नांदेड :
रक्तक्षय असणे ही लहान बालके व किशोरवयीन मुलां-मुलींमधील तसेच प्रजननक्षम स्त्रीया व स्तनदा मातांमधील आढळणारी फार मोठी समस्या आहे. या समस्येच्या उच्चाटणासाठी सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी जिल्हयातील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी केंद्रांमधून सशक्त विद्यार्थी अभियानांतर्गत आयर्न व लोहाच्या औषध व गोळयांचे वाटप करण्याची विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी दिली आहे.
रक्तक्षयामुळे शारिरीक वाढ योग्य रितीने न होणे, शारिरीक कार्यक्षमता कमी असणे, बौध्दीक वाढ कमी होणे, प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे सांसर्गिक आजारास बळी पडणे यासारखे विविध दुष्परिणाम दिसून येतात. या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र शासनामार्फत अँनिमियामुक्त भारत अभियान कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या व्यापकतेसाठी ग्रामीण भागातील 2530 जिल्हा परिषदांच्या शाळा तसेच 3600 अंगणवाडी केंद्रांमधून ही विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच बालकांमधील रक्तक्षय टाळणे योग्य व सकस आहाराचे महत्व, सशक्त शरीर- बध्दीमान मन याची जाणीव विद्यार्थी व पालकांमध्ये निर्माण होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच स्वच्छतेसाठी नियमित हात धुणे महत्वाचे असून यादिवशी हात धुण्याचे प्रात्यक्षिक मुलांना करुन दाखविण्यात येणार आहे.
विशेष मोहिमेमध्ये स्थानिक पातळीवरील सन्माननिय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. तरी पालक व नागरीकांनी या माहिमेत सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे, महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही.शिंगणे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment