दत्ता भगत नावाची जातककथा
-प्रा.डॉ. मनोज मुनेश्वर
मराठी साहित्याचे व्यासंगी अभ्यासक, समीक्षक आणि नाटककार प्रा. दत्ता भगत यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त (७५ वा वाढदिवस ) प्रा.डॉ. मनोज मुनेश्वर यांचा शब्दप्रपंच -संपादक
दलित रंगभूमीला सशक्त, आशयसंपन्न, प्रयोगसंपन्न करणाऱ्या दत्ता भगत यांचा मराठी साहित्य आणि समीक्षेमध्ये मोठा धाक राहिलेला आहे. त्यांच्या दर्जेदार
आणि सशक्त लेखनाने एकून मराठी वाङ्मयाची उंची वाढवली आहे.नांदेड येथे झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला त्यानंतर त्यांना प्रचंड लोकप्रियता लाभली.
निळी वाटचाल ,दलित साहित्य दिशा आणि दिशांतर, आधुनिक मराठी वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी, पिंपळपानाची सळसळ, समकालीन साहित्य आणि साहित्यिक, साहित्य समजून घेतांना,ही समीक्षात्मक व वाटा-पळवाटा, अश्मक, खेळीया ही दत्ता भगत यांची गाजलेली नाटके
आहेत. आवर्त आणि इतर एकांकिका, जहाज फुटलं आहे आणि इतर एकाकिंका,
संपादनामध्ये कृष्णाजी अनंत सभासदकृत श्री शिव छत्रपतीचे चरित्र, साहित्य संस्कृती आणि समाजप्रबोधन, म. फुले लिखित तृतीयरत्न, इ. ग्रंथ प्रकशित आहेत.
केवळ दलित साहित्याचे भाष्यकार म्हणूनच नव्हे तर एकूण मराठी साहित्याचे व्यासंगी अभ्यासक आणि समीक्षक म्हणून दत्ता भगत यांच्या लेखनांची नोंद घ्यावी लागते. मराठीतच नव्हे तर अन्य भारतीय भाषिक समीक्षकांनी दत्ता भगत यांच्या वाङ्मयीन कार्याची नोंद घेतली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञानाचा दलित साहित्यावर काय परिणाम झाला?
दलित जाणिवेचे विशेष कोणते?
दलित साहित्य आणि दलित चळवळ यांचा परस्पर संबंध काय?
दलित साहित्यातील नकार, विद्रोहाच्या अभिव्यक्तीचे स्वरूप नेमके कसे आहे?
मूल्यमापन म्हणजे काय? आणि मूल्यमापनाचे निकष कोणते असावे?
या प्रश्नासंबधी दत्ता
भगत यांचे विवेचन मूलगामी स्वरूपाचे आहे.
उपयोजित व तात्विक अशा दोन्ही प्रकारचे समीक्षालेखन त्यांनी केलेले आहे. '
मागील सहा दशकामध्ये 'दलित साहित्य या शब्दाविषयी वेगवेगळी नामांतरे होत राहिली. दलित साहित्य, आंबेडकरी साहित्य, फूले-आंबेडकरी साहित्य, विद्रोही साहित्य, बौद्ध साहित्य, इहवादीं असे नामकरण झाले. इ. अनेक नावे दलित साहित्याच्या संदर्भांत वापरली गेली, परंतु आजही कुठल्याही एका नावावर एकवाक्यता झालेली नाही, मात्र नामांतरे झाली असली तरी सैदधांतिक भूमिकेत मतभेद नव्हते, आजही नाहीत.
आंबेडकरांनी दिलेले तत्वज्ञान हाच दलित साहित्याचा स्वभावधर्म आहे म्हणून महाराष्ट्रासह इतर राज्यामध्ये दलित साहित्य हेच नाव स्थिर झालेले आहे.भारतीय आणि जागतिक पातळीवर 'दलित साहित्य' हाच शब्द रुढ़ झाला असल्यामुळे दलित साहित्य हाच शब्दप्रयोग दत्ता भगत याना योग्य वाटतो. आपल्या भूमिकेची सविस्तर मांडणी त्यांनी आपल्या लेखनातून केलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा विचार आत्मसात केल्यामूळे समाजव्यवस्थेकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपल्यामध्ये विकासित झाला. "आंबेडकरी विचार आत्मसात केल्यामुळे प्राप्त होणाच्या जीवनविषयक दृष्टिकोणाआधारे स्वतःला आणि स्वतःभोवतींच्या वास्तवाला जाणून घेण्याच्या उत्कट इच्छाशक्तीचा शब्दरूप आविष्कार म्हणजे दलित साहित्य" अशी दत्ता भगत यांनी दलित साहित्याची व्याख्या केली, हा दृष्टिकोन कोणता? तर तो मानसामाणसात समानता माणतो.जात, धर्म, वंश इत्यादी घटकांमुळे मानसामानसांत निर्माण होणा-या भेदभावाना नकार देतो. कुणाला गुलामीत ठेवू नये असे माणतो. स्वातंत्र्याचा पुरस्कार हेच बांधीलकीचे तत्व मानतो आणि सर्व माणसे समान आहेत अशी भूमिका घेतो. "सारांश हा की, जीवनविषयक दृष्टिकोन मानवी जीवनात स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधूभाव या मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या आणि त्याच्या आड़ येणाऱ्या विषम व्यवस्थेला नकार देणारा असा दृष्टिकोन" असा दुष्टिकोन स्वीकारून जे लेखन केने जाते ते 'दलित साहित्य' अशी दत्ता भगत यांची धारणा आहे.
दत्ता भगत यांच्या वत्कृत्वाला एक उंची आहे, एक खास शैली आहे. तसी त्यांच्या
समीक्षेलेखनालाही एक खास शैली आहे. सिद्धांताचे प्रतिपादन करत असताना एक प्रगल्भ भाषा घड़वावी लागते, त्या भाषेला वैचारिक ढब आणि उंची असली पाहिजे ती दत्ता भगत यांच्याकड़े आहे. गंगाधर पानतावणे, यशवंत मनोहर, जनार्धन वाघमारे यांच्या वाङ्मयीन भूमिका आणि कार्याविषयी त्यांनी केलेले लेखन त्यात त्यांची ही शैली प्रकर्षाने जाणवते.
कलावादाच्या नावाखाली आकृतीवादाला आणि रूपबंधाला वाजवीपेक्षा अधिक महत्त्व दिले गेले अशा काळात दलित साहित्याला उपेक्षेने पाहिले गेले. त्यावेळी दलित साहित्याने आपले वेगळेपण सिद्ध करणे यालाच अग्रक्रम दिला. दलित साहित्याने परंपरेला जसा नकार दिला तसा साहित्यविषयक कसोट्या आणि निकषांनाही नकार दिला. तेव्हा मूल्यमापनाचा प्रश्न उभा राहिला. या पार्श्वभूमीवर काळानुरूप वाङ्मयाच्या मूल्यामापनाच्या कसोट्या बदलत असतात. बदलायला हव्यात अशी भूमिका गंगाधर पानतावणे, यशवंत मनोहर,राजा ढाले, केशव मेश्राम यांनी घेतलेली होती. परंतु कोणत्या कसोट्या असाव्या याबद्दल त्यांनी विश्लेषण केले नव्हते. विद्रोह, नकार, मानवता, विज्ञाननष्ठा, आत्मभान हा या मंडळींचा मूल्यमापनाच्या 'कसोट्या' असण्याचा संकेत होता. दत्ता भगत यांना या समीक्षकांचे विश्लेषन मान्य नव्हते. दत्ता भगत यांना हे घटक फक्त 'वेगळेपणा' दर्शवणारे घटक आहेत असे वाटत होते ,त्यांनी त्यांच्या लेखनातून ते साधार दाखवून दिले. यशवंत मनोहर सांदर्यशास्त्राची मांडणी करत होते. ते दत्ता भगत यांना'कल्पनाविलास' वाटत होता. विश्लेषणाऐवजी ऐवजी भारावलेपण त्यांची लेखनी प्रकट करते.
वा. ल. कुलकर्णी यांनी सार्वकालिकत्व आणि सार्वभौमत्व या कसोट्या असतात असे
सांगीतले त्यापेक्षा यशवंत मनोहर वेगळे काहीही सांगत नाहीत असे दत्ता भगत यांना वाटते. "एखादी कलाकृती चांगली वाइट ठरवताना आपण त्या लखनकृतीच्या बाहेर जाऊ शकत नाही. प्रत्येक लेखनकृतीत जीवनानुभव प्रकट होतो तो जीवनानृभव वाचकाला कशामुळे खरा वाटतो? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे साहित्याच्या कसोटया." दत्ता भगत यांनी कसोट्याचे विश्लेषण करताना काही घटक गृहीत धरलेले आहेत.
१) साहित्यातील अनुभव सलग आणि एकात्म असावा ते शक्य तेव्हाच आहे जेव्हा
लेखक जगण्याशी प्रामाणिक असतो.
२) हा प्रामाणिकपणा असेल तर कलाकृती आस्वाद्य ठरते. ती जेव्हा आस्वाद्य ठरते तेव्हा तिच्यात सार्वकालिकत्व आणि सार्वभौमत्वही असते. म्हणून सलगता, एकात्मकता,सार्वकालिकत्व आणि सार्वभौमत्व या कसोट्याच मूल्यमापनासाठी मानाव्यात असे दत्ता भगत यांना वाटते. समीक्षक तरतमभाव ठरवताना नवे मूल्य निर्माण करित नसतो त्याऐवजी जीवनानुभवाला प्रत्यक्ष जीवनात कोणते स्थान आहे याचा निर्देश करीत असतो. याचा विचार केला तर दलित साहितत्यच नव्हे तर कोणत्याही साहित्याच्या मृल्यमापनाच्या कसोट्या वेगळ्या नसतात. हाच दत्ता भगत यांच्या भूमिकेचे सार आहे.
आज सरांचा वाढदिवस.या वाढदिवसाचे औचित्य साधून केलेला हा शब्दप्रपंच.
सरांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
-प्रा.डॉ. मनोज मुनेश्वर
(दत्ता भगत सर यांचा मो. नं. 9881230084)



No comments:
Post a Comment