पोलिसाची पत्नी -सुप्रिया सुधीर तरटे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, March 25, 2020

पोलिसाची पत्नी -सुप्रिया सुधीर तरटे


                सकाळी 6 वाजता पब्लिक कर्फ्यु  बंदोबस्त साठी निघालेला नवरा रात्री 12.30 वाजता दमून घरी आला. तर बायकोने थाळी वाजवून स्वागत केले. तर म्हणाला, 'अगं लोक झोपलीत नको वाजवू '. ती थोडीशी हिरमुसली पण परत विचार केला. 'उठली लोकं तर उठली. आज माझ्या  माणसासाठी मी वाजवणार '. आणि तिने तसं केलही. नवरा आतून कुठे तरी सुखावला असणार. आत आल्यावर बायको आणि मुलाला डोळे भरून पाहत म्हणाला, 'अगं डब्यात चपाती शिल्लक आहे. तिने सकाळी थोडा जास्तीचा डबा दिला होता. आज सर्व बंद होते ना, मग कोणी सहकाऱ्यांनी डबा नसेल आणला तर त्याची सोय.
                तो अंघोळी ला गेला. तोवर हिने गरम भजी तळायला घेतली. रात्री एक वाजता. होय एकला ! काय भूक राहिली असेल बिचाऱ्याला ? तसा आतून त्याने आवाज दिला, 'अगं काय करतेस आता मला भूक नाही जास्त, काही करू नकोस. मला वरण भात दे फक्त '. तिच्या जीवाची घालमेल झाली. दिवसभर टीव्हीवर बातम्या पाहून हिचा जीव आधीच घाबरा झाला होता. त्याच्या काळजीने, पण चेहऱ्यावर काही दाखविले नाही. दोन घास कसे बसे खावून तो झोपला. सकाळी लवकर जायचे सांगून. पण हिची झोप पळून गेली.
                आता पर्यंत तिने सर्व बंदोबस्त पाहिले होते. पण आज तिला कधी नव्हे ती इतकी भीती वाटली. कदाचित 26/11 नंतर पहिल्यांदा. किती विचार आले मनात तिच्या ? काय बदल झाला 26/11 नंतर सुद्धा परिस्थिती आहे तशीच आहे. आजही त्याच्याकडे काठीच आहे. दहशत वाद्यांच्या मशीनगणला उत्तर द्यायला. आता कोरोनाला लढा देण्यासाठी ना पुरेसे मास्क आहेत ना सैनिटायझर्स !
                 तसूभरही बदल नाही झाला. चार दिवस टीव्ही वाहिन्यांनी तथाकथित तज्ज्ञांनी आरडाओरडा केला. लोकांनी कँडल मार्च काढला. चार दिवस दुखवटा पाळला. पाचव्या दिवशी जैसे थे. नंतर साधे कोणी विचारायलाही आले नाही पोलिसांची परिस्थिती. मग त्यांचे कुटुंबाची विचारपूस लांबची गोष्ट. तिला बाहेर जावून ओरडून सांगावे वाटले जनतेला आणि सरकारला आम्हीही माणसे आहोत. आम्हालाही भावना आहेत. आम्हालाही भीती वाटते तुमच्या सारखी. आमचे माणूस गमावण्याची. या विचारात डोळ्यातून अश्रु आले. कधी आले हे तिलाही नाही समजले.
वाटले उठवावे त्याला आणि सांगावे द्या सोडून ही नोकरी.
             पण लगेच तिने सावरले स्वतःला. तिला जवानांची पत्नी दिसली समोर. काय होत असेल तीचं बॉर्डर वर नवरा असताना ? एकटीने सर्व सांभाळतांना. आपला नवरा रोज उशिरा का होईना घरी येतो. पण त्यांचं काय ?
आणि तिला स्वत:ला अभिमान वाटला पोलिस पत्नी असल्याचा.

-सुप्रिया सुधीर तरटे
( पोलिस पत्नी ),
 चारकोप, कांदिवली,
मुंबई

प्रत्येकांनी आपापली जिम्मेदारी पार पाडावी. पोलीस, डॉक्टर व सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी कार्य करत आहेत. त्यांना घरी बसून बाहेर न निघता मदत करावी. कारण ते आपल्यासाठी व आपल्या परिवारासाठी कार्य करत आहेत म्हणून आपलं पण कर्तव्य बनते कि त्यांना पूर्ण पणे सहकार्य द्यावे. 
-संपादक

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News