नांदेड : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना करण्याबाबत नांदेड जिल्ह्यात शुक्रवार ( ता.22 मे 2020 ) पासून पुढील आदेशापर्यंत नियम, अटी व शर्तीच्या अधिन राहून प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेनमेंट झोन) वगळून उर्वरित क्षेत्रातील नमूद बाबींना सकाळी 9 ते सायं. 5 पर्यंत नियम व अटीच्या अधीन राहून जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशाद्वारे मुभा दिली आहे.
ता.17 मे 2020 च्या आदेशान्वये जिल्हादंडाधिकारी यांनी नांदेड जिल्हयात जमावबंदी आदेश, नियमावलीसह 17 ते 31 मे 2020 पर्यंत नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात संदर्भात नमूद या कार्यालयाचे समक्रमांकीत आदेश व शुध्दीपत्रकानुसार निर्गत आदेशातील अटी व शर्ती जशास तसे पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार नांदेड जिल्ह्यात प्रतिबंधीत क्षेत्र वगळून पुढील प्रमाणे मार्गदर्शक सुचना व आदेश निर्गमित केले आहेत. नांदेड जिल्ह्यात पुढील बाबी प्रतिबंधित राहतील. सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था व शिकवणी वर्ग इ. बंद राहतील.
तथापि ऑनलाईन / आंतर शिक्षण यास मुभा राहील. हॉटेल / रेस्टॉरंट आणि इतर हॉस्पिटॅलिटीच्या सेवा, गृहनिर्माण / आरोग्य / पोलीस / शासकिय अधिकारी / आरोग्य सेवा कर्मचारी / पर्यटकांसह अडकलेल्या व्यक्ती आणि विलगिकरण सुविधेसाठी वापरता येईल. तसेच उपरोक्त सेवेसाठीच बसस्टॉप, रेल्वेस्टेशन येथे चालू असलेल्या कॅन्टीनचा सुध्दा वापर करता येईल. रेस्टॉरंटला खाद्य पदार्थाच्या होम डिलेव्हरीसाठी स्वयंपाकघर वापरण्यास मुभा असेल.
सर्व सिनेमा हॉल, शॉपींग मॉल, व्यायामशाळा व जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार आणि सभागृह, असेंब्ली हॉल व इतर तत्सम ठिकाणे बंद राहतील. सर्व सामाजिक / राजकीय / खेळ / करमणूक / शैक्षणिक / सांस्कृतिक / धार्मिककार्ये / इतर मेळावे आणि मोठया धार्मिक सभा यास प्रतिबंध असेल. सर्व धार्मिक स्थळे / पुजेची ठिकाणे भाविकासाठी बंद ठेवण्यात येतील. तसेच धार्मिक कार्यक्रम, परिषदा इत्यादीवर बंदी राहील. नांदेड जिल्हयातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील. नांदेड जिल्हयातील सर्व ढाबे, तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाची दुकाने, चहा-कॉफी सेंटर, पानठेला व शितपेयाची दुकाने बंद राहतील.
नांदेड जिल्हयातील टाळेबंदीच्या कालावधीत सायं. 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागु राहील. कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये. मात्र यामधून अत्यावश्यक सेवेकरिता नेमण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी व वैद्यकिय कारणास्तव रुग्ण व त्यांच्यासोबत असलेले नातेवाईक यांना मुभा राहील. सदर वेळेत विनाकारण फिरतांना आढळल्यास अशा व्यक्तींच्या विरोधात नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.
आरोग्य सेतुचा नियमित वापर करा
आरोग्य सेतुच्या वापरामुळे कोव्हिड 19 आजाराच्या प्रादुर्भावाबाबत त्वरीत सूचना मिळते व त्याचा फायदा व्यक्तीश: व समाजाला सुध्दा होतो. त्यामुळे Android Phone चा वापर करणा-या सर्व नागरिकांनी मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करावे. शासकिय कार्यालय व खाजगी ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना आपल्या व इतरांच्या सुरक्षितेकरिता आरोग्य सेतु ऍपचा वापर करणे बंधनकारक राहील. नांदेड जिल्हयातील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतु ऍप डाऊनलोड करुन त्याचा नियमित वापर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाचे वतीने करण्यात येत आहे.
जेष्ठ नागरिक, लहान मुलांनी घरीच रहावे
आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक वयोगट असणारे 65 वर्षाचे वरिल ज्येष्ठ नागरिक, अनेक व्याधी असणारे व्यक्ती, गरोदर माता, दहा वर्षाखालील मुले यांना टाळेबंदी (Lockdown) काळात अत्यावश्यक कामाचे / आरोग्याचे कारणाचे अपवाद वगळता घराबाहेर पडता येणार नाही. त्यांनी घरीच रहावे व प्रशासनास सहकार्य करावे.
नांदेड जिल्हा नॉन रेड झोनमध्ये असल्याने नांदेड जिल्हादंडाधिकारी यांनी समक्रमांकीत आदेश क्रमांक (1) व (2) नुसार दिलेल्या सवलती, मुभा व परवानग्या जशास तसे पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. तसेच त्याव्यतिरिक्त पुढील नमूद प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेनमेंट झोन) वगळून उर्वरित क्षेत्रातील बाबींना सकाळी 9 ते सायं. 5 पर्यंत नियम व अटीच्या अधीन राहून मुभा देण्यात आली आहे. क्रीडा कॉम्पलेक्स आणि स्टेडिअम आणि इतर सार्वजनिक खुली जागा वैयक्तीक व्यायामकरीता मोकळी राहील. परंतू या ठिकाणी प्रेक्षक आणि Group Activities करीता मुभा राहणार नाही. सर्व शारीरिक व्यायाम व त्यासंबंधीत इतर क्रिया शारिरीक अंतर राखुन करता येतील.
सर्व सार्वजनिक आणि खाजगी वाहतूकीस पुढीलप्रमाणे मुभा राहील
टु व्हिलर- 1 व्यक्ती,
थ्री व्हिलर 1+2 व्यक्ती,
फोर व्हिलर 1+2 व्यक्ती.
नांदेड जिल्ह्यांतर्गत बससेवा जास्तीतजास्त 50 टक्के क्षमतेनुसार सुरु करण्यास मुभा देण्यात येत आहे. परंतु शारिरीक अंतर व स्वच्छतेची उपाययोजना करणे आवश्यक राहील.
सर्व दुकाने, बाजारपेठ सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु नमूद दुकाने / बाजारपेठच्या ठिकाणी गर्दी वाढल्यास किंवा शारिरीक अंतराचे व वेळोवेळी निर्गत आदेशाचे पालन करण्यात येत नसल्याचे दिसून आल्यास दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही करुन दिलेली मुभा रद्द करण्यात येईल.
या बाबींपैकी प्रतिबंधीत क्षेत्रात (Containment Zone) मध्ये केवळ जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा तसेच अत्यावश्यक वैद्यकीय सेवांना मुभा राहील.
वरील दुकाने / आस्थापनाच्या ठिकाणी पुढील उपाययोजना बंधनकारक असतील.
Ø कामाच्या ठिकाणी / दुकानात प्रवेशापुर्वी हॅन्डवॉश, सॅनिटायझरचा वापर करणे.
Ø एका वेळेस दुकानात 5 पेक्षा जास्त ग्राहकास प्रवेश राहणार नाही.
Ø दुकानातील कर्मचारी व ग्राहक यांच्या चेहऱ्यावर मास्क असणे व शारिरीक अंतराचे पालन करणे अन्यथा 1 हजार रुपयांचा एवढा दंड संबंधितांकडून आकारण्यात येईल.
Ø मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तू / ठिकाणांचे वेळोवेळी नियमीत र्निजंतूकीकरण करणे.
Ø ग्राहकांकडून खरेदीनंतर पैश्यांची देवाण-घेवाण आरबीआयच्या सुचनेनुसार ई-वॉलेटस व स्वाईप मशीनव्दारे करणेस भर द्यावा.
Ø वरील नेमून दिलेल्या वेळेनंतर दुकान चालू ठेवल्यास तसेच उपाययोजनेचे भंग केल्यास 5 हजार रुपये एवढा दंड संबंधित दुकानदारास आकारण्यात येईल.
परिशिष्ट-2
सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क परिधान करणे अनिवार्य आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1 हजार रुपये दंड आकारण्यात येईल.
सार्वजनिक कामाची ठिकाणे व सार्वजनिक वाहतूक याठिकाणी सामाजिक अंतराचे नियम पाळले जावेत.
लग्नसमारंभ निमित्ताने होणारे जमाव संबधाने सामाजिक अंतराचे नियम पाळावे व अशा ठिकाणी 50 पेक्षाजास्त आमंत्रित असु नयेत. तसेच लग्न सकाळी 7 ते सायंकाळी 5 या कालावधीतच पार पाडणे आवश्यक असेल.
अंत्यविधीमध्ये सामाजिक अंतराचे नियम पाळले जावेत व 50 पेक्षा जास्त लोकांचा सहभाग असु नये.
दारु, पान, गुटखा, तंबाखू इत्यादीचे सार्वजनिक ठिकाणी सेवन निषिद्ध आहे अन्यथा कायदेशिर कारवाई करण्यात येईल.
सर्व दुकाने ही दोन ग्राहकांमध्ये सहा फूट अंतर या नियमांनुसार व एका वेळेस 5 पेक्षा जास्त लोक जमा होणार नाहीत अशा प्रकारे चालु राहतील.
कामाचे ठिकाणी अवलंबवायच्या अतिरिक्त मार्गदर्शक सुचना
थर्मल स्क्रीनींग हॅंडवाश सॅनिटायजर्स हे कामाचे ठिकाणी प्रवेश व निर्गमन मार्गावर तसेच सामान्य ठिकाणी उपलब्ध करुन द्यावे.
कामाचे संपूर्ण क्षेत्र वारंवार मानवी संपर्कात येणारी ठिकाणे उदा. दरवाज्याचे कडी, कोंडी इ. चे निर्जंतुकीकरन वारंवार तसेच शिफ्ट दरम्यान करावे.
सर्व प्रभारी अधिकारी व संबंधितांनी कामाचे ठिकाणी कामगारांमध्ये पुरेशा प्रमाणात अंतर ठेवून सामाजिक अंतर राखले जावे. तसेच शिफ्ट दरम्यान अंतर ठेवावे व जेवणाच्या वेळा नियंत्रित कराव्यात.
या आदेशाचे तंतोतंत पालन होते किंवा नाही या बाबी तपासून आवश्यक कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यास पुढील यंत्रणेस प्राधिकृत करण्यात आले आहे.
Ø महानगरपालिका हद्दीत :- महानगरपालिका व पोलीस विभाग यांनी संयुक्त पथके गठीत करावीत
Ø नगरपालिका हद्दीत
:- नगरपालिका व पोलीस विभाग यांनी संयुक्त पथके गठीत करावीत
Ø गावपातळीवर
:- ग्रामपंचायत व पोलीस विभागाचे संयुक्त पथक गठीत करावे.
याप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणेने पर्यवेक्षणासाठी गठीत केलेले पथकाचे आदेश संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा (Incident Commander) यांच्याकडे सादर करावीत. संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा (Incident Commander) यांची वरीलप्रमाणे आदेशाची अंमलबजावणीच्या अनुषंगाने संनियंत्रणाची जबाबदारी असेल.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल.
सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यावश्यक साधने व सुविधा यांची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या विरुध्द कठोर कारवाई करावी. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांच्यावर विरुध्द कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही. हे आदेश नांदेडचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 21 मे 2020 रोजी निर्गमित केले आहेत.




No comments:
Post a Comment