मुंबई : सेवानिवृत्त राज्य निवडणूक आयुक्त व माजी सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
श्रीमती नीला सत्यनारायण या एक कर्तव्यदक्ष अधिकारी, संवेदनशील लेखिका, धीरोदात्त माता व चिंतनशील व्यक्ती होत्या. शासकीय सेवेतील तसेच जीवनातील प्रत्येक भूमिका त्या सकारात्मकतेने समरसून जगल्या. त्यांच्या निधनामुळे आपण एक उत्कृष्ट अधिकारी व सामाजिक जाणीव असलेले व्यक्तित्व गमावले आहे. श्रीमती नीला सत्यनारायण यांच्या निधनाचे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य परमेश्वर त्यांच्या कुटुंबीयांना देवो ही प्रार्थना करतो असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
नीला सत्यनारायण यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्र्यांना दुःख
मुंबई : राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त, भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी नीला सत्यनारायण यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.
प्रशासकीय कारकिर्दीबरोबरच साहित्य-कला क्षेत्रातही कामगिरीची मोहोर उमटविणारे अनुभवी आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून नीला सत्यनारायण यांना महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल असे सांगून मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, मुंबईत मराठी कुटुंबात जन्मलेल्या नीला सत्यनारायण या महाराष्ट्रातील अनेक युवकांसमोर प्रशासकीय सेवेविषयीच्या प्रेरणास्थान होत्या. निवडणूक आयोगाला अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासारखी त्यांची इतरही अनेक कामे वैशिष्ट्यपूर्ण होती.
माजी IAS नीला सत्यनारायण यांच्या निधनाने संगीत व साहित्य क्षेत्राची हानी
राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे आज दुःखद निधन झाले, एक चांगल्या प्रशासक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्व पूर्ण निर्णय घेतले होते. सेवा निवृत्त झाल्या नंतर त्यांची राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त पदी निवड करण्यात आली होती. त्या खूप चांगल्या लेखिका, गीतकार, साहित्यकार होत्या. भरतनाट्यमशी त्यांचा खूप जवळचा संबंध होता. सुफी संगीत तसेच भरत नाट्यमचे अनेक कार्यक्रम त्यांनी आयोजित केले होते. मी पत्रकार, व्यावसायिक नाट्य, चित्रपट क्षेत्रातील असल्याने माझे त्यांच्याशी अनेकदा भेटी होत असे, एकदा त्यांनी सुफी संगीताच्या ऑडियो cd मला दिल्या होत्या. वरळी सेंटर मध्ये एकदा त्यांच्या कार्यक्रमानिमित्त झालेली भेट ही शेवटची ठरली. त्यांना संगीताची खूप आवड होती, त्यांच्या अचानक जाण्याने संगीत, साहित्यिक क्षेत्राची मोठी हानी झाली. वंचित बहुजन आघाडी तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
-सुरेश नंदिरे
राज्य प्रसिद्धी प्रमुख
वंचित बहुजन आघाडी
9867600300




No comments:
Post a Comment