नांदेड : जिल्हा परिषदेच्या दक्षिण बांधकाम विभागात मुखेडमध्ये कार्यरत असलेले बहुचर्चित शाखा अभियंता शेख फारुख पाशा यांना चक्क उत्तर बांधकाम विभागातील हदगाव तालुक्यात नियमबाह्यपणे अतिरिक्त पदभार देण्याचा केलेला 'प्रताप' उघडकीस आल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानंतरही 'तो' रद्द करण्याऐवजी जिल्हा परिषदेच्या बांधकाम हदगाव उपविभागाचे उपअभियंता व्हि.एल.कांबळे यांना हदगाव उपविभागात शाखा अभियंता,कनिष्ठ अभियंत्याची आवश्यकता आहे का ? तसेच, तक्रारीवरून दोन दिवसात अहवाल द्यावे असे फर्मान सोडून स्वत:च्याच नियमबाह्य कामास पाठीशी घालण्यासाठी 'वरातीमागून घोडे दामटविण्याचा...' प्रयत्न प्रभारी कार्यकारी अभियंता ए.डी.चौधरी यांनी स्वत:चे नांव टाळून केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शाखा अभियंता शेख फारुख पाशा हे जिल्हा परिषदेच्या दक्षिण बांधकाम विभागात मुखेड तालुक्यामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी 'काहींना' हाताशी धरून वरिष्ठांची दिशाभूल करित जिल्हा परिषदेच्या उत्तर बांधकाम विभागातील हदगाव तालुक्यात यापूर्वी अनेकदा नियमबाह्यपणे अतिरिक्त पदभार, प्रतिनियुक्ती करुन घेत अनेक विकास कामांत कांहीं 'निवडक' तथाकथित कंत्राटदार व पोट कंत्राटदारांच्या संगनमतातून गैरव्यवहार करुन चांगलाच 'हात' मारला असल्याची पुराव्यानिशी माहिती दिल्यानंतरही जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांना वेळोवेळी पाठीशी घालण्याचाच प्रयत्न केला होता. परंतु, बहुजन टायगर युवा फोर्सचे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार मारोतीराव भवरे यांनी प्रसंगी आंदोलनात्मक पावित्रा घेतल्यानंतर शाखा अभियंता शेख फारुख पाशा यांच्या कार्यकाळातील हदगाव तालुक्यात त्यांनी केलेल्या कामकाजाची चौकशी करणे जिल्हा परिषदेने टाळले होते. मात्र त्यांच्या वेळोवेळी केलेल्या नियमबाह्य अतिरिक्त पदभार, प्रतिनियुक्ती अनेकदा रद्द करण्यात आल्या होत्या.
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी शाखा अभियंता शेख फारुख पाशा यांच्याशी संबंधित अशाच 'एका' प्रकरणात विधानसभेत तारांकीत प्रश्न उपस्थित केल्याने शासनस्तरावरून ग्रामविकास विभागाचे अव्वर सचिव र. ई. गिरी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून सदर प्रकरणाची फेब्रुवारी महिन्यात माहिती मागवली होती पण केवळ कागदोपत्री सोपस्कारातच सदैव तत्पर (!) असलेल्या विद्यमान प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांनी त्यावेळी यासंबंधीची योग्यतेने परिपूर्ण माहिती देणे टाळल्यानेच पून्हा एकदा शाखा अभियंता शेख फारुख पाशा यांना हदगाव तालुक्यातील तामसा गटाचा नियमबाह्य अतिरिक्त पदभार देण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या उत्तर बांधकाम विभागातील सध्याचे प्रभारी कार्यकारी अभियंता ए.डी.चौधरी यांनी दि. २३ जून रोजी निर्गमित केला होता. महत्वाचे म्हणजे सदर आदेश देण्यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषदेच्या हदगाव बांधकाम उपविभागात शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता यांची खरेच गरज आहे का? याबाबतची कोणतीही शहानिशा केली नाही त्यामूळे हदगाव उपविभागाच्या प्रभारी उपअभियंत्यांनी त्यांचा आदेश शिरसावंद्य मानून तामसा गटाच्या कार्यरत शाखा अभियंत्याकडून सदर गटाचा कार्यभार / पदभार काढून घेत 'तो' नियमबाह्यपणे आलेल्या शाखा अभियंता शेख फारुख पाशा यांना अतिरिक्त पदभार म्हणून देण्याचे आदेश दि.२४ जून रोजी काढल्याने शाखा अभियंता शेख फारुख पाशा यांना दिलेला नियमबाह्य अतिरिक्त पदभार तात्काळ रद्द करण्यासह याबाबत दोषी असलेल्या जिल्हा परिषदेच्या उत्तर बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता ए.डी.चौधरी व सदर विभागातील प्रभारी अधिक्षक एस. के. पाठक यांच्याकडे असलेले नियमबाह्य अतिरिक्त पदभारही तात्काळ काढून घ्यावेत व सदरिल नियमबाह्य प्रकरणाचे सर्व अभिलेखे, दस्ताऐवज तात्काळ जप्तीसह या प्रकरणात उच्चस्तरिय चौकशी करून दोषींसह त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी यांना बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे यांनी प्रारंभी तोंडी दिल्यानंतरही त्यांनी दुर्लक्ष केल्याने पूनश्च पुराव्यानिशी लेखी स्वरूपात दि. ८ जूलै रोजी दिली. यावरही त्यांनी तात्काळ कोणतीही ठोस कारवाई केली नाही त्यामूळे अद्यापही सदर प्रकरण कागदावरच जैसे थे स्थितीत आहे.
विशेष म्हणजे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांनी प्रभारी कार्यकारी अभियंता चौधरी हे अनेकदा समक्ष उपस्थित असतांनाही या नियमबाह्य प्रकरणात जाब विचारणे दूरच स्वत: वा सामान्य प्रशासन विभागाकडूनही चौकशी करणे टाळून केवळ कागदोपत्री सोपस्कारात तत्परता दाखवली असल्याने तोच कित्ता गिरवत प्रभारी कार्यकारी अभियंता चौधरी यांनीही शाखा अभियंता शेख फारुख पाशा यांना दिलेला नियमबाह्य अतिरिक्त पदभार रद्द करण्याऐवजी जिल्हा परिषदेच्या बांधकाम हदगाव उपविभागाचे उपअभियंता व्हि.एल.कांबळे यांना भवरे यांच्या तक्रारीवरून हदगाव उपविभागात शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता यांची गरज आहे का ? तसेच, तक्रारी अनुषंगाने दोन दिवसात अहवाल द्यावे असे आदेश दि. १४ जूलै रोजी काढले असून पूर्वीच्या आदेशानुसार नियमबाह्य अतिरिक्त पदभार देण्याबाबत दुसरेच दिवशी आदेश काढलेल्या प्रभारी उप अभियंता कांबळे यांनी दोन दिवस उलटले असले तरिही 'या' आदेशाचे अनुपालन मात्र अद्याप सादर केले नसल्याचे समजते. एकंदरीत 'या' नियमबाह्य प्रकरणात जिल्हा परिषदेत केवळ कागदी घोडेच नाचविले जात असल्याने सदर प्रकरणी संबंधित विभागाच्या वरिष्ठांसह प्रसंगी सक्षम न्यायालयात दाद मागणार असल्याचे तक्रारकर्ते त्रिरत्नकुमार भवरे म्हणाले.




No comments:
Post a Comment