किनवट : तालुक्यातील कोठारी (चि) येथे शाळा सुरू करण्यास शासनाची परवानगी असतांना स्थलांतराची परवानगी न घेता गोकुंदा येथे अनाधिकृतपणे सुरू असलेल्या शांतीनिकेतन पब्लिक स्कूल या शाळेवर कार्यवाही करावी अशा तक्रारी प्राप्त झाल्याने पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश या शाळेत घेऊ नये असे जाहीर प्रगटन शाळेच्या प्रवेश द्वारावर लावले आहे. गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांच्या आदेशान्वये क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. तसेच तीन दिवसाच्या आत कोठारी (चि) येथे शाळा न सुरू केल्यास युडायस क्रमांक निलंबीत करण्याचे पत्रही बजावले आहे.
रयत प्रतिष्ठान गवंडगाव तांडा ता. देगलूर या संस्थेस तालुक्यातील मौजे कोठारी (चिखली) येथे शांतीनिकेतन पब्लिक स्कूल या नावे इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा सुरू करण्यास शासनाच्या वतीने परवानगी देण्यात आली होती. परंतु संस्थेने मौजे कोठारी (चिखली ) ऐवजी मौजे गोकुंदा येथे ही शाळा सुरू केली आहे. शासनाकडून स्थलांतराची परवानगी न घेता अनधिकृतपणे मौजे गोकुंदा ता. किनवट येथे ही शाळा सुरू असल्याने संस्थालक व शाळेच्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करावी आणि शाळेची मान्यवा रद्द करावी अशी तक्रार युवासेना किनवट- माहूर विधानसभा प्रमुख दयाभाऊ पाटील यांनी गट शिक्षणाधिकारी कार्यालय , पंचायत समिती , किनवट यांना दिली . त्यावरून गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांनी जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षणाधिकारी (प्रा) वंदना फुटाणे यांच्या मार्गदर्शनाखाली या अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये असे जाहीर प्रगटन शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्याची कार्यवाही केली आहे.
परिक्षेत्र : किनवट -1 व किनवट - 2 चे विस्तार अधिकारी (शिक्षण) आणि केंद्र : शनिवारपेठ व गोकुंदा चे केंद्र प्रमुख यांनी शाळेच्या प्रवेश द्वारावर जाहीर प्रगटन लावले. यावर असे नमूद केले की ,
"शांतीनिकेतन पब्लिक स्कूल , कोठारी (चि) [ स्कूल कोड क्र. 27151508103] या शाळेस कोठारी (चि) ता. किनवट जि. नांदेड येथे शाळा सुरू करण्याची शासन मान्यता आहे. परंतु स्थलांतराची परवानगी न घेता सध्या गोकुंदा येथे अनाधिकृतरित्या ही शाळा सुरू आहे. तेव्हा पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश गोकुंदा या ठिकाणी या शाळेत घेऊ नये "
तीन दिवसाच्या आत सदर शाळा कोठारी (चिखली) येथे शासनमान्यते प्रमाणे चालू करावी अन्यथा शाळेचा यूडायस क्रमांक निलंबीत करून बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये योग्य ती कार्यवाही प्रस्तावीत करण्यात येईल असे पत्र मुख्याध्यापकांस दिले आहे.




No comments:
Post a Comment