मरणाची भीती आणि मुर्दाड माणसं !
-प्रा. विकास कदम
श्री गुरू गोविंदसिंघजी पत्रकारिता महाविद्यालय,
नांदेड.
'लॉकडाऊन' च्या काळात मानसिकता पितामह भिष्मा सारखी मृत्युशय्येवर निपचित पडली आहे. विवेकाची जागा भयगंडाने काबीज केली आहे. अदृश्य 'कोरोना' सूक्ष्मातिसूक्ष्म असताना त्याचे विशालकाय प्रतिबिंब मनपटलाच्या छाताडावर उभे ठाकले आहे. काही देश वगळता जगभरातल्या बहुतांश देशात 'कोरोना'चे राक्षसी रूप पाहायला मिळत आहे. भारतात तर प्रशासनाच्या आकडेवारीचे दाखले देत प्रसारमाध्यमांनी 'कोरोना'चे गांभीर्य नको तेवढे उजागर केले आहे. 'कोरोना'ची खरीप पेरणी जीव ओतून होत असता 'माकडां'च्या हातातील सोशल मीडिया या आधुनिक तंत्रज्ञानाच्या हाताने 'कोरोना' शेतीची धडाकेबाज मशागत सुरू आहे.
जागतिक स्तरावरून झालेला 'कोरोना'चा प्रवास आणि प्रसार आता प्रकाशाच्या वेगाने आपल्या सभोवार झाला आहे. उठता-बसता, झोपता-जागता, हाच एकमेव विषय पाजळला जात आहे. शासन-प्रशासनाकडून प्रबोधन, मार्गदर्शन आणि घ्यावयाची खबरदारी यावर भर दिला जात आहे. शिवाय त्या-त्या पातळीवर प्रशासन, पोलिस, आरोग्य यंत्रणा, सामाजिक संघटना या कामी अहोरात्र झटत आहेत. या यंत्रणेतील अनेक 'कोरोना' वारियर्सनी आपल्या जीवाचे बलिदान ही दिले आहे.
राजकीय मतमतांतराचा भाग जरी असला तरी देशात 'कोरोना'च्या शिरकावा संबंधी आरोपांच्या फैरी अजुनही झडत आहेत. त्या इतक्यात थांबणार नाहीत. नव्हे येत्या आगामी काही वर्षे धडधडत राहणार आहेत. कुणी तथाकथित भविष्यवेत्याने यासंबंधी भाकीत वर्तविण्याची गरज नाही. साधारणपणे मार्च-२०२० च्या तिसऱ्या आठवड्यापासून 'कोरोना- मार्च' सुरू झाला. त्यानंतरच्या चार महिन्यात या वादळाने इथल्या व्यवस्थेला मुळासकट उखडून फेकले आहे.
आपत्ती व्यवस्थापनाचे आपल्याकडे सुयोग्य व्यवस्थापनच नाही, ही बाब आता झाकून राहिलेली नाही, हे तेवढेच खरे. जागतिक पातळीवर मोठमोठाले देश हे व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरले तर आपली काय बिशाद, हेही खोटे नाही. सुसज्ज यंत्रणेच्या बाबतीत आपली 'कमजोरी' ही शाश्वत बाब आहे. पण त्यातूनही मार्ग काढण्यासाठी ज्या काही जमेच्या बाजू आपल्या ठायी आहेत, त्याचा वापर आपल्याला करता यायला हवा. या दृष्टीने आपण या काळात कोणती पाउले उचलली आणि आपला पुढचा पवित्रा काय असेल? यावर काहीतरी चिंतन व्हायला नको काय?
जणूकाही हिंस्र श्वापदांच्या अभयारण्यात आपण उभे आहोत, असे आज सामाजिक वातावरण निर्माण झाले आहे. 'चिंता... चिंता आणि चिंताच', या मानसिकतेने समाजमन पुरते घायाळ झाले आहे. ही चिंता घालवून भयमुक्त जीवन जगण्याची कला आत्मसात करण्याला आता प्राधान्य द्यावे लागणार आहे. "वाघ्या म्हणा वाघोबा म्हणा", तो तुमच्यावर चाल केल्याशिवाय राहणार नाहीच. पण अशा परिस्थितीचा मुकाबला हातपाय गाळून बसल्याने कसा शक्य होईल? सर्वार्थाने अंगात बळ आणून त्यावर तुटून पडण्याची मानसिकता, त्यासाठी निर्माण होणे जरुरी आहे. बचावात्मक सुरक्षा उपायांची हत्यारे परिधान करून या हिंस्त्र श्वापदाला आता स्वतः आपण नेस्तनाबूत करण्यास सिद्ध होणे आहे. याशिवाय दुसरा पर्याय सुद्धा नाही, हेही तितकेच खरे आहे.
समाजमनाच्या मानसिकतेने इतकी पराकोटीची न्यूनतम पातळी का गाठली? याचा विचार होणे गरजेचे आहे. राजकीय पातळीवर गेल्या चार महिन्यांत केंद्र आणि राज्य यांच्यात या देशामध्ये या विषयावर असलेली कमालीची मतभिन्नता लोकांना दुबळे करून गेली. जागतिक स्तरावर उडवलेल्या महामारीचे लोण देशभरात पोहोचले आहे. राजकीय प्रगल्भतेचे दर्शन जेव्हा घडताना दिसत नाही, तेव्हा अशा प्रकारे सामाजिक नैराश्य उफाळून येणे स्वाभाविक आहे. समाजमनाच्या भावनेला केंद्रस्थानी मानून स्वार्थांध राजकारणाला मूठमाती देण्याची दानत ठेवणे, अशा स्थितीत प्राधान्यक्रमाचे आहे, हे कोणीही मान्य करील.
देशातील मोठ्या संख्येने असलेल्या सर्वसामान्यांसाठी सध्याचा काळ खूपच भयावह ठरला आहे. हतबलता, दुःखद आणि वेदनादायी जीणे आज लोकांच्या वाट्याला आलेले आहे. ज्यांचे हातावर पोट आहे असा माणूस कुचंबणा, घुसमट घेऊन उपासपोटी चिल्यापिल्यांना पहात -पहात पुरता कोसळला आहे. त्याच्या मनात भयगंड निर्माण झाला आहे. आधीच जगण्याच्या भयाने पछाडलेल्या माणसाला भेडसावणारी एक सुप्त यंत्रणा तर सक्रिय झाली नाही ना? याचा शोध घेणे आता निकडीचे होऊन बसले आहे.
'कोरोना' च्या अनुषंगाने उपलब्ध उपचारपद्धतीच 'अभिमन्यू' सारखी संशयाच्या भोवऱ्यात अडकली, हे सध्याचे वास्तव आहे. डब्ल्यू. एच. ओ. पासून ते सर्व आरोग्य तज्ञ यामध्ये उपचारा संबंधीची मतभिन्नता ही समाजाच्या चिंतेत भर घालीत आहे. ठोस उपचार पद्धती जगात अद्यापही उपलब्ध नाही, असे असताना रुग्ण बरे ही होत आहेत. त्यांचा गाजावाजा ही सुरु आहे. शिवाय 'कोरोना' बळींची संख्याही भरमसाठ वाढत असल्याचे रोजचे आकडे सांगत आहेत. मग खरे नेमके काय ? आणि लोकांनी कसे वागावे? कसे जगावे? या प्रश्नाचे कोडे मात्र कायमच राहते.
आज "कोविड" रुग्ण म्हणजे एक राक्षस किंवा कुख्यात गुन्हा केलेली व्यक्ती, ही सामाजिक मनोभूमिका पहावयास मिळत आहे. घरातला माणूस मृत झाल्यास त्याचे तोंड पाहायला मिळत नाही. इतकेच काय तर घरच्यांनी पाहण्याचा वा त्याच्यावर अंत्यसंस्काराचा विचारही मनात आणता कामा नये, असा कळत नकळतच पायंडा पडला आहे. त्याची अनेक कारणे आहेत, त्याच्या खोलात जाण्याची काही गरज नाही ती कारणे साऱ्यांनाच उजागर आहेत.
रुग्णालयांमध्ये आरोग्य यंत्रणा 'कोरोना' रुग्णांची सुश्रुषा करण्यास अहोरात्र झटत आहे, असे दिसून येते. माध्यमांतून ते सातत्याने ऐकायलाही मिळत आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हेळसांड सुरू असल्याच्याही अनेक तक्रारी आहेत. या दोन्ही बाबींचा विचार करू पाहता 'कोरोना' ग्रस्तांना दिलासा देण्यात यंत्रणा कमी पडते, हे मात्र नाकारता येत नाही. ही शासन, प्रशासन व यंत्रणेची जबाबदारी आहे, असे म्हणता सुद्धा येऊ शकेल. मात्र मोजक्याच यंत्रणेवर हे आभाळ कोसळले आहे, ही बाब ध्यानात घेणे आवश्यक आहे. तेव्हा त्यांच्या मर्यादेमुळे त्यांना उपचार करणे आणि विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे अवघडच जाणार आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यात लोकभाषेत असे म्हटले जाते की, 'कसाईखाने' खूप आहेत. अर्थात खाजगी सेवा देणारी रुग्णालये या प्रक्रियेत 'कातडी बचाव'चे धोरण अंगीकारत असल्याने आजारी रुग्ण हा देवाच्या भरवशावर आहे. आजार मग तो कोणताही असो रुग्ण घरातच 'मरण' बरे म्हणत आहे. "रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा" हे ब्रीद हद्दपार झाले आहे. माणूस ...माणूस राहिला नाही. 'कोरोना' च्या भीतीने नातीगोती संपत आहेत. भीतीने गळून गेलेल्या समाजात दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. टाळुवरचे लोणी खाणारारांचीही एक जमात जोमात आहे.
माणूस एकदाच जन्मतो आणि एकदाच मरतो. पुनर्जन्माच्या पुराणकथा असल्या तरी त्यास शाश्वत सत्य म्हणून मात्र जिवंत माणूस कधीच कबूल करीत नाही. माणसाला शेवटी एकच भीती असते ती म्हणजे मरणाची. आताच्या स्थितीत ती प्रकर्षाने वाढलेली आहे. ही भीती घालवणे ही आता सर्व समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. अन्यथा सदैव टांगती तलवार ठेवून जीवन जगणाऱ्या मुर्दाड माणसांचा समाज निर्माण केल्याशिवाय आपण राहणार नाही. ही मुर्दाड माणसं खऱ्या अर्थाने नवसमाज, देश कधीच घडवू शकत नाहीत, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.
-प्रा. विकास कदम




No comments:
Post a Comment