मर्दानी-झांसीची राणी लक्ष्मीबाई
-यशोधरा सोनेवाने, गोंदिया
18जून 1858ला कोटा येथील सराई नजीक ग्वालियर मधल्या फुलबाग येथे राणी लक्ष्मीबाईना वीरगती प्राप्त झाली. साहसी वीरांगना…रणरागिणी राणी लक्ष्मीबाई यांनी कायम मोठ्या हिमतीने शौर्याने आपल्या शत्रूला पराजित केलं. त्यांचा कार्याचा यशोधरा सोनेवाने, गोंदिया यांनी घेतलेला आढावा. -संपादक
ज्यांचा नावात शौर्य आणि विरता झळकते,पहिल्या स्वतंत्रातेची कमान जिच्या हाती असते अशी थोर
पराक्रमी वीरांगना…झाशीची राणी लक्ष्मीबाई होय.
आपल्या पवित्र अशा भारत भूमीत बरेच शूर पराक्रमी झुंजार योद्धे जन्माला आले, या शुरविरांमध्ये एक अशी राणी होऊन गेली जीने आपल्या साम्राज्याला इंग्रजांच्या हाती जाण्यापासून वाचवण्याकरता त्यांच्याशी कडवी झुंज दिली…झाशीला वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. राणी लक्ष्मीबाई 1857 च्या स्वातंत्र्य समरातील शूर वीरांगना…उत्तर मध्य भारतात असलेल्या झाशी या मराठा शासित राज्याची राणी.तिला मिळालेल्या अल्प आयुष्यात ब्रिटीश साम्राज्याशी लढा देत त्यांनी रणसंग्राम पुकारला होता. राणी लक्ष्मीबाईने आपल्या अद्वितीय साहस आणि पराक्रमाने केवळ इतिहास रचला असे नसून प्रत्येक स्त्रीच्या मनात साहस आणि उर्जेचा संचार घडवला .आपल्यातील पराक्रमाने कित्येक राजांना पराजित केलं. इतिहासाच्या पानांमध्ये आपली विजयगाथा सुवर्णाक्षरांनी कोरली.
राणी लक्ष्मीबाईचा जन्म 19 नोव्हेंबर 1835ला उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे भदैनी नगर इथं झाला. बालपणी त्यांना *मणिकर्णिका* आणि प्रेमानं *मनु* म्हंटलं जाई. त्यांचे वडील मोरोपंत तांबे बिठूर न्यायालयात पेशवा होते, लक्ष्मीबाईंचे वडील आधुनिक विचारसरणीचे होते मुलींना समाजात स्वातंत्र्य व शिक्षण मिळायला हवं यावर त्यांचा विश्वास होता. वडिलांच्या या विचारांचा लक्ष्मीबाईंवर फार प्रभाव होता.
माणिकर्णिका बालपणापासून दिसायला इतकी सुंदर होती की, कोणीही तिचं कौतुक केल्याशिवाय, तिच्याशी बोलल्याशिवाय राहू शकत नव्हते. तिचे वडील तिला कौतुकाने *छबीली* म्हणत असत. तिच्या आईच्या मृत्युनंतर मोरोपंत तिला बाजीराव पेशव्यांच्या बिठूरला घेऊन गेले.
बाजीराव पेशव्यांच्या मुलांसोबत
तिचं बालपण व्यतीत झालं.ते सगळे बहिण-भावांसारखे एकत्र राहिले. एकत्र खेळणं अभ्यास करणं, याशिवाय येथे धनुर्विद्येचे, आत्मरक्षेचे त्यांनी धडे गिरवले. त्या शस्त्रविद्येत पारंगत होत गेल्या आणि उत्तम घोडेस्वार देखील झाल्या.
लक्ष्मीबाईंच्या पराक्रमाचे किस्से बालपणापासून घडत होते. मोठमोठ्या आव्हानांना सुद्धा सहज पार पाडत असत. एकदा नानासाहेबांनी लक्ष्मीबाईंना आपल्यासोबत घोडेस्वारीचं आव्हान दिलं, लक्ष्मीबाईंनी हे आव्हान अगदी हसत हसत स्वीकारलं आणि नानासाहेबांनाच या स्पर्धेत हरवलं . लक्ष्मीबाईंची घोड्याला पळवण्याची प्रतिभा पाहून त्यांनी लक्ष्मीबाईंच कौतुक केलं आणि शाबासकी दिली. नानासाहेबांनी लक्ष्मीबाईंना तलवार चालवणे, भालाफेक, बंदुकीने निशाणा लावणे या गोष्टी शिकविल्या. कुस्ती ,मलखांब सारखे व्यायाम लक्ष्मीबाईंना आवडत असत.
वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी त्यांचा विवाह उत्तर भारतातील झाशीचे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला, आणि काशीची मनु झाशीची राणी लक्ष्मीबाई झाली. वैवाहिक जीवन सुखानं व्यतीत होत असतांना त्यांना 1851 साली पुत्ररत्न प्राप्त झालं. त्याचं नांव दामोदर राव असं ठेवण्यात आलं. परंतु हे बाळ अल्पायुषी ठरलं, 4 महिन्याचं असतांना या बाळाचा मृत्यू झाला. कुटुंबावर दुःखाची छाया पसरली. पुत्रवियोगामुळे गंगाधरराव आजारी राहू लागले, पती-पत्नींनी नातेवाईकांच्या मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. मुलाच्या दत्तक विधानाचा विधी ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला जेणेकरून पुढे या निर्णयावर त्यांचा विरोध नसावा. दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव पूर्वी आनंदराव असे होते जे पुढे बदलून गंगाधर राव असे ठेवण्यात आले.
सतत आजारी असल्याने अखेर महाराज गंगाधरराव नेवाळकरांचे निधन झाले. त्यावेळी लक्ष्मीबाई केवळ 18 वर्षांच्या होत्या. पुत्रावियोगामुळे दुःखात असलेल्या लक्ष्मीबाईंवर पती निधानामुळे जणू आभाळच कोसळलं. परंतु स्वतःला सावरत त्यांनी राज्यकारभाराची सूत्र हाती घेतली.दत्तक पुत्र दामोदर राव लहान असल्याने लक्ष्मीबाईंनी राज्यकारभार चालविण्याचा निर्णय घेतला.
राणी लक्ष्मीबाई शिवाजी महाराजांशी खुप प्रभावित होत्या. या अत्यंत धैर्यवान आणि साहसी होत्या. प्रत्येक निर्णय त्या फार समंजसपणे घेत असत. लक्ष्मीबाईंनी ज्यावेळी राज्यकारभाराची सूत्र आपल्या हाती घेतली त्यावेळी असं नियम होता की कोणत्याही राजाचा मृत्यू झाल्यास त्याचा स्वतःचा मुलगा उत्तराधिकारी होईल, परंतु जर पुत्र नसेल तर ते राज्य पूर्णतः ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात जाईल. या नियमामुळे लक्ष्मीबाईंना उत्तराधिकारी होण्यासाठी मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला.
झाशी ताब्यात घेण्याचा चंग ब्रिटिशांनी बांधलेला होता.पण लक्ष्मीबाईंनी ब्रिटिश साम्राज्याच्या आदेशाचे उल्लंघन करीत मोठ्या धैर्याने *“मै अपनी झांसी नही दुंगी”* असे ब्रिटीशांना कळवले आणि त्यांच्या विरोधात संघर्ष अधिक तीव्र केला.लक्ष्मीबाईंनी इतर राज्यांच्या मदतीने सेना तयार केली.या सेनेत लोकांनी मोठ्या उत्साहाने आपला सहभाग नोंदवला. या सैन्यात महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता. त्यांना युद्धाचे विशेष प्रशिक्षण दिल्या गेले. लक्ष्मीबाईंच्या या सैन्यात युद्ध कुशल आणि विद्वान असे गुलाम खान, दोस्त खान, खुदाबक्श, सुंदर-मुंदर, काशीबाई, मोतीबाई, लालाभाऊ बक्षी, दिवाण रघुनाथ सिंह, दिवाण जवाहर सिंह यांच्या समवेत चौदाशे सैनिक सहभागी होते.
बंदूकीच्या काडतुसामुळे ब्रिटीशांविरोधात संघर्षाने पेट घेतला. त्यामुळे ब्रिटीशांनी नाईलाजाने या प्रकरणाला दाबले आणि झाशीच्या लक्ष्मीबाईंना त्यांचे राज्य सुपूर्द केले. त्यानंतर 1857 साली शेजारच्या ओरछा आणि दतिया येथील राजांनी झाशीवर आक्रमण केलं, परंतु मोठ्या शौर्याने राणी लक्ष्मीबाईंनी आपल्या पराक्रमाचा परिचय देत विजय प्राप्त केला.झाशी मिळविण्याच्या हट्टाने पेटलेल्या ब्रिटीशांनी पुन्हा हल्ला केला परंतु या वेळी तात्या टोपेंच्या नेतृत्वात 20,000 सैनिकांनी त्यांच्याशी युद्ध पुकारले…हे युद्ध त्यावेळी जवळपास 2 आठवडे चालले. इंग्रजांनी किल्ल्याची भिंत तोडून कब्जा मिळवला, लुटमार सुरु केली. परंतु यावेळी देखील राणी लक्ष्मीबाईंनी संयमाने परिस्थिती हाताळून दामोदर रावाचा जीव वाचवला. 1858 साली ब्रिटीशांनी झाशी आपल्या ताब्यात घेतल्या नंतर तात्या टोपे यांनी लक्ष्मीबाईंना मदत केली. शिवाय तेथील पेशव्यांनी देखील राणीला आश्रय दिला आणि आपले सैन्य देखील तिच्या मदतीसाठी दिले.
राणी लक्ष्मीबाईंनी किंग्स रॉयल आयरिश विरोधात युद्ध पुकारले आणि पूर्व क्षेत्रातील ग्वालियर चे नेतृत्व केले. या युद्धात त्यांच्या महिला सेविकांनी देखील त्यांना चांगली साथ दिली. गेल्या युद्धात राणीचा घोडा ‘राजरतन‘ मारला गेल्याने या युद्धावेळी त्यांचा घोडा नवीन होता. या युद्धा दरम्यान राणी लक्ष्मीबाईंना हे आपले अखेरचे युद्ध असल्याची जाणीव झाली होती. प्राप्त परिस्थिती स्वीकारत त्या पराक्रमाने युद्ध करीत राहिल्या.या युद्धात राणी जबर जखमी झाली आणि घोड्यावरून खाली कोसळली. पुरुषी पोशाख परिधान केल्यानं इंग्रज लक्ष्मीबाईंना ओळखू शकले नाही आणि त्यांना युद्धभूमीवर सोडून चालले गेले. राणी लक्ष्मीबाईंचे सैनिक त्यांना गंगादास मठात घेऊन गेले आणि त्यांना गंगाजल पाजलं.
*“कोणताही इंग्रज मला माझ्या देहाला स्पर्श करणार नाही”* ही आपली अखेरची इच्छा त्यांनी व्यक्त केली. अश्या तऱ्हेने 18जून 1858ला कोटा येथील सराई नजीक ग्वालियर मधल्या फुलबाग येथे राणी लक्ष्मीबाईना वीरगती प्राप्त झाली. साहसी वीरांगना…रणरागिणी राणी लक्ष्मीबाई यांनी कायम मोठ्या हिमतीने शौर्याने आपल्या शत्रूला पराजित केलं.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. युद्ध लढतांना तिच्याजवळ कधी फार मोठे सैन्य नव्हते, मोठे राज्य नव्हते तरीदेखील स्वातंत्र्य संग्रामात आपल्या साहसाचा आणि पराक्रमाचा ज्या तऱ्हेने तिने परिचय दिला तो अत्यंत अभिमास्पद असाच आहे.तिच्या शौर्याचे कौतुक शत्रूंनी देखील केले. अशा झुंजार राणीमुळे भारताची मान कायम गर्वाने उंच राहणार आहे. राणी लक्ष्मीबाई प्रत्येक भारतीय स्त्रीसाठी प्रेरणास्त्रोत ठरल्या आहेत.आजही त्यांच्या साठी गर्वाने निघणारे उद्गार "खुब लडी मर्दानी वो तो झासीवाली रानी थी ।
-यशोधरा सोनेवाने, गोंदिया
(9420516306 )




No comments:
Post a Comment