किनवट :
स्थिर असलेल्या चाकातील शिक्षणाचं एक आरं महात्मा जोतीराव फुले व सावित्रीमाई फुले यांनी फिरविलं तेव्हा बहुजनांच्या प्रगतीचं चक्र गतीमान झालं. त्यांनी जीवनभर समाजाला समतेचा विचार दिला. शेवटचा श्वास घेईपर्यंत त्यांनी परिवर्तनाच्या चळवळीचं कार्य केलं. महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी निमित्त त्यांच्या गळ्यात हारांचं ओझं टाकण्यापेक्षा आपल्या डोक्यात त्यांच्या विचारांचा प्रकाश टाकावा. असे प्रतिपादन महात्मा फुले समता परिषद, महाराष्ट्रचे प्रवक्ते प्रा.नागेशजी गवळी यांनी केले.
शनिवारी (ता. ११ ) महात्मा फुले चौक येथे किनवट व माहूर तालुक्यातील समस्त माळी समाज बांधवांच्यावतीने राष्ट्रपिता जोतीराव फुले व सावित्रीमाई फुले यांचा पुतळास्मारक नुतनीकरण लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. निवृत्त शिक्षणाधिकारी आनंदराव वाढे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार भिमराव केराव, माजी नगराध्यक्ष इंदुताई कनाके, के. मूर्ती, पं.स. सभापती प्रतिनिधी दत्ताआडे, नामदेव कातले, माजी सभापती सोपानराव केंद्रे, नगरसेविका जिजाबाई मेश्राम, रिपाईंचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक, अभियंता प्रशांत ठमके, प्रकाश गायकवाड, प्रा. किशनराव किनवटकर, शाहीर नागोराव गुरनुले, विकास कुडमते, गंगूबाई परेकार, करुणा आळणे, शिवराज राघूमामा, सुनिल बेहरे, जीवन कोटरंगे, पद्माताई गिऱ्हे, परविनबेगम आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे प्रा. गवळी म्हणाले, महापुरुषांना जातीपातीच्या चौकटीत बंद करणं म्हणजे सर्वांसाठी कार्य करणाऱ्या त्यांच्या विचारांचा हा अवमान आहे. फुले दाम्पत्यांनी केशवपन, सतीप्रथा, विधवा विवाह आदी सामाजिक परिवर्तनासाठी लढा दिला. तिथे गेल्यानंतर जीवन संपेल हे माहित असतांना सुध्दा प्लेगच्या साथीनं खल्लास होणाऱ्या वंचितांच्या वस्तीत सावित्रीमाई फुले गेल्या. एका प्लेग पिडीताला उपचारासाठी नेतांना त्यांही प्लेगच्या साथीनं कायमच्याच गेल्या.
याप्रसंगी शिल्पकार हर्षवर्धन इंगोले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वागताध्यक्ष ज्योतिबा खराटे यांनी प्रास्ताविक केले. राहूल वाढे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष पेटकुले यांनी आभार मानले.
यावेळी बोलतांना आमदार भिमराव केराम असे म्हणाले की, शहरात उभारलेले महापुरुषांचे पुतळे हे सर्वांना सदैव प्रेरणा देत असतात. तेव्हा यातून आपण राष्ट्रनायकांच्या विचारांचं अनुसरण करून आपली प्रगती साधावी. त्याबरोबरच उपेक्षित, वंचित पिचलेल्या बहुजन समाजाच्या उन्नतीची कास धरावी. यावेळी माजी नगराध्यक्ष अरुण आळणे, ऍड. खुशाल शेंडे ( पांढरकवडा ), किरणताई गिऱ्हे, पीरिपचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, सुकुमार पेटकुले ( आदिलाबाद ) यांनी मनोगत व्यक्त केले. आकांक्षा आळणे हिने ' साऊ' कविता सादर केली. कार्यक्रमास पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गोकुळ भवरे, दुर्गादास राठोड, राजरत्न गायकवाड, आनंद भालेराव, उत्तम कानिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय गुरनुले, राजू पेटकुले, तुळशीराम वाडगुरे, राहूल यादव, सुनील खामकर, संदीप पेटुकले, सूर्यकांता कोटरंगे, सोनाली पेटकुले, कल्पना गुरनुले, शषांक वाढई आदिंनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment