किनवट : रेती तस्करांनी गस्तीवर असलेल्या पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात चार पोलीस जखमी झाले आहेत. यातील एका पोलिसाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी ता.19 रोजी दाभाडी (ता.किनवट) या गावात रात्री अकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिस नाईक गजानन रामदास चौधरी (वय 39) यांच्या फिर्यादीवरून आज शनिवारी (ता.20) किनवट पोलिस स्टेशनला दाभाडी येथील 17 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी सात आरोपींना पोलिसांनी अटक करून किनवट न्यायालयात हजर केले असता त्यांना सह दिवाणी न्यायाधीश जहांगीर पठाण यांनी २५ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. घटनेची माहिती मिळताच भोकर विभागाचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक विजय पवार यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
गुन्हा नोंदविण्यात आलेल्या आरोपींची नावे अशी: मनोहर दबडे, अविनाश दबडे, अमरनाथ दबडे, ज्ञानदेव जगदीश खांडेकर , विठ्ठल गणपत आमनर, दीपक सिकालकर, रुपेश चिकालवार, साईनाथ शामराव गजभारे, महादेव अंकुश पांढरे, बाबुराव प्रभू वाळेकर, अजय मनोहर दबडे, ज्ञानेश्वर लक्ष्मण शिंदे, किरणबाई मनोहर दबडे, कानुपात्रा अमरनाथ दबडे, प्रभा नामदेव दबडे व इतर दोन पुरुषांचा समावेश आहे.
चौधरी यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी व साक्षीदार असे वाळू चोरी प्रतिबंध करण्याकरिता लोकसेवक या नात्याने त्यांची शासकीय कर्तव्य बजावीत असताना शुक्रवारी ता.19 रोजी रात्रीच्या 11 च्या सुमारास दाभाडी (ता. किनवट) फिर्यादी व साक्षीदार यांना त्यांच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने संगनमत करून जिल्हाधिकारी नांदेड यांच्या जमावबंदीचे व हत्यार बंदीचे आदेश लागू असताना त्याचे उल्लंघन करून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून सशस्त्र होऊन साक्षीदार पोहेका. राठोड यांचा जीव घेण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात लोखंडी फावडे मारुन त्यांना गंभीर जखमी केले तसेच फिर्यादी व सोबतचे कर्तव्यावरील पोलीस अधिकारी कर्मचारी यांना लाकडी दांड्याने, काठीने व दगड फेकून मारून जखमी केले व रस्ता अडवून अटकाव केला. साक्षीदार सुरेश कोलबुधे यांचा मोबाइल फोडून नऊ हजार रुपयांचे नुकसान केले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक मारोती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार कांबळे हे पुढील तपास करीत आहेत. या घटनेतील सतरा आरोपींपैकी पोलिसांनी आज शनिवारी (ता.20) रोजी मनोहर दबडे, अविनाश दबडे, अमरनाथ दबडे, ज्ञानदेव जगदीश खांडेकर, महादेव अंकुश पांढरे, अजय मनोहर दबडे व ज्ञानेश्वर लक्ष्मण शिंदे या सात आरोपींना अटक केली.त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम
307, 353, 332,333,341, 379, 427, 143,147,148, 188 आणि सहकलम 135
मुं.पो. अॅक्टद्वारे गुन्हा दाखल केला. पोलिसांवर हल्ला केलेली ही बाब गंभीर असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाई होईल, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सात आरोपींना किनवट न्यायालयात हजर केले असता त्यांना सह दिवाणी न्यायाधीश जहांगीर पठाण यांनी २५ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.





No comments:
Post a Comment