किनवट ( नांदेड ) : येथून जवळच असलेल्या खेरडा-मलकापूर येथील रहिवाशी तथा जिल्हा परिषद नांदेडचे माजी समाजकल्याण सभापती दत्तरामजी गेडाम-देशमुख ( वय 69) यांचे शुक्रवारी ( दिनांक 17/04/2020 ) पहाटे 3:30 वाजता त्यांच्या राहत्या घरी खेरडा येथे निधन झाले. त्यांचे पश्चात एक मुलगा व दोन मुली असा परिवार असून मा.सरपंच ऍड. प्रकाश गेडाम यांचे ते वडील होत.
त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी ( दि. 17 ) दुपारी 12 वाजता त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राजे देशमुखांना शब्दांजली
आम्ही 1987-88 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 11 वी ' विज्ञान ' साठी सायंन्स कॉलेज, नांदेड येथे प्रवेश घेतला होता. त्यावेळी भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळण्यासाठी करावयाच्या अर्जावर शिफारस घ्यावी लागायची. ती शिफारस देणाऱ्यांमध्ये समाजकल्याण सभापती यांचाही समावेश होता. तेव्हा माझा वर्गमित्र पंढरीनाथ भवरे यांचे समवेत आम्ही जिल्हा परिषद इमारत गाठली. सभापती महोदय क्वार्टरला असल्याचं समजलं. आम्ही तिथे गेलो. आम्हाला त्यांनी प्रेमाणं आत बोलावलं. घरी बसवलं. चहापाणी, अल्पोपहार दिला. चांगलं मार्गदर्शन केलं. विविध शासकीय योजनांची माहिती दिली. शिष्यवृत्ती अर्जावर शिफारस लिहून सही शिक्का दिला. आणखी कुणाचे अर्ज असतील तर बिनधास्त माझ्याकडे आणा असे सांगितले.
आम्ही नंतर यशवंत, पिपल्स व इतर महाविद्यालयात शिकणाऱ्या किनवट तालुक्यातील 25- 30 विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज एकत्र जमा केले. 15-20 दिवसानंतर त्यांच्याकडे स्वाक्षरीसाठी गेलो. त्यावेळी त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला झालेल्या जखमेवर पट्टी बांधून दिसली. त्यांनी बसवलं. विचारपूस केली. कसे काय आलेत ? त्यांच्या अंगठ्याचं बँडेज पाहून आम्ही काहीच बोललो नाही. तेच म्हणाले, काही अर्ज आणले असतील तर द्या आम्ही सह्या करून देतो. आम्हाला उत्सुकता होती, सह्या कशा करतील ? त्यांनी पाच बोटात पेन धरली, जिलेबी कढईत टाकतात तशा प्रकारे त्या सर्व अर्जावर सह्या केल्या. त्यांच्या जागी दुसरं कोणी असते ; तर माझ्या अंगठ्याला जखम आहे मी सह्या करू शकणार नाही.
नांदेड ते गावापर्यंत त्यांच्या गाडीने अनेक वेळा आम्हाला त्यांनी त्यावेळी आणलं. विद्यार्थीदशेत आम्हाला ते फार अप्रुप होतं.
अत्यंत प्रेमळ स्वभावाचे, मित्तभाषी, परोपकारी वृत्तीचे दत्तरामजी गेडाम (देशमुख ) होते. त्यांचं सरळ, साधं जगणं होतं. सध्याच्या पुढाऱ्यात दिसणारा धुर्तपणा त्यांच्याकडे नव्हता. अन्यथा ते केव्हाच राजकीय क्षेत्रात एक -एक पाऊल पुढे गेले असते.
त्यांनी संत तुकडोजी महाराज शिक्षण संस्था स्थापन केली. त्यामार्फत खेरडा येथे आनुदानित आदिवासी आश्रम शाळा हे एक युनिट व गोकुंदा येथे एक वसतीगृह सध्या सुरू आहे. त्यांनी मनावर घेतलं असतं तर आदिवासी तालुक्यात शैक्षणिक जाळं ते उभं करू शकले असते. परंतु निरपेक्ष, निस्वार्थी व सदैवं समाजहितासाठी झटणारं राजे देशमुखांचं व्यक्तिमत्व आज निवर्तलं. त्यांच्या पावन समृतींना हीच शब्दांजली. विनम्र अभिवादन !
-उत्तम कानिंदे
-अभि.पंढरीनाथ भवरे




No comments:
Post a Comment