*राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना’ ज्येष्ठ कलावंतांना सन्मानाने जगण्याचा आधार* *सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत १ ते ३१ जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज प्रक्रिया; पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा ५ हजार रुपये मानधन* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, July 9, 2026

*राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना’ ज्येष्ठ कलावंतांना सन्मानाने जगण्याचा आधार* *सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत १ ते ३१ जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज प्रक्रिया; पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा ५ हजार रुपये मानधन*

 


मुंबई, ता. ८ जुलै २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना’ अंतर्गत कला व साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १०० ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा ५,००० रुपये मानधन प्रदान करण्यात येणार आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी *दि. १ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाइन* अर्ज करावेत, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.


राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक न्याय, समता आणि सर्वसमावेशक विकासाची दिलेली प्रेरणा जपत, आयुष्यभर कला आणि साहित्य क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना आर्थिक आधार व सन्मान मिळावा, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांच्या योगदानाचा गौरव करून त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगण्यास सहाय्य करणे, हा या योजनेमागील प्रमुख हेतू आहे.


या योजनेसाठी अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक असून दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादेत १० वर्षांची शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे दिव्यांग अर्जदारांसाठी किमान वय ४० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. अर्जदाराचे कला अथवा साहित्य क्षेत्रातील किमान १५ वर्षांचे योगदान आवश्यक असून वयाने ज्येष्ठ असलेले विधवा, परित्यक्ता आणि दिव्यांग कलाकारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.


योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ६० हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे. तसेच ज्यांची उपजीविका प्रामुख्याने कलेवर अवलंबून असून अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन उपलब्ध नाही, अशाच पात्र कलाकारांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. केंद्र किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही नियमित मासिक पेन्शन अथवा महामंडळाच्या निवृत्तीवेतनाचा लाभ घेणारे अर्जदार या योजनेसाठी अपात्र राहतील. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.


ऑनलाइन अर्ज भरताना वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, पती-पत्नीचे संयुक्त छायाचित्र (लागू असल्यास), बँक पासबुक, अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास), राज्य अथवा केंद्र शासनाचे संबंधित प्रमाणपत्र (लागू असल्यास), नामांकित संस्था किंवा व्यक्तींचे शिफारसपत्र (लागू असल्यास) तसेच आवश्यक इतर कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.


सदर योजना मा. ॲड. आशिष शेलार, मंत्री (सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास), महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून तसेच मा. डॉ. किरण कुलकर्णी, सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकारांच्या कलासाधनेचा सन्मान करून त्यांना सामाजिक व आर्थिक बळ देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सातत्याने विविध कल्याणकारी उपक्रम राबवत आहे.


पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी अर्जाची अंतिम मुदत लक्षात घेऊन दि. ३१ जुलै २०२६ पूर्वी ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम पांडे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News