किनवट : राजगड तांडा ग्रामपंचायत कार्यालय दररोज बारा तास सुरू ठेवणारे ग्रामसेवक संतोष धोकटे सोबत स्थानिक कर्मचारी
किनवट :
तालुक्यातील डोंगर - दऱ्यातील अतिदुर्गम पाड्या - गुड्यापर्यंत कारोना प्रतिबंधात्मक उपययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पंचायत समिती अंतर्गत सर्व विभागाचे अधिकारी -कर्मचारी आपल्या जीवाचं रान करून सेवा देत आहेत. त्यामुळेच तर कोरोनाच्या प्रकोपापासून निश्चिंत राहून ग्रामस्थ आपापल्या घरात मोकळा श्वास घेत आहेत.
कोरोना ( कोव्हीड -१९ ) च्या प्रादुर्भावाने संपूर्ण जग हादरलेलं आहे. यानुषंगाने केंद्र व राज्य शासनाचे निर्णय व प्रशासकीय आदेश वेळोवेळी येत आहेत. याचे तंतोतंत पालन करून गटविकास अधिकारी सुभाष धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती अंतर्गत पंचायत, शिक्षण, आरोग्य, बालविकास प्रकल्प या सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी ग्रामस्तरावर करीत आहेत.
ग्रामनायकांचं जीवतोड कार्य
कोणत्याही शासकीय विकासाच्या योजना ग्रामीण भागात पोहचविणारा ग्रामसेवक हा महत्वपूर्ण घटक आहे. म्हणूनच ते "ग्रामनायक" आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार तलाठी व कृषी सहायकाप्रमाणे त्यांच्यावर ते कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत गावचे नोडल / पालक अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविली आहे. शिक्षक, आरोग्य सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व पोलिस पाटील यांचेशी समन्वय ठेऊन कर्तव्य पार पाडायचे आहे. त्यांनी तालुक्यातील १३४ ग्रामपंचायती अंतर्गत १९१ गाव, तांडे, गुडे पैकी ८५ टक्केगावांमध्ये सोडीयम हायपोक्लोराईटचे द्रावण फवारणी,नाल्या साफसफाई व फॉगींग मशीनने धूर फवारणी केली आहे.
किनवट : निचपूर ग्रामपंचायत अंतर्गत फॉगींग मशीनने फवारणी करतांना कर्मचारी
कोरोना संशयितांच्या शोधासाठी घरोघरी
कोरोना संशयितांच्या शोधासाठी घरोघरी भेटी देण्याची जीव जोखीम जबाबदारी हे ग्रामनायक पार पाडत आहेत. परदेश वा संक्रमित परगावाहून आलेल्यांची दखल घेणे त्यांच्या हातावर 'होमकोरोंटाईन' चा शिक्कामारणे. होमकोरोंटाईन व्यक्ती घराबाहेर पडत नसल्याची व त्यांची दररोज तपासणी होत असल्याची खात्री करणे, शिधापत्रिका व भोजन व्यवस्था नसलेल्या गरजू नागरिकांची यादी करणे शक्य झाल्यास दानशूरांमार्फत मदत पुरविणे, गुगलशीटवर माहिती भरणे, शिधा पत्रिकाधारकांना धान्य मिळत असल्याची खात्री करणे हेही कर्तव्य ते बजावताहेत. सहायक गटविकास अधिकारी राठोड व आरोग्य विस्तार अधिकारी विठ्ठल श्रिमनवार व पंचायत विस्तार अधिकारी कैलास रेनेवाड, सुशिल शिंदे, देविदास उडतेवार, साईनाथ चिंतावार आदिंच्या नेतृत्वात ते भरीव कार्य करीत आहेत.





No comments:
Post a Comment