किनवट :
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या निर्देशानूसार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्या द्वारा घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2019-20 अंतर्गत जिल्हास्तरावर जि.प.प्रा.शाळा रोहिदासतांडा केंद्र कमठाला ता.किनवट येथील राज्यपुरस्कारप्राप्त शिक्षिका शालिनी सेलूकर यांना द्वितीय मानांकन मिळाले. किनवट सारख्या आदिवासी दुर्गम क्षेत्रात कार्य करताना त्यांनी हे यश मिळवल्यामूळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
त्यांना मिळालेल्या यशाबद्दल तालूक्याचे गटशिक्षणाधिकारी सुभाष पवने ,मारेगाव बीटचे प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी तथा कमठाला केंद्राचे केंद्रप्रमुख शिवाजी खुडे आणि केंद्रातील सहकारी शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सदरील स्पर्धेत त्यांनी " विविध शैक्षणिक अॅप आणि कृतीयुक्त शिक्षणपद्धतीचा अवलंब करून परिसर अभ्यास विषयातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे " या विषयावर आपला नवोपक्रम मागील सहा महिन्याच्या काळात शाळेत राबविला. या उपक्रमांतर्गत त्यांनी वेगवेगळे शैक्षणिक अॅप व खेळकृतींचा नाविण्यपूर्ण पद्धतींने परिसर अभ्यास विषयातील कठिण संबोध समजण्यासाठी वापर केला. नकाशाकृती, इतिहासातील प्रसंगांचे चित्ररेखाटन ,स्मरणशक्ती व सामान्यज्ञान वर्धक खेळ,जिल्हे ,राज्ये व जगातील देशांची सरावाद्वारे नावे तसेच जमिनीवरील नकाशात स्थाननिश्चिती करणे, समजपूर्वक क्षेत्रभेट अशा विविध पद्धतींचा वापर शाळेतील विद्यार्थ्यांची परिसर अभ्यास या विषयातील गुणवत्ता वाढविण्यासाठी केला.
उपक्रमाच्या यशस्वीतेची पडताळणी डायट नांदेड येथील अधिव्याख्याते देशमुख, धुमाळे आणि नरवाडे यांच्या पथकाने शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन केली. या पडताळणीदरम्यान सदरील उपक्रम शाळेत राबविल्यामूळे परिसर अभ्यास विषयातील विद्यार्थ्यांचे चांगल्या प्रकारे संबोध स्पष्टीकण होऊन त्यातून गुणवत्ता वाढल्याचे दिसून आले.या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहिदासतांडा शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत शेरे यांनी सहकार्य केले.





No comments:
Post a Comment