित होत्या.


*डॉ. नीलम गोऱ्हे यांचे भावनिक मनोगत*


सभेचा समारोप करताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी डॉ. आनंद करंदीकर यांच्यासोबतच्या अनेक दशकांच्या सहवासाच्या आठवणी अत्यंत भावपूर्ण शब्दांत व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “१८ तारखेला मला ‘आनंद गेले’ ही बातमी समजताच अनेक वर्षांचा प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला. त्यांच्या नेत्रदान-देहदानाचे संकल्प प्रत्यक्षात कसे उतरवावेत याच विचाराने मन भरून आले.”


आपल्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “१९७६ मध्ये आम्ही साधेपणात, सामाजिक बांधिलकी जपत विवाह केला. फक्त ५० जणांच्या उपस्थितीत अनावश्यक खर्च टाळण्याचा निर्णय आम्ही दोघांनी घेतला.”


१९८१ मध्ये युवक क्रांती दलातील संघर्ष, रोजगार हमी योजना, सावकारीमुक्ती, जनआंदोलन आणि गरीबांसाठीच्या लढ्यात आम्ही दोघेही समर्पितपणे उभे राहिल्याची आठवण त्यांनी सांगितली. “कोणत्याही सामाजिक लढ्यात ‘तू नक्की जा’ असे प्रोत्साहन मला आनंद सतत देत असे. आणीबाणीच्या काळात आमचे घर कार्यकर्त्यांसाठी सदैव खुले होते,” असे त्यांनी नमूद केले.


डॉ. गोऱ्हे यांनी एक अत्यंत वैयक्तिक आणि भावनिक आठवणही सामायिक केली. त्या म्हणाल्या, “मी सहा महिन्यांची गर्भवती असताना मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात आम्हा दोघांना अटक झाली. कस्टडीत मला त्या अवस्थेत पाहून आनंदने माझ्यासाठी कविता लिहिली होती."


शेवटी त्यांनी डॉ. करंदीकर यांच्या सामाजिक कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, “त्यांच्या विचारांची परंपरा सदैव जिवंत राहील,” असे सांगितले.


*सभेत मान्यवरांचे मनोगत आणि आठवणी*


मुक्ता करंदीकर यांनी वडिलांच्या आठवणी सांगताना अनेक भावनिक क्षण शेअर केले. सत्यजीत गोर्हे-परळीकर,  विचारवेध संस्थेचे अध्यक्ष अनिकेत माळी आणि जागृती संस्थेच्या अनिता पवार यांनी त्यांच्या सोबतचा सहवास, सामाजिक कामातील तळमळ आणि प्रेरणादायी अनुभव सांगितले.

आनंद करंदीकर यांची  भाची अमृता काळे यांनी दिवंगत मामासाठी पाठवलेले मनोगत वाचून दाखवले.

दिवंगत डॉ.आनंद यांची भाची अमृता हिने तिच्या लाडक्या नंदू मामाबद्दल भावना व्यक्त केल्या. आनंद करंदीकरांचे भगिनी जयश्री काळे यांनी त्या वाचुन दाखविल्या .अमृताने लिहीले की नंदू मामा आणि तिचे आजोबा विंदा करंदीकर यांच्यात बुद्धिबळाचे खेळ रंगत असत आणि त्यातून त्यांच्या बौद्धिकतेचे दर्शन घडत असे. आयुष्याच्या चढ-उतारात नंदू मामाचे मार्गदर्शन नेहमीच मोलाचे ठरले आहे.


डॉ.आनंद करंदीकर यांचे कनिष्ठ भाऊ उदय करंदीकर यांनी आठवण सांगितली की बेडेकर चाळीत कॉलरा आणि टायफॉईडची साथ असताना इंजेक्शनची भीती दूर करणारा आनंद दादा नेहमी पुढाकार घ्यायचा. मोठ्या कंपनीत नोकरी करताना रोज मला टाटा करूनच निघत असे. नंतर समाजकार्य करण्यासाठी त्याने उच्च पगाराची नोकरी सोडली तेव्हाही इतरांचा विचार प्रथम ठेवणारा तो माणूस होता.


उमेश वाघ (अखिल जनवडी मंडळ, गोखलेनगर) यांनी जातीअंताच्या कार्यात डॉ. करंदीकर यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण प्रयत्नांची माहिती दिली. जागृती सेवा संस्थेच्या मंगलाताई पाटील यांनी त्यांच्या सहृदय, दातृत्वपूर्ण स्वभावाचा उल्लेख केला. नगरसेवक आदित्य माळवी यांनी जातीअंत कार्यक्रमांदरम्यान झालेल्या परिचयाच्या आठवणी मांडल्या.


परभणीचे भूषण भुजबळ यांनी २०१९ च्या विचारवेध कार्यक्रमातील भेट, नांदेड विभागीय संमेलनातील त्यांच्या मार्गदर्शनाचा प्रभाव आणि त्यांच्या प्रेमळ, सहज वागणुकीचा उल्लेख केला. लॉकडाऊन काळात मानसिक आरोग्यावर डॉ. करंदीकर यांनी केलेल्या ऑनलाइन मार्गदर्शनाचीही दखल घेण्यात आली.


स्त्री आधार केंद्र आणि क्रांतिकारी महिला संघटनेच्या शोभा कोठारी त्यांच्या समांतर चाललेल्या सामाजिक चळवळीतील योगदानाचे स्मरण केले. डॉ. करंदीकर यांच्या व्याख्यानमालेवर आधारित पुस्तक प्रकाशित करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला.


कृषी विकास तज्ञ नरेंद्र हेगडे यांनी १९८० पासूनच्या सहवासाच्या आठवणी सांगताना म्हटले, “आनंद करंदीकर हे नावाप्रमाणेच आनंदी, निर्व्याज आणि शेतकऱ्यांविषयी अपार ममत्व बाळगणारे होते.” 


विचारवेध कार्यकर्ती त्रिवेणी यांनी सामाजिक विषयांवरील त्यांच्या तर्कशुद्ध चर्चा आणि व्यक्तिगत पातळीवरील प्रेरणेचा उल्लेख केला. “माझा आंतरजातीय विवाह हा त्यांच्या विचारप्रेरणेनेच शक्य झाला,” असे त्यांनी सांगितले.


*समारोप*


कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी डॉ. आनंद करंदीकर यांच्या सामाजिक कर्तृत्वाला, निष्ठेला आणि विचारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. समाजातील समानता, संवेदना आणि परिवर्तनाच्या मूल्यांना त्यांच्या कार्याने सदैव दिशा दिली असल्याचे मत एकमुखाने व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमास ईॅडसर्चचे डॅा. अशोक जोशी, डॅा. शैलेश गुजर, जेहलम जोशी , चंद्रशेखर वैद्य , शमसुद्दीन तांबोळी, अस्लम शेख, सुदर्शना त्रिगुणाईत, नितीन पवार , संदिप शिंदे, केदार पाठक, योगेश केसकर, डॅा.मुग्धा केसकर व अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News