दिल्लीच्या सम्यक प्रकाशनचे प्रमुख तथा देशातील आंबेडकरी चळवळीतील एक अग्रगण्य नाव, बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक शांती स्वरूप बौद्ध यांचे आज कोरोना या महाभयंकर आजारांमुळे वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले आहे,अशी माहिती मिळाली. त्यांच्या निधनामुळे देशातील आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे. सम्यक प्रकाशनाच्या माध्यमातून देशभरातील महान अशा लेखकांची हजारो पुस्तके त्यांनी हिंदी, इंग्रजी या भाषेतून प्रकाशित केली होती.विशेषत: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आगळीवेगळी विविध प्रकारची छायाचित्रे सुद्धा त्यांनी प्रकाशित केली. डायऱ्या, कॅलेंडर बॅचेस असे वेगवेगळे प्रयोग प्रकाशनाच्या माध्यमातून त्यांनी केले.महाराष्ट्रामध्ये ते सातत्याने येत असत. माझे आणि त्यांचे तर एकदम सलोख्याचे संबंध होते. पुण्यामध्ये अनेकदा त्यांना कार्यक्रमाला मी निमंत्रित केले होते. विशेषत: त्यांनी धम्मपद हे हिंदी भाषेतील सगळ्यात मोठा म्हणजे भव्यदिव्य जवळपास 5 हजार पानांचा रंगीत ग्रंथ सचित्र प्रकाशित केला होता. त्याच्या जवळपास पन्नास प्रती मी स्वतः महाराष्ट्रामध्ये विकून त्यांना पैसे पाठवले. आमचे मित्र दिगंबर टोम्पे साहेब यांचे Grapple हे इंग्रजी मधून पुस्तक सुद्धा सम्यक प्रकाशन यांनी प्रकाशित केले होते. त्यावेळी सुद्धा प्रकाशनाला ते पुण्यात आले होते. पंधरा दिवसांपूर्वीच माझे आणि त्यांचे मोबाईलवर संभाषण झाले. असे अचानक त्यांचे जाणे हे आंबेडकरी चळवळीसाठी खूप हानीकारक आहे. त्यांच्या जाण्यावर विश्वासच बसत नाही.त्यांच्याकडे प्रचंड आत्मविश्वास, त्याचबरोबर उत्साह आणि बाबासाहेबांच्या चळवळीसाची प्रेरणा प्रचंड होती. विशेषत त्यांचे शांतीस्वरूप हे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवले होते. दिल्लीमध्ये धम्माच्या संदर्भात व आंबेडकरी चळवळीच्या संदर्भात त्यांनी अनेक इवेंट करून आंबेडकरी समुदायाला या चळवळीमध्ये सहभागी करुन घेण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता.एका सच्च्या आंबेडकरवाद्यास हा समाज मुकला आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
-डॉ.बबन जोगदंड,
यशदा, पुणे
No comments:
Post a Comment